बेरोजगार लोकांसाठी शेळीपालन अत्यंत उपयोगी आणि भरपूर नफा मिळवून देणारे म्हणून सिद्ध झाले आहे. शेळीला भारतात ‘गरीबाची गाय’ म्हणतात आणि कोरडवाहू शेती समवेत हा एक शेतीपूरक उद्योग आहे. किरकोळ किंवा चढउतार असलेल्या पृष्ठभागाच्या जमिनी ह्या गाय किंवा इतर प्रकारच्या जनावरांसाठी चांगल्या नसतील तेथे शेळी हा उत्तम पर्याय आहे.
शेळ्यांना होणारे महत्वाचे आजार आणि त्यावरील उपाय:
1) आंत्रविषार (इ.टी.व्ही)
खाद्यातील बदलांमुळे हा रोग होतो. अवकाळी पावसानंतर किंवा पावसाळ्यात सुरुवातीला येणारे हिरवे गवत जास्त प्रमाणात खाल्ल्यास हा रोग होतो. मरण्यापूर्वी शेळीमध्ये फारशी लक्षणे दिसत नाहीत. संध्याकाळी उशिरा एक दोन उड्या मारून किंवा चक्कर खावून शेळी हात पाय झाडत प्राण सोडते.
प्रतिबंध:
- लसीकरण महत्वाचे आहे. इटीव्ही लस नोव्हेंबर डिसेंबर तसेच पावसाळा सुरु होण्यापूर्वी म्हणजे उशिरात उशिरा 15 जून पर्यंत दरवर्षी द्यावी.
- शेळ्यांना विशेषतः करडाना कधीही ताजा पाला खाण्यासाठी देवू नये.
- किंचित सुकलेला किंवा एक दिवसाचा शिळा चारा (जसे की झाडपाला, गवत, लसूण घास) द्यावा.
2) धनुर्वात (Tetanus)
जखमेद्वारे जंतूंचा प्रवेश होवून हा रोग होतो. शरीरातील स्नायू आखडतात. शेळीचा मृत्यू होवू शकतो.
प्रतिबंध:
- शेळी विण्यापूर्वी किंवा इतर वेळी कोठेही मोठी जखम झाल्यास प्रतिबंधक लस टोचून घ्यावी.
हेही वाचा:इस्राईलमधील आधुनिक शेळीपालन
3) फुफ्फुसदाह (Pneumonia)
- फुफ्फुसदाह हा रोग प्रामुख्याने शेळ्या पावसात भिजल्याने अथवा हवामानातील घटकांच्या अचानक होणाऱ्या बदलामुळे जेव्हा जनावराची प्रतिकारशक्ती कमी होते तेव्हा या रोगाची शक्यता बळावते.
- तत्काळ नजीकच्या पशुवैद्यक अधिकाऱ्यांशी संपर्क करून उपचार करवून घ्यावेत.
- कुठल्याही परिस्थितीत करडे आणि शेळ्या पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी.
4) हगवण
- व्यवस्थापन योग्य नसेल तर हा रोग होतो.
- घाणीमुळे या रोगास कारणीभूत असणाऱ्या (इ.कोलाय) जंतूंचा प्रसार होतो.
- आपल्या शेळी फार्मवर स्वच्छता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
5) खुरी (FMD)
- याला तोंडखुरी किंवा पायखुरी असेही म्हणतात.
- जीभ, तोंड, खुरांचे बेचके आणि स्तनांवर फोड आलेले दिसून येतात.
- शेळी लंगडत चालते.दरवर्षी पावसाळयापूर्वी लसीकरण करून घ्यावे.
6) फऱ्या
- पुढच्या किंवा मागच्या फर्यावर किंवा मागच्या पुठ्ठ्यावर सूज येते. कातडी काळी पडते.
- शेळी खात पीत नाही. उपचार न केल्यास शेळी 8 ते 24 तासात मरते. त्यामुळे लक्षणे दिसताच उपचार सुरु केले पाहिजेत.
- प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच जून महिन्यात लस टोचून घ्यावी.
- घटसर्प आणि फऱ्या अशी एकत्रित लस पण उपलब्ध आहे.
7) सांसर्गिक गर्भपात
- कळपात राहणाऱ्या नराकडून हा रोग प्रसारित होतो. दोन ते अडीच महिन्याच्या गर्भधारणेनंतर गर्भपात होतो. नंतर शेळी माजावर न येणे, कायमची भाकड होणे, वारंवार गर्भपात होणे असे प्रकार होतात.
- रक्त तपासणी आवश्यक.
- गाभण शेळीचा गर्भपात झाल्यास गर्भ आणि वार खोल खड्डा करून त्यावर चुना टाकून पुरून टाकावे.
8) स्तनदाह (Mastitis)
- सडातून कासेत किंवा कासेला झालेल्या जखमेतून जंतूचा प्रवेश होतो.
- करडू काही कारणाने मरून गेल्यास कासेत दुध रहाते त्यामध्ये जंतू वाढतात.
- कास घट्ट होते, दुधात गाठी दिसून येतात. दुध नासते.
- कासेमध्ये दुध राहणार नाही याची दक्षता घ्यावी. उपचार करवून घ्यावेत.
9) घटसर्प
- शेळ्याना हा रोग क्वचित होतो. श्वास घेण्यास त्रास होतो.
- घशातून खर खर आवाज येतो. ताप येतो.
शेळ्यांचे बहुतांश महत्वाचे आजार लसीकरणाद्वारे टाळता येऊ शकतात. उन्हाळ्याच्या शेवटी लस टोचून घ्यावी.
लसीकरण:
मराठवाड्यातील शेळीपालक शेतकऱ्यांसाठी खालील लसीकरण कार्यक्रम सुचविला आहे. हा कार्यक्रम कोणतीही तडजोड न करता राबविल्यास शेळ्यामधील मर सहज टाळता येवू शकते.
रोग |
कालावधी |
आंत्र विषार (इ.टी.व्ही) |
वयाच्या पहिल्या महिन्यात एकदा, आणि पंधरा दिवसानंतर बुस्टर आणि नंतर दर सहा महिन्यांनी नियमित. |
घटसर्प |
वयाच्या चवथ्या महिन्यात आणि नंतर दरवर्षी पावसाळ्यापूर्वी. |
खुरी |
वयाच्या सहा महिन्यानंतर, दरवर्षी पावसाळ्यापूर्वी. |
धनुर्वात |
गाभण शेळ्यांसाठी विण्यापूर्वी एक महिना आधी. |
पीपीआर |
3 महिन्याच्या करडांना सुरवातीला एकदा आणि दर सहा महिन्यांनी एकदा करावे. |
लेखक:
डॉ. आनंद रा. देशपांडे, डॉ. प्रशांत रा. सूर्यवंशी, डॉ. सतीश श्रा. गायकवाड
(सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी)
Share your comments