1. कृषीपीडिया

जाणून घ्या दर्जेदार झेंडू उत्पादनाचे तंत्रज्ञान..

झेंडूचे डूचे पीक अनेक प्रकारच्या जमिनीत आणि निरनिराळ्या प्रकारच्या हवामानात उत्तम प्रकारे घेता येते. दसरा - दिवाळी या सणांच्या काळात झेंडूच्या फुलांना प्रचंड मागणी असते. झेंडूचे झाड १५ सेंटिमीटर ते १ मीटर उंचीपर्यंत वाढते. झेंडूचे खोड गोल, ठिसूळ असून त्यावर तंतुमय मुळे असतात. खोडावर अनेक फांद्या व उपफांद्या फुटतात. फांद्यांच्या टोकाला फुले लागतात. झेंडूची फुले अनेक प्रकारची असून त्यांना विविध रंग व आकार असतात. काढणीनंतरही ही फुले चांगली टिकतात.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
झेंडू उत्पादनाचे तंत्रज्ञान..

झेंडू उत्पादनाचे तंत्रज्ञान..

क्षेत्र आणि उत्पादन : झेंडूची लागवड पुणे, अहमदनगर, नाशिक, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, परभणी, नागपूर, अकोला इत्यादी जिल्ह्यांतून कमी - जास्त प्रमाणात केली जाते. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड, हवेली, पुरंदर, दौंड इत्यादी तालुक्यात, अहमदनगर जिल्ह्यात नगर व पारनेर तालुक्यात आणि कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील कमी पावसाच्या प्रदेशात सुद्धा झेंडूची लागवड केली जाते. महाराष्ट्रात झेंडू लागवडीखाली सुमारे २०० हेक्टर क्षेत्र आहे.

 

हवामान आणि जमीन : महाराष्ट्रातील हवामानात झेंडूचे पीक वर्षभर घेता येते. हे पीक उष्ण - कोरड्या तसेच दमट हवामानात चांगले वाढते. जोराचा पाऊस, कडक ऊन आणि कडक थंडी या पिकाला मानवत नाही. अती थंडीमुळे झाडाचे आणि फुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अति तपमानामुळे झाडाची वाढ खुंटते. फुलांच्या उत्पादन प्रक्रियेवर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. फुलांचा आकार अतिशय लहान होतो. अलीकडच्या काळात झेंडूच्या काही संकरित बुटक्या जाती विकसित करण्यात आल्या असून त्या थंड हवामानात उत्तम वाढतात.

 

झेंडूचे पीक अनेक प्रकारच्या जमिनीत उत्तम वाढू शकते. हलकी ते मध्यम जमीन झेंडूच्या पिकास मानवते. भारी आणि सकस जमिनीत झेंडूची झाडे खूप वाढतात. परंतु फुलांचे उत्पादन फारच कमी मिळते. तसेच फुलांचा हंगामही उशीरा मिळतो. झेंडूच्या पिकासाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली, पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि ७ ते ७.५ पर्यंत सामू असलेली जमीन चांगली मानवते. शेतीच्या बांधावर, रस्त्याच्या कडेला जी मोकळी जागा असते तेथे गाजर, गवत या ताणाचा फैलाव दिसतो. अशा ठिकाणी कमी श्रमात व कमी खर्चात झेंडूचे पीक घेता येईल व त्यामुळे तणांचा उपद्रवही कमी होईल

जाती : झेंडूमध्ये अनेक प्रकार आणि जाती उपलब्ध आहेत. झेंडूच्या झाडाची उंची, झाडाची वाढीची सवय आणि फुलांचा आकार यावरून झेंडूच्या जातीचे आफ्रिकन प्रकार आणि फ्रेंच प्रकार असे दोन प्रकार पडतात.

 

अ) आफ्रिकन झेंडू : या प्रकारातील झेंडूची झाडे १०० ते १५० सेंटीमीटर उंच वाढतात. फुले टपोरी असून फुलांना केशरी आणि पिवळ्या रंगाच्या छटा असतात. या प्रकारात पांढरी फुले असलेली जातही विकसित करण्यात आली आहे. या प्रकारातील फुले मोठ्या प्रमाणात हारासाठी वापरली जातात. या प्रकारातील प्रमुख जाती पुढीलप्रमाणे आहेत.

 

१) क्रेकर जॅक २) आफ्रिकन टॉंल डबल मिक्सड ३) यलो सुप्रीम ४) गियाना गोल्ड ५) स्पॅन गोल्ड ६) हवाई ७) अलास्का ८) आफ्रिकन डबल ऑरेंज ९) सन जाएंट

 

आ) फ्रेंच झेंडू : या प्रकारातील झाडे बुटकी ३० ते ४० सेंटीमीटर उंचीची आणि झुडूपासारखी वाढतात. फुलांचा आकार लहान ते मध्यम असून रंगात मात्र विविधता असते. या प्रकारातील प्रमुख जाती पुढीलप्रमाणे आहे.

 

१) स्पे २) बटरबॉल ३) फ्लेश ४) लेमन ड्रोप्स ५) फ्रेंच डबल मिक्स्ड या प्रकारातील जातींची रोपे प्रामुख्याने उद्यानातील फुलांच्या ताटव्यांमध्ये लावतात.

 

इ) फ्रेंच हायब्रिड : या प्रकारातील झाडे मध्यम उंचीची परंतु भरपूर फुले देणारी असतात. थंडीचा काळ वगळता इतर हंगामात याप्रकारातील झेंडू चांगला फुलतो. या प्रकारातील काही महत्त्वाच्या जाती पुढीलप्रमाणे आहेत.

 

१) पेटीट २) जिप्सी ३) हार्मनी हायब्रिड ४) रेड हेड ५) कलर मॅजीक ६) क्वीन सोफी ७) हार बेस्टमून

 

ई) झेंडूच्या प्रचलित जाती :

 

१) मखमली : ही जात बुटकी असून फुले लहान आकाराची असतात. या जातीची फुले दुरंगी असतात. ही जात कुंडीत लावण्यासाठी अथवा बागेच्या कडेने लावण्यासाठी चांगली आहे.

 

२) गेंदा : या जातीमध्ये पिवळा गेंदा आणि भगवा गेंदा असे दोन प्रकार आहेत. या जातीची झाडे मध्यम उंच वाढतात. फुलांचा आकार मध्यम असून हारासाठी या जातीच्या फुलांना चांगली मागणी असते.

३) गेंदा डबल : यामध्येही पिवळा आणि भगवा असे दोन प्रकार आहेत. या जातीची फुले आकाराने मोठी आणि संख्येने कमी असतात. कटफ्लॉवर म्हणून या जातीला चांगला वाव आहे.

 

अभिवृद्धी आणि लागवड पद्धती : झेंडूची लागवड बी पेरून रोप तयार करून केली जाते बियांपासून रोपे तयार करण्यासाठी २ x १ चौरस मीटर आकाराचे गादीवाफे तयार करावेत. या वाफ्यात चांगले कुजलेले शेणखत आणि कल्पतरू सेंद्रिय खत मिसळून घेऊन २.५ सेंटीमीटर अंतरावर जर्मिनेटरची बीजप्रक्रिया (३० मिली जर्मिनेटरचे १ लिटर पाण्यातून) करून बी पेरावे व ते मातीत झाकावे. बी हाताने दाबण्यापेक्षा त्यावर बारीक माती व राक यांचे मिश्रण टाकावे व हाताने सारखे करून नंतर झारीने पाणी द्यावे. बी उगवेपर्यंत सकाळ - संध्याकाळ झारीने पाणी द्यावे व नंतर वाफ्यातून पाटाने पाणी द्यावे.

 

बी तयार करण्यासाठी चांगली उमललेली, एकाच रंगाची, सारख्या आकाराची व एकाच जातीची फुले आणावीत व ती सुकवून घ्यावीत. फुले सुकल्यानंतर हाताने कुस्करून बी मोकळे करावे. खालच्या बाजूला काळे असणारे बी चांगले उगवते. बी तयार करणे शक्य नसल्यास खात्रीच्या ठिकाणा हून बी अथवा रोपे आणावीत. झेंडूमध्ये पर - परागीकरण होत असल्यामुळे बी राखणे आणि निवडणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपल्या शेतातच बी धरणे योग्य ठरते. त्यासाठी झेंडूचे पीक फुलांवर असताना निवडक झाडांवर न उमललेल्या फुलांस कापडी पिशवी बांधावी. ही सुरक्षित फुले झाडावर पुर्ण तयार होऊन उमलल्यावर तोडून त्यांचा हार करून सुरक्षित ठिकाणी वाळवावा. नंतर फुले कुस्करून बी मोकळे करून ते कापडी पिशवीत बांधून ठेवावे. असे बी पुढील हंगामात रोपे तयार करण्यासाठी वापरावे. झेंडूचे बी लांबट व वजनाने हलके असते. एक ग्रॅम वजनात झेंडूच्या सुमारे ३०० ते ३५० बिया असतात. एक हेक्टर लागवडीसाठी ७५० ते १२५० ग्रॅम बियाणे पुरेसे होते. लागवडीसाठी निवडलेले बियाणे शक्यतो मागील हंगामातील असावे. फार जुने म्हणजे २ हंगामापुर्वीचे बियाणे चांगले उगवण नाही. जुने बियाणे वापरावयाची वेळ आलीच तर जर्मिनेटरची बीजप्रक्रिया अवश्य करावी. त्यामुळे उगवण चांगली होईल.

 

रोपांना ५ - ६ पाने आल्यावर म्हणजे हंगामाप्रमाणे पेरणीनंतर ३ - ४ आठवड्यांनी रोपांची शेतात पुन्हा लागवड करावी. झेंडू फुलांचा हंगाम निवडताना फुलांना मागणी असलेल्या काळात फुले निघतील. या हिशेबाने लागवड करावी.

 

झेंडू लागवडीसाठी पुढीलपैकी पद्धत वापरावी:

 

१) नवीन फळबागेत आंतरपीक म्हणून पट्टा पद्धत

 

२) भाजीपाल्याच्या पिकात - मिश्र पीक म्हणून

 

३) कोरडवाहू पीक म्हणून अन्य पिकांबरोबर

 

४) झेंडूची स्वतंत्र लागवड

 

झेंडूची स्वत्रंत्र लागवड करताना जमीन हलकी नांगरून घ्यावी. नंतर दर हेक्टरी २० ते २५ गाड्या शेणखत आणि २०० ते २५० किलो कल्पतरू सेंद्रिय खत जमिनीत मिसळून सपाट वाफे अथवा सारी वाफे तयार करून या वाफ्यांमध्ये रोपांची लागवड करावी.

 

हंगाम आणि लागवडीचे अंतर : लागवडीपुर्वी जमिनीचा मशागत करून वरीलप्रमाणे खते आणि २५ किलो १०% लिंडेन अथवा कार्बारिल मातीत मिसळून सपाट वाफे अथवा सरी वाफे तयार करून घ्यावेत. जातीनुसार तसेच हंगामानुसार झेंडू लागवडीसाठी दोन ओळीत, दोन झाडात पुढीलप्रमाणे अंतर राखावे.

हंगामानुसार झेंडू लागवडीचे अंतर  

हंगाम   प्रकार   लागवडीचे अंतर  

पावसाळी   उंच   मध्यम उंच ६० x ६० सेंटिमीटर

६० x ४५ सेंटिमीटर

हिवाळी   उंच 

मध्यम उंच

बुटका ६० x ४५ सेंटिमीटर

४५ x ३० सेंटिमीटर

३० x ३० सेंटिमीटर

उन्हाळी   उंच 

मध्यम उंच ४५ x ४५ सेंटिमीटर 

४५ x ३० सेंटिमीटर

 

लागवड करताना प्रत्येक ठिकाणी निवडक असे एकच रोप लावावे. रोपे लावताना १० लि. पाण्यामध्ये १०० मिली. जर्मिनेटर घेऊन या द्रावणात रोपे बुडवूनच लागवड करावी. म्हणजे रोपे कमी वेळात स्थिरावून रोपांची मर होत (नांगी पडत) नाही.

वळण आणि छाटणीच्या पद्धती : झेंडूच्या पिकास वळण देण्याची अथवा छाटणी करण्याची आवश्यकता नसते. परंतु लागवडीनंतर चार आठवड्यांनी शेंडाखुडीचे काम केल्यास बाजूला अनेक फांद्या फुटतात. या अवस्थेत प्रिझम, थ्राईवर, क्रॉंपशाईनर आणि न्युट्राटोनची फवारणी केल्यास पिकाची नुसती वाढ न होता फांद्या फुटतात आणि फुलांची संख्या वाढते.

खते आणि पाणी व्यवस्थापन : फुलांचे एकसारखे आणि भरपूर उत्पादन मिळविण्यासाठी वरखते देणे आवश्यक आहे. पहिली खुरपणी झाल्यानंतर झेंडूच्या पिकाला हेक्टरी २५ किलो नत्र, २५ किलो स्फुरद आणि २५ किलो पालाश मिळण्यासाठी २५० किलो काप्तरारू सेंद्रिय खत देऊन झाडांना मातीची भर लावावी. फक्त नत्रयुक्त खत अथवा अधिक नत्र वापरल्यास पिकाची पालेदार वाढ जास्त होते आणि फुलांच्या उत्पादनात घट हे होऊ नये म्हणून यावर सप्तामृताच्या नियमित फवारण्या करणे. उत्पादन व दर्जाच्या दृष्टीने हमखास फायदेशीर ठरते.

 

झेंडूच्या पिकाला पावसाळ्यात आवश्यकतेनुसार १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. झाडांना कळ्या आल्यापासून तोडणी संपेपर्यंत पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये. तसेच याच काळात आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी देऊ नये. उन्हाळ्यात ५ ते ७ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

 

आंतरपिके: झेंडूचे पीक स्वतंत्र किंवा इतर पिकांत मिश्र पीक म्हणून घेता येतो. विशेषत: फळपिकांमध्ये झेंडूचे पीक आंतरपीक म्हणून घेता येते. काही प्रयोगांवरून असे दिसून आले आहे की, द्राक्षबागेत आणि पपईच्या पिकात झेंडूचे आंतरपीक घेणे फारच उपयुक्त ठरते. महाराष्ट्रात अनेक द्राक्षबागांतून सूत्रकृमींचा (निमॅटोड) उपद्रव वाढत आहे. निमॅटोडसाठी औषधे वापरणे खर्चाचे व अवधड काम आहे. अशा ठिकाणी झेंडू पीक घेतल्यास निमॅटोडचा उपद्रव कमी होतो. नवीन द्राक्षबागांतून सुरुवातीस १ - २ वर्षे वेलींमधील मोकळ्या जागेत हे पीक घेता येते. द्राक्षबागेतून झेंडूचे पिक पावसाळ्यात घेतल्यास फुलांचा हंगाम दसरा सणापर्यंत संपविता येतो. त्यामुळे द्राक्षाची ऑक्टोबर छाटणी करावयास अडचण येत नाही. झेंडूच्या पाना - फुलांत असणाऱ्या काही विशिष्ट गुणधर्मामुळे या पिकाला किडींचा त्रास होत नाही,म्हणून पपईच्या शेतातही झेंडूची लागवड करण्याचा कल आता वाढो लागला आहे. मिश्र पीक म्हणून लागवड करताना झेंडूच्या बुटक्या व हलक्या जाती निवडणे आवश्यक आहे .

 

महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण :

१) लाल कोळी (रेड स्पायडर माईट) : या किडीचा उपद्रव साधारणपणे फुले येण्याच्या काळात होतो. ही कीड पानांतील रस शोषून घेते. त्यामुळे झाडाची पाने धुरकट, लालसर रंगाची दिसतात.

उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात २० ग्रॅम (दोन काडेपेटी) प्रोटेक्टंट आणि २० ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक (८० %) या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावे.

२) केसाळ अळी (हेअरी कॅटरपीलर) : ही अळी झाडाची पाने कुरतडून खाते, त्यामुळे पानाच्या फक्त शिराच शिल्लक राहतात.

उपाय : या अळीच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात २० ग्रॅम प्रोटेक्टंट अथवा २० मिली क्विनॉलफॉस (२५% प्रवाही) या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावे.

३) तुडतुडे (लीफ हॉपर) : या किडीची पिले आणि पौढ कीड पानांतील रस शोषून घेते. त्यामुळे पाने वाळतात आणि नंतर सुकतात. कोवळ्या फांद्यांमधील रस शोषून घेतल्यामुळे फांद्या टोकांकडून सुकत जातात.

उपया : या किडीच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात २० ग्रॅम प्रोटेक्टंट आणि १५ मिली लिटर मॅलॅथिऑन (५०% प्रवाही) या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावे.

 

महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण :

१) मुळकुजव्या : झाडाच्या मुळांवर बुरशीची लागण झाल्यामुळे झाडाची मुळे कुजतात, मुळांवर तपकिरी रंगाचे डाग पडतात. मुळांवर सुरू झालेली कुज खोडाच्या दिशेने वाढत जाते. त्यामुळे रोपे कोलमडतात आणि मरतात.

उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात ३० मिली जर्मिनेटर आणि २५ मिली कॉपर ऑक्सिक्लोराईद या प्रमाणात मिसळून रोपांच्या मुळांभोवती जमिनीत ओतावे.

२) पानांवरील ठिपके : या बुरशीजन्य रोगामुळे पानांवर तपकिरी रंगाचे गोलसर ठिपके पडतात. या ठिपक्यांचा आकार वाढत जाऊन ते एकमेकांत मिसळतात. त्यामुळे पानांवर काळसर तपकिरी रंगाचे वेडेवाकडे डाग दिसतात. काही वेळा पानांच्या देठावर आणि फांद्यावरही बुरशीची लागण दिसून येते.

 

उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी १० ल्लीतर पाण्यात ३० मिली थ्राईवर, २५ मिली क्रॉंपशाईनर किंवा २० ग्रॅम डायथेन एम - ४५ (७५ % पाण्यात मिसळणारी पावडर) या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावे.

रोग, किडींवर प्रतिबांधक उपाय म्हणून आणि अधिक दर्जेदार झेंडू उत्पादनासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पुढीलप्रमाणे फवारण्या कराव्यात.

फवारणी :

 

१) पहिली फवारणी : (लागवडीनंतर १० ते १५ दिवसांनी) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १५ ० मिली. + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी ) : जर्मिनेटर ३५० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन २५० मिली + हार्मोनी २०० मिली. + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (लागवडीनंतर ४० ते ४५ दिवसांनी ) : थ्राईवर ७५० मिली.+ क्रॉंपशाईनर ७५० मिली. + राईपनर ५०० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली + हार्मोनी ३०० मिली. + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : (लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी ) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली + न्युट्राटोन ७५० मिली + हार्मोनी ४०० मिली. + २५० लि.पाणी.

फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री: झेंडू लागवडीनंतर २.५ ते ३ महिन्यांनी फुले येतात. जून महिन्यात लावलेल्या झेंडूच्या पिकाच्या फुलांची तोडणी ऑगस्ट - सप्टेंबर महिन्यात सुरू होते. तर जानेवारी महिन्यात लावलेल्या झेंडूची तोडणी मार्च - एप्रिल महिन्यामध्ये सुरू होते. झेंडूची पूर्ण उमललेली फुले देठाजवळ तोडून वेचणी करावी. हरांसाठी देठविरहित फुले तसेच गुच्छ किंवा फुलदाणीसाठी देठासह फुले तोडावीत. फुलांची तोडणी दुपारनंतर करावी. फुले तोडताना कळ्या व कोवळ्या फांद्या यांना इजा करून नये. तोडलेली फुले सावलीच्या ठिकाणी गारव्याला ठेवावीत. कटफ्लॉवर्ससाठी ६ ते ९ फुलांच्या जुड्या बांधून त्या कागदी खोक्यांतून विक्रीसाठी पाठवाव्यात.

 

झेंडूच्या पावसाळी पिकाचे उत्पादन हेक्टरी ६ ते ८ टन आणि उन्हाळी पिकाचे उत्पादन हेक्टरी ३ ते ५ टन मिळते. जातीपरत्वे उत्पादन कमी अधिक मिळते.

फुलांचे पॅकेजिंग आणि साठवण: फुलांच्या काढणीनंतर त्यांच्या रंग, आकार व जातीनुसार फुलांची प्रतवारी करावी व नंतर फुले बांबूच्या करंड्यात भरावीत. फुले बाजारात विक्रीसाठी पाठविताना पॉलिथीन पिशव्यांत अथवा पोत्यात भरून पाठवावीत. कटफ्लॉवर्ससाठी फुलांच्या जुड्या बांधून वर्तमानपत्रात गुंडाळून फुले कागदी खोक्यांत भरावीत. झेंडूची तोडणी केलेली फुले पॉलीथीनच्या पिशवीत थंड जागी ठेवल्यास ६ ते ७ दिवसांपर्यंत चांगली राहतात.

 

संकलन - गजानन वाल्हे

प्रतिनिधी - गोपाल उगले

 

English Summary: know about get more income of merigold Published on: 14 September 2021, 08:39 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters