कोरोना विषाणूंचा वाढता संसर्ग पाहता कृषी महाविद्यालयांमध्ये सीईटी घेण्यासंदर्भात सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही संभ्रमाची स्थिती आहे. कृषी पदवीसाठी असलेल्या सीईटी सक्तीमुळे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. कृषी महाविद्यालयांमध्ये द्वितीय आणि तृतीय वर्षांचे ऑनलाईन वर्ग सुरू झाले आहेत. मात्र प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे.
राज्यात कृषी आणि संलग्न विषयांचे आठ अभ्यासक्रम शिकवले जातात. राज्यातील १९० महाविद्यालयांमध्ये १५ हजार ९८७ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. कृषी अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याने सरासरी ६५ ते ७० हजार विद्यार्थी प्रवेशासाठी परीक्षा देतात. दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने विविध पदवी अभ्यासक्रमांसाठी कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (सीईटी) पद्धती लागू केली. त्यामध्ये कृषी महाविद्यालायीतल अभ्यासक्रमांचाही समावेश आहे. सीईटी घेऊनच कृषी महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिले जाईल असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दरवर्षी जून महिन्यात सीईटी घेऊन जुलै महिन्यात राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडून प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. यंदा कोरोना महामारीचा फटका सर्वच घटकांबरोबर शिक्षण क्षेत्राला बसला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधी बारावीचे निकाल जुलै महिन्याच्या अखेरीस जाहीर करण्यात आले.
मात्र त्यानंतरही राज्यात सामायिक परीक्षा प्रक्रिया (सीईटी) राबविणाऱ्या विभागाने सीईटी होणार की नाही याबाबतचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सीटीईविना प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबत सरकारच्या स्तरावर चर्चा सुरू असल्याचे समजते. ग्रामीण भागातील बहुसंख्य विद्यार्थी कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाच्या धास्तीने यंदा शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा की नाही याविषयी संभ्रमाची स्थिती अनेक विद्यार्थ्यांचा मनात आहे. त्यामुळे विद्यार्थी कृषी शिक्षणापासूनही वंचित राहण्याची धास्ती आहे. त्यामुळे पूर्वी ज्या पद्धतीने बारावीच्या गुणांवर प्रवेश प्रक्रिया राबवली जायची, तशीच प्रक्रिया यंदाही राबबावी अशी मागणी करण्यात येत आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासोबत याबाबत विविध संघटनांच्या पुढाकाराने बैठक घेण्यात आली. नंतर मात्र हा विषय रेंगाळला आहे.
दरम्यान, दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सद्यस्थितीत राज्यात अकरावीचे प्रवेश ऑनलाइन सुरू झाले आहेत. केंद्रीय सामायीक प्रवेश पद्धतीनुसार प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. राज्यातील सर्व कृषी महाविद्यालयांमध्ये द्वितीय आणि तृतीय वर्षांचे ऑनलाइन वर्ग सुरू झाले आहेत. चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यांचे ग्रामीण कृषी कार्यानुभव तासिकाही सुरू झाल्या आहेत. मात्र, सीईटीबाबत मात्र संभ्रमाची स्थिती आहे.
दरम्यान, राजर्षी छत्रपती शाहू महाराज अॅग्रीकल्चर कॉलेज ऑफ कोल्हापूरचे अधिष्ठाता डॉ. पी. एन. रसाळ यांनी द्वितीय वर्षापासून अन्य सर्व वर्षांचे ऑनलाइन क्लासेस सुरू असल्याचे सांगितले. ते म्हणाले, सीईटी अद्याप न झाल्यामुळे प्रथम वर्षाचे कामकाज सुरू नाही. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर द्वितीय, तृतीय आणि चौथ्या वर्षांचे ऑनलाइन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना व्हॉट्स्अॅपच्या माध्यमातूनही मार्गदर्शन करण्यात येते. याशिवाय, अडचणी आल्यास त्या दूर करण्यासाठी कौन्सिलर्सवरही जबाबदारी देण्यात आली आहे.
Share your comments