भारतातून अनेक देशांना अन्न धान्याची व इतर बऱ्याच गोष्टींची निर्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते. सध्या देशात आंतरराष्ट्रीय बाजापेठेत भारतीय गव्हाला बरीच मागणी आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे इतर देशात गव्हाचा तुटवडा निर्माण झाल्याने भारताला गव्हाची मागणी मोठ्या प्रमाणात येऊ लागली. आता गव्हानंतर भारताला शेणाची मोठी मागणी आली आहे. कुवेतने शेणाची मोठी ऑर्डर भारताला दिली आहे. तेथील शास्त्रज्ञांनी प्रायोगिक तत्वावर खजुराच्या लागवडीमध्ये शेणाचा वापर केला होता. त्यातून त्यांना चांगले उत्पादन मिळाले होते. याच पार्श्वभूमीवर कुवतने भारतातून शेण आयात करण्याचा निर्णय घेतला.
माजी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री यांचे वक्तव्य
आतापर्यंत भारताने शेणाची बरीच निर्यात केली मात्र पहिल्यांदाच एवढी मोठी मागणी आल्याचे सांगितले जात आहे.शेणाची सर्वात मोठी खेप ही राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधून पाठवण्यात येते. मंगळवारी कानपूर येथे कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रमानिमित्त चंद्रशेखर आझाद कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठात माजी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री आणि खासदार राधामोहन सिंह यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी ते म्हणाले, कुवेतच्या कृषी शास्त्रज्ञांना खजुराच्या लागवडीत शेणखत खूप फायद्याचे ठरले आहे. त्यामुळे कुवेतने भारतातून शेण आयात करण्याचा निर्णय घेतला असून यापूर्वी कुवेतने भारताला गव्हाची मागणी केली होती.
पुढे ते असंही म्हणाले, कुवेतच्या मागणीनंतर आता निर्यातीतदेखील वाढ होण्याची शक्यता आहे. शेणाचा सर्वात मोठा उत्पादक देश म्हणून भारताला ओळखले जाते त्यामुळे केंद्र सरकारही शेणाच्या निर्यातीबाबत लवकरच मोठी पावले उचलतील. सध्या उत्तर प्रदेश व राजस्थानमधून शेण पाठवले जात आहे मात्र लवकरच या शेणाच्या निर्यातीत सर्व राज्यांचा समावेश होईल. अशी योजना आखण्यात येईल. कुवेतला शेणाची पहिली खेप ही १५ जूनला पाठवण्यात येणार आहे. या पहिल्या खेपेत जवळपास १९२ मेट्रिक टन इतक्या शेणाचा पुरवठा केला जात आहे. शेणाला पहिल्यांदाच एवढी मोठी ऑर्डर मिळाली आहे.
भारतात ३० कोटी गुरे
कुवेतमधील कृषी शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार शेणाचा भुकटी स्वरूपातील वापर खजुराच्या पिकासाठी वरदान ठरत आहे. शेणाच्या वापरामुळे फळांचा आकार आणि उत्पादनाचे प्रमाण या दोन्हींमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे त्यांचं मत आहे. त्यामुळेच कुवेतच्या लामोर कंपनीने भारताला एवढी मोठी ऑर्डर दिली आहे. भारतात जवळपास ३० कोटी गुरे असून दररोज सुमारे ३० लाख टन इतके शेणखत तयार होते. शेणापासून ब्रिटन तसेच चीनसह अनेक देशांमध्ये वीज आणि गोबर गॅस तयार केला जातो. आपल्या देशातही याचा इंधन म्हणून वापर केला जातो.
महत्वाच्या बातम्या:
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर! मविआ करणार लवकरच एक लाख पदांची मोठी भरती
मोदी सरकारकडून राज्यातील सहा खत कंपन्यांवर फौजदारीचे आदेश; भाजप नेत्याच्या कंपनीचाही समावेश
Published on: 16 June 2022, 11:10 IST