शेतकरी आपल्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या शेतकरी कापूस पीक लागवडीवर जास्त भर देत आहे. महत्वाचे म्हणजे देशी कापसाचे नवे वाण बाजारात आले आहे, जे कमी दिवसात तयार होते.
परभणी येथील कापूस संशोधन केंद्र हे कापसाच्या देशी वाणावर संशोधन करणारे देशातील एकमेव कृषी संशोधन केंद्र आहे. कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा देशी वाणाकडे वळत आहे. कमी दिवसात तयार होणाऱ्या कापसाच्या या देशी वाणाविषयी सविस्तर जाणून घेऊया.
परभणी येथील कापूस संशोधन केंद्राने देशी कापसाचे पीए ८३७ (Desi Cotton PA: 837) हे सरळ वाण विकसित केलं आहे. या नवीन वाणास भारतीय कृषी संशोधन परिषदेने(ICAR) मान्यता दिलीय.
हे वाण रसशोषक किडी व दहीया रोगास सहनशील आहे. ते दक्षिण भारत विभागाकरिता प्रसारित करण्यात आलं आहे. हे वाण काही चाचण्यांनंतर लवकरच महाराष्ट्रात देखील प्रसारित केलं जाणार आहे.
देशी कापूस वाणाचे फायदे
1) देशी वाणांवर रसशोषक किडीचा प्रादुर्भाव होत नाही.
2) गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होतो.
3) देशी वाणांचा खर्च बीटीच्या तुलनेत कमी आहे.
4) महत्त्वाचे म्हणजे देशी तसेच सरळ वाणं ही कमी कालावधीची आहेत.
5) त्यामुळे कापसाचे नवीन देशी व सरळ वाण विकसित करण्यावर सरकारी संशोधन संस्था, कृषी विद्यापीठांनी भर दिला आहे.
6) कापसाच्या धाग्याची लांबी, मजबुती, तलमता तसेच पिकाची उत्पादकता यामध्ये देशी वाण सरस कसे ठरतील यावर संशोधन केले जात आहे.
पीए ८३७ या सरळ वाणाची वौशिष्ट्ये
या वाणाचे उत्पादन हेक्टरी १५ ते १६ क्विंटल मिळते.
हा वाण रसशोषक किडी, कडा करपा आणि दहीया रोगास सहनशील आहे.
परिपक्व होण्याचा कालावधी १५० ते १६० दिवसाचा आहे.
देशी कापसाचे बी पुढे चार वर्ष बियाणे म्हणून वापरता येते.
कोरडवाहू पद्धतीने कमी पाण्यात उत्पादन घेता येते.
Share your comments