फुल शेतीमध्ये झेंडूची लागवड प्रामुख्याने आणि मोठ्या प्रमाणावर केली जाते. महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात झेंडूचे उत्पादन पुणे,अहमदनगर,सातारा ,औरंगाबाद,नागपूर आणि नाशिक येथे घेतले जाते. प्रत्येक सणवारामध्ये झेंडूच्या फुलांना वेगळ महत्त्व आहे.या वनस्पतीला उत्कृष्ट सजावटीचे मूल्य आहे. विशेषता दसरा आणि दिवाळीच्या सणाला झेंडूच्या फुलांना प्रचंड मागणी असते. त्यामुळे झेंडूची व्यावसायिक लागवड करून शेतकरी अल्पावधीत चांगला नफा मिळवू शकतात. झेंडूच्या चांगल्या उत्पादनासाठी त्याच्या सुधारित जातींची निवड करणे आवश्यक आहे.
झेंडूची पाने / फुले-
झेंडूचे फुल पांढरे, दुहेरी रंगाचे किंवा पिवळे,केशरी,लाल,सोनेरी रंगाचे असू शकते. या वनस्पतीचे फुलांना सामान्यत: गोलाकार, सुगंधीत आणि असंख्य पाकळ्या असतात. झेंडूच्या फुलांचा आकार रंग त्यांच्या प्रजातींवर अवलंबून असतो.या वनस्पतींची उंची ६ इंच ते ३ फूटांपर्यंत असू शकते.या वनस्पतीची पाने २ ते ५ सेमी लांब, भुरकट हिरवी असतात.
झेंडू पिकासाठी हवामान-
महाराष्ट्रातील हवामानात झेंडूचे पीक वर्षभर घेता येते. झेंडूचे पीक उष्ण व कोरड्या तसेच दमट हवामानात चांगले येते तसेच त्याला सरासरी 18-20 अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. अती तापमानामुळे या झाडांची वाढ खुंटते.
जमीन-
झेंडूचे पीक विविध प्रकारच्या जमिनीत येऊ शकते. पण झेंडूची वाढ चांगली होण्यासाठी हलकी ते मध्यम जमिन फायदेशीर ठरते. त्याच बरोबर भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन पोषक असते.
झेंडूच्या काही सुधारित जाती -
आफ्रिकन झेंडू - झेंडूचा हा सुधारित प्रकार आहे. या प्रजातीच्या झेंडूंची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या झेंडूच्या फुलांचा रंग पिवळा आणि केशरी असतो. पुसा ऑरेंज, पुसा स्प्रिंग आणि आफ्रिकन येलो, केसरी, कॅकरजॅक, येलो सुप्रीम, गियाना गोल्ड, स्पॅन गोल्ड, आफ्रिकन डबल ऑरेंज, आफ्रिकन टॉल डबल मिक्स्ड, सन जायंट, हवाई, अलास्का, पुसा नारंगी गेंदा, पुसा वसंती गेंदा, फिएस्ता, प्रीमरोज, क्युपीड जाती या प्रजातीमध्ये येतात. या जातींची शेती करून शेतकरी चांगले नफा मिळू शकतात.
फ्रेंच झेंडू - आफ्रिकन प्रजातीप्रमाणेच फ्रेंच झेंडूची देखील मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. कारण या प्रजातींच्या झाडांना खूप जास्त फुले लागतात. रेड ब्रॉकेट, क्यूपीड येलो, बोलेरो, बटन स्कॉच, फ्रेंच डबल मिक्स्ड, पाईणॲपल, क्रश क्वीन, बटरबॉल, पुसा अर्पिता, स्पे, प्लॅश, लेमन ड्रॉप्स जाती या प्रजाती अंतर्गत येतात. या देखील सुधारित जातींची लागवड करून शेतकरी चांगले उत्पादन मिळू शकतात.
Share your comments