लागवडीला सोपी वाहतुकीला सोपी उत्पादनाला भरपूर,कमी भांडवलात येऊ शकणारी व टिकाऊ अशी दुधी भोपळ्याची भाजी गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच आवडते या भाजी पासून तयार होणारे दुधी हलवा,टुटीफ्रुटीसारखे टिकाऊ पदार्थ ही चे औद्योगिक महत्त्व अधोरेखित करतात.
या भाजीच्या सेवनाने हृदयविकार कमी होतो. दुधी भोपळा मध्ये पाणी 92.6 टक्के, प्रथिने 1.4 टक्के, सबी 0.1 टक्का, कार्बोदके 5.3 टक्के खनिज पदार्थ 0.6 टक्के कॅल्शियम 0.01टक्का,फास्फोरस 0.3टक्का, लोह 0.7 मि.ग्रॅ. प्रति 100 ग्रॅम आणि काही प्रमाणात अ व ब जीवनसत्व इत्यादी शरीरास पोषक असणारे घटक आढळतात. म्हणून आहारात यांचे महत्व अनन्य साधारण आहे.
- हवामान व जमीन:-
दुधी भोपळ्याची लागवड प्रामुख्याने खरीप व उन्हाळी हंगामात करतात.या पिकास उष्ण व दमट हवामान मानवते.थंडीत हे पीक टिकाव धरू शकत नाही.पाण्याचा चांगला निचरा होणारी हलक्या ते मध्यम काळ्याजमिनीत या पिकाची लागवड करणे फायदेशीर ठरते. उन्हाळी हंगामात हे पीक भारी कसदार जमिनीतही घेता येते.रेताड जमिनीत खरीप हंगामातील लागवड फायदेशीर ठरते. सूत्रकृमी आणि मर रोगाच्या जंतू असणारा जमिनीमध्ये या पिकाची लागवड करू नये.
- पूर्व मशागत आणि लागवड:-
जमिनीची मध्यम खोल नांगरट करावी. व जमीन तापू द्यावी. कुळवाच्या आडव्या-उभ्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. जमिनीच्या मशागतीच्या वेळी हेक्टरी 25 ते 30 टन चांगले कुजलेले शेणखत द्यावे.
सूत्रकृमींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी निंबोळी पेंड हेक्टरी 1800 ते 2000 किलो पीक लावण्या अगोदर जमिनीत मिसळावी. पिकात झेंडू लावल्यामुळे सुद्धा सूत्रकृमींचा बंदोबस्त होतो.
- सुधारित जाती :-
- सम्राट:- भोपळ्याचा हा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून निवड पद्धतीने विकसित करून प्रसारित केलेला आहे. या जातीची फळे दंडगोलाकार असून फळांची लांबी 30 ते 40 सेंटीमीटर असते. फळांचा रंग हिरवा असून त्यावर बारीक लव असते. फळे बॉक्स पॅकिंग व वाहतुकीसाठी सोयीस्कर आहेत. फळाचा तोडा लागवडीनंतर 60 दिवसांनी सुरू होतो. वेलीचे आयुष्य मान सरासरी 150 ते 160 दिवसांचे असते. लागवड जमिनीवर तसेच मंडपावर वेली पसरवून करता येते. प्रति हेक्टरी 400 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते.
- पुसा नवीन :- ही लवकर येणारी जात असून या जातीच्या फळांची लांबी 25 ते 30 सें.मी.आणि व्यास 5 ते 6 सें.मी. असतो.सरासरी वजन700 ते 900 ग्रॅम पर्यंत असते. या जातीचे हेक्टरी 150 ते 170क्विंटल उत्पन्न मिळते.
- अर्का बहार :- भारतीय उद्यान विद्या संशोधन केंद्र, बंगलोर येथून ही जात प्रसारित केली आहे. फळाचे सरासरी वजन एक किलो असूनरंग फिकट हिरवा असतो. हेक्टरी सरासरी 400 ते 500 क्विंटल उत्पादन मिळते.
- पुसा समर प्रोलिफिकलॉग(सी एस पी एल):-या जातीच्या फळांचा रंग पिवळसर किंवा हिरवा असतो. या जातीची कोवळी फळे 40 ते 50 सें.मी. लांबीची आणि 20 ते 25 सें.मी.जाडीचे असतात.या जातीपासून हेक्टरी 110 ते120 क्विंटल उत्पादन मिळते.
- पुसा मेघदूत :- हा संकरित वाण असून फळे लांब व फिखट हिरव्या रंगाचे असतात. हेक्टरी 300 क्विंटल उत्पादन मिळते.
Share your comments