महाराष्ट्रात मुख्यतः बारामती फलटण परिसरात फेब्रुवारी मार्च महिन्यात ,खान्देशातील जळगाव ,धुळे ,नंदुरबार या जिल्ह्यात व विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात जेथे मुबलक सिंचनाची व्यवस्था आहे तेथे मान्सूनपूर्व कापूस लागवड केली जाते.कापूस या पिकास जमीन, हंगाम, हवामान व वाणाचा कालावधी यानुसार सिंचनाची गरज कमी जास्त असते.महाराष्ट्रामध्ये कापसाच्या पिकास हंगामानुसार (मान्सून पूर्व आणि कोरड) 200-700 मि.मी. पाण्याची गरज असते. कापूस पिकास लागणाऱ्या एकूण पाण्याच्या गरजेपैकी लागवडी पासून पाते लागण्यापर्यंत 20%, पाते लागणे ते फुले धरण्याच्या काळात 40%, फुले धरणे ते बोंडे लागण्यापर्यंत 30% ,आणि बोंडे लागणे ते शेवटची वेचणी होईपर्यंत 10% पाण्याची गरज असते.म्हणजेच सुरुवातीच्या काळात कापसासाठी पाण्याची गरज कमी असते, पाते लागण्यापासून बोंडे लागण्यापर्यंत कापूस या पिकाला पाण्याची गरज सर्वाधिक असते.
त्यानंतर परत पाण्याची गरज कमी होते. सुरुवातीच्या काळात जर पावसाचे प्रमाण जास्त झाल्यास झाडाची व मुळांची वाढ खुंटते. फुले लागणे व बोंडे भरण्याच्या काळात पाण्याची कमतरता असल्यास उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. या काळात पाण्याचा ताण पडल्यास संरक्षित पाण्याची सोय करावी.हे जे पाणी आपण कापसाला देतो त्यालाच उभारीचे पाणी असे म्हणतात.
महाराष्ट्रात बागायती बी टी कापसाची मान्सूनपूर्व पेरणी मे महिन्याच्या अखेरीस केली जाते पेरणीनंतर पाऊस पडेपर्यंत जमिनीच्या प्रकारानुसार 3 ते 5 दिवसांच्या अंतराने पाणी दिले जाते पीक वाढीच्या अवस्थेमध्ये पिकाची गरज प्रामुख्याने पावसाच्या पाण्यानेच भागते. जर पावसाचा खंड पडल्यास पिकास पाणी द्यावे, पाते, फुले व बोंडे लागण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास पाते, फुले व बोंडे गळण्याची शक्यता असते. पाते लागणे, फुले लागणे, बोंडे लागणे व बोंडे फुटणे या पीक वाढीच्या महत्वाच्या अवस्था आहे. या पीक वाढीच्या अवसंस्थेच्या वेळी पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. झाडावरील 30-40% बोंडे फुटल्यानंतर पाणी देणे बंद करावे, नाहीतर कापसाच्या प्रतीवर विपरीत परिणाम होतो,वेचणी केलेल्या कापसात कवडीचे प्रमाण वाढते.
ठिबक सिंचन पध्दतीने पाण्याची जवळपास 50% बचत होते. त्याचबरोबर उत्पादनामध्ये 35-40% वाढ होते. कपाशीच्या धाग्याचा गुणधर्मामध्ये लांबी व प्रत सुधारणा होते.कोरडवाहू लागवडीमध्ये पावसाचा ताण असल्यास उपलब्धतेनुसार संरक्षित पाणी द्यावे. अशावेळी एक सरी आड एक याप्रमाणे पाणी दिल्यास उपलब्ध पाण्यामध्ये अधिक क्षेत्रास संरक्षित पाणी/सिंचन देणे शक्य हेाते.
शेतकरी बंधुनो, कापूस पिकाच्या वर ज्या 4 मुख्य अवस्था सांगितल्या आहेत त्यावेळी पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घेतल्यास कापूस उत्पादनात भरघोस वाढ होते.कोणत्याही पिकास वापसा स्थितीतच पाणी दिले पाहिजे,वापसा स्थितीतच पांढऱ्या मुळी जास्त फुटतात व ह्या पांढऱ्या मुळीच अन्न ग्रहण करतात, म्हणून परतीचा पाऊस निघून गेल्यानंतर कापूस या पिकास 1/2 वेळा एकसरीआड एक अशा पद्धतीने पाण्याची/सिंचनाची गरज असते.
टीप 1
आता आपल्या कापूस पिकास, पाण्याची/सिंचनाची आवश्यकता असल्यास, एक उभारीचे किंवा काळे पाणी, एक आड एक सरी अशा पद्धतीनेच द्यावे, दुसऱ्या वेळी पाणी भरताना ज्या सरीत पाणी भरलेले नसेल त्या सरीत एक आड एक अशा पद्धतीनेच पाणी द्यावे
टीप 2
16 , 17 ,18, ऑक्टोबर या कालावधीत तापमान वाढून, स्थानिक ढग निर्मिती होऊन, खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्यातील, कापूस उत्पादक जिल्ह्यात, तुरडक ठिकाणी मेघ गर्जनेसह, चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. आपापल्या भागात पावसाचा अंदाज पाहूनच कापूस पिकास उभारीचे पाणी द्यावे
Share your comments