जर आपण भाजीपाला पिकांचा विचार केला तर पूर्ण महाराष्ट्रमध्ये शेतकरी भाजीपाला उत्पादन घेऊ लागले आहेत. परंतु आपण प्रामुख्याने विचार केला तर भाजीपाला पिकांमध्ये जास्त करून शेतकरी भेंडी,वांगी,मिरची आणि वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये कारली,काकडी आणि दोडकेसारख्या भाजीपाला पिकाची लागवड करतात.
आपल्याला माहित आहेच की, कुठलाही पिकापासून भरघोस उत्पादनासाठी जेवढे व्यवस्थापन गरजेचे आहे तेवढेच पिकाची चांगली उत्पादनक्षम जातीची निवड तितकीच महत्त्वाची आहे. या लेखामध्ये आपण मिरची या पिकाच्या काही भरघोस उत्पादन देणाऱ्या जातींची माहिती घेऊ.
नक्की वाचा:भाजीपाल्यावरील किडींच्या प्रादुर्भावाकडे आताच लक्ष द्या
या आहेत मिरचीचे भरघोस उत्पादनक्षम जाती
1- तेजा फोर मिरची- ही मिरचीची जात काळ्या जमिनीमध्ये खूप चांगल्या प्रकारे उत्पादन देते. मिरचीला बाजारात देखील भाव चांगला मिळतो. जर आपण या जातीपासून मिळणाऱ्या उत्पादनाचा विचार केला तर एकरी 10 ते 12 क्विंटल उत्पादन मिळते व या जातीचे विशेष म्हणजे ही थ्रीप्स आणि हिरवा तुडतुडे या कीटकांना प्रतिकारक आहे.
2- राशी मिरची- ही जात काळी व मध्यम स्वरूपाच्या जमिनीत चांगले येते. चवीने मध्यम तिखट असून तोडा करण्यासाठी सोपी आहे. एकरी उत्पादन आठ ते दहा क्विंटल मिळते.
3- अग्निरेखा- मिरची तोडण्यास उपयुक्त असून एकरी उत्पन्न आठ ते दहा क्विंटल मिळते. तसेच भुरी व मर या रोगांना प्रतिकारक आहे.
4- फुले ज्योती मिरची- या जातीच्या मिरचीचा वापर हा मसाला पावडर बनवण्यासाठी खास करून केला जातो. या जातीच्या मिरचीपासून वाळलेल्या मिरचीचे एकरी उत्पादन 10 ते 12 क्विंटल मिळते. या जातीच्या मिरचीवर भुरी रोग कमी प्रमाणात येतो व फुलकिडी व पांढरी माशी या कीटकांना प्रतिकारक आहे.
5- तेजस्विनी मिरची- तिखट मिरचीची जात असून कोणत्याही प्रकारच्या जमिनीवर येऊ शकते. बाजारपेठेत योग्य भाव देखील मिळतो व एकरी उत्पन्न आठ ते दहा क्विंटल मिळते. मररोग आणि थ्रिप्स यांना प्रतिकारक आहे.
6-ब्याडगी मिरची- ही मिरचीची जात लाल मिरचीसाठी प्रामुख्याने वापरले जाते. हीचे वैशिष्ट्य म्हणजे ही दीर्घकाळ साठवून ठेवता येते व रंग फिकट होत नाही. या मिरचीचे साल जाड असल्यामुळे वजन जास्त भरते.
7- ज्वाला मिरची- ही मिरचीची तिखट जात असून लागवडीसाठी योग्य जात आहे.
8- पंत सी-1- हिरव्या व लाल मिरच्या अधिक उत्पादनासाठी या जातीची लागवड केली जाते.
9- फुले सई मिरची- ही जात देखील लागवडीसाठी उत्तम असून या मिरचीचा रंग वाळल्यानंतर गर्द लाल होतो. ही चवीने मध्यम तिखट आहे.
10- संकेश्वरी 32- या मिरचीची लागवड लाल मिरचीच्या उत्पादनासाठी केली जाते. या मिरचीचा रंग लाल व आकर्षक असतो व मध्यम तिखट असते. या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे ही प्रामुख्याने कोरडवाहू जमिनीत लावली जाते.
Share your comments