आहारात विविध अन्न पदार्थांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच समतोल आहारात विविध प्रकारच्या भाज्या, पालेभाज्या, फळे, धान्ये, कडधान्ये, दूध इत्यादींचा समावेश हे उत्तम आरोग्य राखण्यास नेहमीच फायद्याचे ठरते. आरोग्याच्या दृष्टीने ६०-६५% पिष्टमय पदार्थ, २०% स्निग्ध पदार्थ आणि २०% प्रथिने रोजच्या आहारातून मिळणे गरजेचे आहे. पिष्टमय पदार्थ भात, पोळी, भाकरी यातून पुरेश्या प्रमाणात मिळतात तर स्निग्धांश सुद्धा विविध अन्नपदार्थ जसे, तेल, तूप, बटर, विविध तेलबिया यांच्यातून मुबलक प्रमाणात आपल्या खाण्यात येतात.
परंतु बरेच आजार हे गरजे इतके प्रथिने न मिळाल्यामुळे होतात. प्रथिनांची गरज हि बाल्यावस्थेपासूनच पूर्ण भागवली पाहिजे. प्रथिनांनमुळे शरीर सौष्ठव राखण्यास खूप मदतीचे होते. म्हणूनच प्रथिनांचा स्रोत म्हणून कडधान्ये खाल्ली पाहिजेत. सर्व सामान्यपणे मठ, मूग, चवळी, कुळीथ, सोयाबीन, राजमाह, मसूर, इत्यादी रोजच्या दैनंदिन वापरातले कडधान्ये आहेत. परंतु मूग हे कडधान्य काही विशेष गुणधर्मांनी युक्त आहे. आयुर्वेदात ज्यांना मंदाग्नी आहे त्यांनी मूग खाने चांगले असा संदर्भ आढळतो. मूग मध्ये सुमारे ६२% कर्बोदके, २४% प्रथिने, १.१५% स्निग्धांश असतात. शिवाय अत्यल्प संतृप्त स्निग्धांश आणि कोलेस्टेरॉलचा पूर्ण अभाव असतो. लोह, पोटॅशिअम, झिंक, फॉस्फरस अशी खनिजे आणि अ, ब, क, नायसिन अशी जीवनसत्वे सुद्धा मुबलक प्रमाणात मुगामध्ये असतात.
ज्वर, स्थूलता, मधुमेह, अग्निमंद्य या सारख्या आजारांवर मूग सेवन अतंत्य फायदेशीर आहे. वजन नियंत्रित करण्यासाठी देखील मुग आणि मुगाचे पदार्थ उपयुक्त आहेत. सोडियम फ्री असल्यामुळे उच्च रक्त दाब असणार्याना मूग योग्य आहार आहे. अशक्तपणा, उष्णता तसेच त्वचा विकारांसाठी सुद्धा मूग पोषक आहे. मुगाचे सेवन करण्यापूर्वी विविध प्रक्रिया करून त्यातील पौष्टिकता वाढवता येऊन लवकर प्रक्रियाशील बनवता येतात. भिजवणे, मोड आणणे, भाजणे, शिजवणे या सारख्या प्रक्रिया करून मूग खाण्यास सोयीस्कर करता येतात.
मुगाचे विविध पदार्थ बनवता येतात. मुगाचे घावन, मुगाचे वडे, मोड आलेले मूग वाळवून त्याची पावडर करून त्या पासून सूप मिक्स, मुगाचा ढोकळा, मोड आलेल्या मुगाचे रव्या सोबत प्रोटीन बार, मुगाची बर्फी, मुगाचे बिस्किट्स, केक, शेव, कच्च्या मोड आलेल्या मुगाची कोशिंबीर असे अनेकविध पदार्थ बनवून आहारात मुगाचे प्रमाण वाढवता येऊ शकते. मूग भाजून त्याचे पीठ करून त्यापासून मसाल्यांनी संयुक्तिक थालीपीठ सुद्धा बनवू शकतो.
प्रा. सौ. एस. एन. चौधरी
लेखिका अन्न प्रक्रिया विषयातील तज्ञ आहेत.
Share your comments