नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील प्रजाती सध्या नांदेड सोबतच परभणी, लातूर, हिंगोली आणि बीड जिल्ह्यात जास्त आढळून येते. तसे पाहायला गेले तर चौथ्या शतकापासून या जातीचे अस्तित्व दिसून येते.
राजा सोमदेव राय यांनी या पशुधनाचे संगोपन आणि संवर्धन केलेले आढळून येते.ही प्रजात कमी दूध मात्र शेती कामासाठी अत्यंत उपयुक्त म्हणून ओळखली जाते. म्हणूनच मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पसंत पडणारी ही प्रजाती आहे.
या जातीच्या पशुधनाची वैशिष्ट्ये
या जातीची जनावरे ही मध्यम आकाराचे, धडधाकट व दिसण्यास देखणी असतात. प्रमाणबद्ध शरीर आणि त्याच प्रमाणात पाय-यांची रचना असते. अत्यंत चपळ असणाऱ्या या प्रजातीचा रंग लाल ते तपकिरी असून विशेषतः गाई या फिक्कट तांबड्या / तपकिरी रंगाच्या व वळू/ बैल हे तांबडे तसेच तपकिरी रंगाचे आढळून येतात.
मजबूत, डौलदार व काळसर खांदा हे वळूंचे वैशिष्ट्य आहे. शेपटीचा गोंडा काळा असतो. तसेच पायाची खूर व नाकपुडीदेखील काळीअसते. सड देखील काळे असून कान दोन्ही बाजूला समान अंतरावर लोंबकळणारे असतात. कपाळ मोठे व थोडे पुढे आलेले तसेच डोळे काळे पाणीदार व भोवती काळे वर्तुळ असणारे असतात.मान आखूड व सरळ असते. माने खालील पोळी मध्यम आकाराची व घड्या असणारी असते. पाठ मध्यम लांबीची व रुंद असते. कास लहान व शरीराबाहेर असते. या प्रजाती पासून मिळणारे दूध उत्पादन कमी असल्याने दुधाच्या शिरा क्वचितच आढळतात. प्रतिदिन दूध उत्पादन हे दीड ते चार लिटर पर्यंत आहे.
या जातीची प्रतिकारशक्ती अत्यंत चांगली असून त्यावरील व्यवस्थापन खर्च देखील कमी आहे. या प्रजातीच्या दोन वेतातील अंतर 14 ते 16 महिने असून कालवडी वयाच्या 30 व्या महिन्यात गाभण राहतात. मराठवाड्यातील एकंदर परिस्थिती पाहता व सिंचन सुविधांचा विचार करता पशुपालकास साठी अत्यंत कमी व्यवस्थापनात चांगले शेती काम करणारी ही जात आहे.
Share your comments