सध्या काही दिवसांनी रब्बी हंगाम सुरू होईल व शेतकऱ्यांची रब्बी हंगामासाठीची तयारीची लगबग सुरू होईल. जर आपण रब्बी हंगामाचा विचार केला तर यामध्ये गहू आणि हरभरा ही दोन महत्त्वाची पिके आहेत. यापैकी आपण गहू पिकाचा विचार केला तर संपूर्ण भारत वर्षात गव्हाची लागवड फार मोठ्या प्रमाणावर केली जाते. गहू लागवडीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना चांगले उत्पादन देखील मिळते.
परंतु गहू वाढीच्या अवस्थेमध्ये अनेक टप्प्यांवर व्यवस्थापन खूप नियोजनाने करावे लागते. नाही तर उत्पादनात घट होऊन आर्थिक फटका बसण्याची मोठी शक्यता असते.
गहू पिकाच्या बाबतीत कीड व्यवस्थापन हा एक कळीचा मुद्दा असून गहू पीक ओंबी लागण्याच्या किंवा ओंबीमध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत प्रादुर्भाव होणाऱ्या मावा किडीच्या नियंत्रणाबद्दल महत्वपूर्ण माहिती घेऊ.
नक्की वाचा:अशी घ्या रब्बी हंगामात चारा पिके, असे असावे व्यवस्थापन
गहू पिकावरील मावा किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे
गहूपिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये जर या किडीचा प्रादुर्भाव झाला आणि व्यवस्थित नियंत्रणाच्या उपाययोजना केल्या नाहीत तर 40 टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. या किडीचा प्रादुर्भाव जर प्रतिझाड दहा कीडपर्यंत आढळला तर उपाययोजना करणे गरजेचे ठरते. मावा किडीचा गव्हावर प्रादुर्भाव झाला तर…
1- गहू पिकाची पाने पिवळसर होतात व रोगट दिसतात. परिणामी ते मरतात.
2- मावा किडीची पिल्ले व प्रौढ जमिनीलगतच्या खोडावर व मुळांवर राहुन त्यामधून रस शोषण करतात.
अशा पद्धतीने करा मावा किडीचे परफेक्ट नियंत्रण
1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गहू लागवड केलेल्या शेतांमध्ये पिवळे चिकट सापळ्यांचा वापर करावा.जेव्हा शेतात पंख असलेली मावा कीड उडताना या ट्रॅपला चिकटली तर नियंत्रणासाठी उपाययोजना करता येतात.
2- व्हर्टिसिलियम लेकॅनी किंवा मेटारायझियम ॲनासोपली 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे 10 ते 15 दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करणे गरजेचे आहे. या बुरशीचे जिवाणू मावा किडीच्या शरीराशी संपर्कात येऊन किडीला रोगग्रस्त करतात व तिचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यास मदत करतात. या बुरशीचे जिवाणू पूर्ण वर्षभर जमिनीत किंवा पिकांवर राहतात त्यामुळे पुन्हा किडीचा प्रसार थांबण्यास मदत होते.
3- थायमिथोक्साम ( 25%) एक ग्रॅम किंवा अॅसेटॅम्परीड पाच ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
4- गहू पिकाच्या मुळावरील मावा किडीच्या नियंत्रणासाठी दाणेदार फोरेट(10 जी) 10 ते 12 किलो प्रति हेक्टर याप्रमाणे शेणखतात मिसळून पिकांमध्ये जमिनीवर फोकून द्यावे. नंतर लगेच गव्हाला पाणी देणे सुरू करावे.
Share your comments