सध्या जर आपण सेंद्रिय शेतीच्या बाबतीत शेतकऱ्यांचा कल पाहिला तर तो आता हळूहळू वाढताना दिसून येत असून सेंद्रिय शेतीकडे आता बरेच शेतकरी सकारात्मक दृष्टिकोनातून बघत आहेत. रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनीच्या आरोग्यावर खूप मोठा विपरीत परिणाम होऊन त्याचा थेट परिणाम हा पिकाच्या उत्पादनावर देखील दिसून येत आहे. जर आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर सेंद्रिय शेती शिवाय पर्याय नाही.
जर आपण रासायनिक खतांच्या बाबतीत विचार केला तर उत्पादन खर्चात तर वाढ होतेच परंतु जमिनीची रासायनिक तसेच भौतिक, जैविक गुणवत्ता देखील खालावत जाते.
सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर पूर्णपणे बंद करून सेंद्रिय खते आणि सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर करणे अभिप्रेत असते. जर आपण सेंद्रिय शेतीमधील अन्नद्रव्य व्यवस्थापना विचार केला तर अनेक सेंद्रिय द्रावणांचा यामध्ये वापर करणे गरजेचे असते.
ते पिकावरील किडींच्या तसेच पिकाच्या पोषक घटकांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असतात. त्यामुळे या लेखामध्ये आपण अशाच तीन महत्त्वपूर्ण सेंद्रिय घटकांची माहिती घेणार आहोत. सेंद्रिय शेतीसाठी आणि पिकांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत.
सेंद्रिय शेतीतील महत्त्वपूर्ण घटक
1- अमृतपाणी- सेंद्रिय शेतीमधील हा एक महत्वपूर्ण पोषक घटक असून सोप्या पद्धतीने अमृत पाणी तयार करता येते. त्यासाठी तुम्हाला गाईचे दहा किलो शेण, गाईचे तूप 250 ग्रॅम आणि गूळ / मध पाचशे ग्रॅम हे मिश्रण 200 लिटर पाण्यामध्ये चांगले मिसळून तयार केलेले अमृत पाणी तुम्ही 30 दिवसांच्या अंतराने एक एकर क्षेत्रासाठी पाण्याच्या माध्यमातून पिकांना देणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर एक महिन्याचे पीक झाल्यानंतर झाडांच्या दोन ओळींमध्ये पाण्यातून देता येते.
नक्की वाचा:शेतकऱ्यांनो पपई लागवडीसाठी ऑक्टोबर महिना सर्वोत्तम; कमवू शकता लाखों रुपयांमध्ये उत्पन्न
2- दशपर्णी- दशपर्णी अर्क म्हणजे दहा वनस्पतींचा अर्क होय. यामध्ये तुम्ही कन्हेर, नीम, निर्गुंडी, घाणेरी, पपई, सिताफळ, एरंड, गुळवेल आणि रुई या दहा वनस्पतींचा वापर करावा लागतो. यामध्ये 20 ते 25 किलो पाला, दोन किलो हिरव्या मिरचीचा ठेचा, 250 ग्रॅम लसूण, तीन ते चार किलो शेण, तीन लिटर गोमूत्र हे मिश्रण दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून दररोज तीन वेळा हे मिश्रण ढवळून एक महिना आंबवून पिकावर फवारणीसाठी वापरतात.
अशाप्रकारे दोनशे लिटर अर्कांमधून गाळलेल्या पाच लिटर दशपर्णी अर्क अधिक त्यामध्ये पाच लिटर गोमूत्र दोनशे लिटर पाण्यात मिसळून रोग व किडींच्या नियंत्रणासाठी वापरता येते. दशपर्णी अर्काच्या वापरामुळे मुळकुजव्या, मर रोग तसेच भुरी, केवडा, करपा आणि तेल्या इत्यादी रोगांचे नियंत्रण होऊ शकते.
3- पंचगव्य- सेंद्रिय शेतीमध्ये पंचगव्याचे देखील महत्त्व असून पंचगव्य तयार करण्यासाठी पाच किलो शेण, नारळाचे पाणी/ गोमूत्र तीन लिटर,गाईचे दूध दोन लिटर, तूप एक किलो हे मिश्रण सात दिवस आंबवून दिवसातून दोन वेळा चांगले हलवून घ्यावे. तयार झालेले पंचगव्य दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून जमिनीवर पाण्यावाटे फवारावे. एका एकर साठी वीस लिटर पंचगव्य वापरणे शक्य असते.
Share your comments