शेवग्याचे मूळ, फूल, पाने व साल यांचा वापर आयुर्वेदिक औषधात केला जातो.शेवगा हा उष्ण गुणाचा तसेच कफनाशक आहे. प्रक्रिया उद्योगाच्यादृष्टीने आरोग्यदायी शेवग्याची मागणी वाढत आहे.
शेवग्याच्या पानांची भाजी व फुलांची कोशिंबीर करतात. शेवग्याच्या शेंगात व पानात अ आणि क ही जीवनसत्वे तसेच चुना (कॅल्शिअम), लोह व प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. वाळलेल्या शेवग्याच्या शेंगांतील बियांपासून तेल काढतात. या तेलाचा उपयोग सांधेदुखीवर होतो. पिण्याचे पाणी स्वच्छ करण्याकरिता शेवग्याच्या शेंगांतील बियांची पावडर अत्यंत उपयुक्त आहे. शेवगा हा उष्ण गुणाचा आहे. त्याचप्रमाणे तो कफनाशक आहे.
औषधी गुणधर्म
- पानांचे पोटीस गळूवर लावले असता ते पिकून निचरा होण्यास मदत होते.
- संधिवात आणि आमवातामध्ये बियांचे तेल वापरतात.
- शेवग्यामुळे पोटातील विविध कृमी, जंतांचा नाश होतो.
- भूक मंदावली असल्यास शेवग्याची भाजी खाल्ल्याने भूक वाढण्यास मदत होते.
- तोंडाला चव नसेल तर त्याच्या सेवनाने त्यात असलेले क्षार जिभेच्या ठिकाणी असलेला दूषित कफ कमी करतात. जिभेचे शोधन करतात, अरुची कमी होते.
- शेवगा हा उष्ण गुणांचा असल्याने पित्त प्रकृतीच्या लोकांनी योग्य प्रमाणातच खावा.
- यकृत व प्लीहेच्या आजारात उपयुक्त आहे. त्यामुळे प्लीहोदरमध्ये याचा काढा उपयुक्त आहे.
- कफयुक्त सर्दी-खोकला व त्यामुळे होणाऱ्या डोकेदुखीत शेवग्याच्या बियांचे चूर्ण नस्य म्हणून वापरावे.
- शेवगा हृदयाला बळ देणारा आहे. हृदयदौर्बल्य असणाऱ्यांनी याचा उपयोग आहारात करावा.
- शेवगा हा मेद कमी करणारा आहे. स्थौल्यनाशासाठी अनेक मेदोहर औषधात शेवग्याचा वापर केला जातो.
- नेत्र रोगात शेवग्याचा वापर प्रामुख्याने केला जातो.
- डोळ्यांची ताकद वाढवण्यासाठी व मोतीबिंदूच्या उपचारात पानांचा रस वापरतात. शेवग्याच्या बियांचे अंजन केल्याने डोळ्यांचे सर्व कफविकार कमी होतात.
- नारुरोगामध्ये नारुवर शेवग्याची साल किंवा पाने आणि सौंधवाचा लेप केला असता नारू बाहेर पडतो.
- मूतखड्यावर शेवग्याच्या मुळांचा काढा उपयोगी आहे.
- मासिक पाळीमध्ये होणाऱ्या पोटदुखीसाठी आणि रक्तस्राव कमी होत असेल , तर शेवग्याची भाजी, काढा उपयोगी आहे.
- कुपोषणाने होणारे बालमृत्यू, लोहाच्या कमतरतेमुळे पौगंडावस्थेतील मुली, लहान मुले, गर्भिणी महिला यांच्यातील आजार शेवग्यामुळे कमी होण्यास मदत होते.
- अस्थीदौर्बल्य, रक्तक्षय, धातूक्षय, अशक्तपणा यावर शेवगा उपयुक्त आहे.
- शेवग्यात लोह, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, झिंक भरपूर प्रमाणात आढळते.
- प्रथिने, कर्बोदके, अ आणि क जीवनसत्त्व, बी. कॉम्प्लेक्सचा उत्तम स्रोत शेवग्यात आढळतो.
- शेवग्यात मोरींजीन नामक क्षारतत्व आहे, तसेच प्रतिजैविक आहे. त्यामुळे उत्तम जंतुघ्न असलेला शेवगा पाणी शुद्धीकरणासाठी वापरतात. बीजचूर्णाचा वापर पाणी स्वच्छ करण्यासाठी करतात.
Share your comments