या योजनेचा फायदा हा बेरोजगारीवर मात करण्यासाठी होईल. या योजनेचा लाभ घेऊन ग्रामीण भागातील तरूण वर्ग स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. सध्या बाजारात चिकन व अंडी यांना चांगला भाव असल्याने जर तरुण वर्ग या व्यवसायाकडे वळला तर नक्कीच त्यांना एकात्मिक कुक्कुट पालन योजनेमुळे रोजगार निर्माण होणार आहे.
आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी विकास प्रकल्प कळवण, नाशिक, राजुर, तळोदा, नंदुरबार, शहापूर आणि पेण या कार्यक्षेत्रातील आदिवासींच्या स्वयंसहायता बचत गटांसाठी एकात्मिक कुक्कुट पालन योजनेच्या मदतीने व्यावसायिक पद्धतीने कुकूटपालन व्यवसायासाठी आदिवासी बंधूंना अर्थसहाय्य करण्याच्या उद्दिष्टाने ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी या भागातील आदिवासी बचत गटांनी अर्ज करावेत असे आव्हान आदिवासी विकास विभागामार्फत करण्यात आले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी बचत गटांसाठी असलेले पात्रता निकष
- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संबंधित बचत गटातील सगळे सदस्य अनुसूचित जमातीचे असायला हवे.
- ज्या आदिवासी बचत गटांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यास बचत गटांचा बँकेत व्यवहार चालू असणे आवश्यक आहे.
- तसेच महत्त्वाचे म्हणजे शासन निर्णयात नमूद असणारी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि बचत गटातील सर्व सदस्यांचे रजिस्टर हमीपत्र हे पूर्ण असावे.
या योजनेसाठी किती निधी मिळणार?
या योजनेच्या माध्यमातून पात्र असलेल्या बचत गटांना कुकुट पालनासाठी लागणारे शेड च्या बांधकामासाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे तसेच कुक्कुटपालनासाठी आवश्यक अशा सगळ्या प्रकारचे साहित्य जसे की, फिडर,ड्रिंकर, छोटे पक्षी, तसेच लागणारे सगळ्या प्रकारचे खाद्य पुरवले जाणार आहे.
या एकात्मिक कुक्कुट पालन योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र बचत गटाला 5.25 लाख रुपये शासकीय अनुदानाचा लाभ मिळणार आहे. तसेच कुकुट पालना विषयी लागणारे सगळ्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ही सगळी प्राथमिक क्रिया पूर्ण झाल्यानंतर कुक्कुटपालन व्यवसायातील नामांकित कंपन्या सोबत कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने या योजनेच्या अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या योजनेविषयी तपशीलवार माहितीसाठी व अर्ज दाखल करण्यासाठी संबंधित प्रकल्प कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा.
माहिती स्त्रोत- महाराष्ट्रनामा
Share your comments