पारंपारिक पद्धतीत वाळलेली मिरची पोत्यात भरून काठीच्या सहाय्याने झोडपून काढणे व त्यानंतर सुपाच्या सहाय्याने टरफलापासून बियाणे वेगळे करणे अतिशय त्रासाचे काम आहे. श्वासाद्वारे मिरचेचे बारीक कण नाकातून गेल्याने मजुराला एकसारख्या शिंका येतात, तसेच शरीराचा दाह होतो. कमी प्रमाणात बी काढायचे असल्यास हे शक्यही होते परंतु मोठ्या प्रमाणात जसे बियाणे महामंडळ, बिजोत्पादक, बिज संस्था, कंपन्या एत्यादी ठिकाणी करायचे असल्यास त्यासाठी मजूर मिळवणेही दुरापास्त होते.
यासर्व बाबींचा विचार करून अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प, कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत “लाल ओली मिरची बिज निष्कासन यंत्र” विकसित केले आहे. हे बिज निष्कासन यंत्र शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरू शकते. शेतकरी बिज निष्कासन यंत्राच्या साहाय्याने बियाणे व्यवसाय करू शकतो व त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात अतिरिक्त भर पडण्यास मदत होईल.
यंत्राची परिमाणे :
1) सर्वसाधारण मापे :-
- लांबी – १.२८ मीटर
- रुंदी – ०.७३ मीटर
- उंची – १.६० मीटर
2) विद्युत मोटर :- ३ अश्वशक्ती (तीन फेज)
यंत्राचे प्रमुख भाग :
बिज निष्कासन यंत्राचे प्रामुख्याने मुख्य फ्रेम, हॉपर (चाडी), बिज निष्कासन युनिट व विद्युत मोटर असे महत्वाचे एकूण चार भाग आहेत.
- मुख्य फ्रेम :-
या यंत्राची मुख्य फ्रेम स्टीलच्या अँगल सेक्शनपासून तयार केली गेली आहे. हॉपर (चाडी), बिज निष्कासन ड्रम, बियाणे बहिर्द्वार, टरफल बहिर्द्वार आणि मोटर मुख्य फ्रेमवर बसविण्यात आले आहेत.
- हॉपर (चाडी)
साधारणता ५ किलो ओल्या मिरच्या राहतील अशा आकारमानाची चाडी आहे. चाडीची एक बाजू वाढविली गेली आहे. जवळपास ३६०चा उतार दिला आहे जेणेकरून मिरच्या चाडीमध्ये एकसारखे जाण्यास मदत होते.
- बिज निष्कासन युनिट :-
यंत्राच्या बिज निष्कासन युनिटमध्ये प्रथम बिज निष्कासन ड्रम, द्वितीय बिज निष्कासन ड्रम, अर्धवर्तुळाकार गोल छिद्रित चाळणी, प्रथम बियाणे बहिर्द्वार, द्वितीय बियाणे बहिर्द्वार व टरफल बहिर्द्वार यांचा समावेश आहे. विद्युत मोटर बिज निष्कासन यंत्र कार्यरत करण्यासाठी ३ अश्वशक्तीची तीन फेज मोटर जोडलेली आहे.
मिरची बिज निष्कासनाची प्रक्रिया :
या यंत्रामद्धे साधारणत: दोन ड्रम असून, हे ड्रम फिरविण्यासाठी यंत्राला विद्युत मोटर दिली आहे. वरच्या बाजूला असलेल्या चाडीमधून ओल्या मिरच्या घातल्यानंतर पहिल्या ड्रममध्ये शाफ्ट व फ्लॅट पेग्सच्या क्रियेच्या साहाय्याने मिरच्या चिरडले जाऊन बियाणे वेगळे होतात. निष्कासन झालेले बियाणे अर्धवर्तुळाकार गोल छिद्रित चाळणीतून जातात आणि प्रथम बियाणे बहिर्द्वारातून गोळा केले जाते.
काही बियाण्याबरोबर राहिलेल्या मिरच्या उर्वरित बियाणे निष्कासनासाठी पहिल्या ड्रमखाली असलेल्या द्वितीय ड्रमपर्यंत पोचविल्या जातात. या ड्रममध्ये सुध्दा वरील प्रमाणे निष्कासन क्रिया होऊन निष्कासन झालेले बियाणे दुसऱ्या बहिर्द्वारातून गोळा केले जाते. तसेच निष्कासन झालेले टरफल हे टरफल बहिर्द्वारातून गोळा केले जाते.
यंत्राची वैशिष्टे :-
- बिज निष्कासन यंत्र बियाणे उत्पादकांकरिता उपयुक्त आहे.
- या यंत्राद्वारा बिज निष्कासन क्षमता ३०० कि.ग्रॅ. प्रती तास आहे.
- यंत्र ३ अश्वशक्ती तीन फेज विद्युत मोटरवर चालते.
- बिज निष्कासन करण्यासाठी यंत्राची कार्यक्षमता ९५ ते ९७ टक्के आहे.
यंत्राचे फायदे :-
- यंत्राचे कार्य अगदी सुलभ आहे.
- यंत्र पुर्णपणे बंद असल्याने अंगाचा होणारा दाह व एकसारख्या येणार्या शिंका कमी करण्यास मदत होते.
- यंत्र चालवणारा व्यक्ती दिवसभर काम करू शकतो जे पारंपारिक पद्धतीमध्ये शक्य होत नाही.
- संपूर्ण बियाणे (९४ – ९९ %) निष्कासन एकाच पासमध्ये शक्य.
- बियाण्यांची उगवण क्षमता कमी होत नाही.
यंत्राविषयी घ्यावयाची काळजी :-
- यंत्राचा वापर झाला की, लगेच यंत्र खोलून स्वछ धुवून व कोरडी करून ठेवावे. मुख्यत: रोलर, अर्धवर्तुळाकार चाळण्या स्वछ धुवून व कोरडी करून ठेवावे.
- यंत्राचे सर्व नट व बोल्ट वेळोवेळी कसून घ्यावे.
- मशिन बेल्टचा ताण तपासून घ्यावा.
लेखक
- श्री. उदयकुमार खोब्रागडे (वरिष्ठ संशोधन सहाय्यक),
- डॉ. प्रमोद बकाने (संशोधन अभियंता),
अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प, कापणी पश्यात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला.
संपर्क – मो. क्र. - ८६९८५७९६८९
ई-मेल – udaykumar358.uk@gmail.com
Share your comments