मुंबई- राज्यात सर्वत्र झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात वित्तीय तसेच जीवित हानीला सामोरे जावे लागत आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने झोडपलं असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला असून यामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये काही लोकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे.
चक्रीवादळाच्या (cyclone impact) प्रभावामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्याला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. मराठवाड्यातही शहरासह ग्रामीण भाग जलमय झाला आहे. शेतातील उभे पिके जमीनदोस्त झाले आहे.
सोयाबीनसह कांद्याला फटका:
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने कांद्याचे पीक धोक्यात आले आहे. शेतकऱ्यांनी कांदारोप लागवडीसाठी तयार केले होते. मात्र, या रोपाचेही नुकसान झाले आहे. शेतात पाणी साठल्यामुळे रोपे पिवळी पडली आहेत. भुईमूग, बाजरी, कापूस, पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे.
साधारणपणे तालुक्यात हळवे,गरवे व नीमगरवे अशा तीन प्रकारचे भात इथला आदिवासी शेतकरी लागवड करीत असतो. सुदैवाने टप्प्या-टप्प्याने पडत गेलेल्या पावसामुळे चालू हंगामात भात पिके अपेक्षेपेक्षा चांगले बहरले होते.
परंतु अतिवृष्टीने खूप मोठे नुकसान भात पिकाचे झाले आहे. गेल्या दोन दिवसात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी देशोधडीला लागला आहे. आले ते पीक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची जिवाच्या आकांताने धावपळ सुरू आहे. आदिवासी पट्ट्यात सर्वत्र हे विदारक चित्र आहे.पारंपारिक भाताची मागणी वाढल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने या वाणांची लागवड केली होती.
हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. शेतकरी वर्गामध्ये प्रचंड नाराजी व नैराश्याचे वातावरण आहे पाऊस थांबला नाही तर नुकसानीचे प्रमाण वाढत जाईल.
Share your comments