1. कृषीपीडिया

हरभरा पिक व्यवस्थापन

रब्बी हंगामात घेतल्या जाणार्‍या पिकापैकी हरभरा हे एक महत्वाचे कडधान्य पीक आहे. या पिकाचे शेती आणि मानवी आहारात अनन्य साधारण असे महत्व आहे. महाराष्ट्र राज्यातील गेल्या दोन-अडीच दशकामधील हरभरा लागवडीखालील क्षेत्र, उत्पादन आणि उत्पादकता याचे अवलोकन केले असता, यामध्ये सातत्याने वाढ झाल्याचे दिसून येते

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Gram Chick pea

Gram Chick pea

रब्बी हंगामात घेतल्या जाणार्‍या पिकापैकी हरभरा हे एक महत्वाचे कडधान्य पिक आहे. या पिकाचे शेती आणि मानवी आहारात अनन्य साधारण असे महत्व आहे. महाराष्ट्र राज्यातील गेल्या दोन-अडीच दशकामधील हरभरा लागवडीखालील क्षेत्र, उत्पादन आणि उत्पादकता याचे अवलोकन केले असता, यामध्ये सातत्याने वाढ झाल्याचे दिसून येते महाराष्ट्राच्या हरभर्‍याखाली क्षेत्र वाढत जाऊन सन 2017-18 मध्ये 88 लक्ष हेक्टर पर्यंत पोहचले आणि त्यापासुन 18.91 लक्षटन हरभरा निर्माण झाला. सरासरी हेक्टरी उत्पादकता 10.23 क्विं/हे पर्यंत जाऊन पोहचली प्रगतीशील शेतकर्‍यांच्या शेतावरील नव्या वाणांचे उत्पादन हेक्टरी 30 ते 35 क्विं/हे पर्यंत जाऊ शकते असा अनुभव आहे पारंपारिक पद्धतीमध्ये थोडासा बदल करुन पीक उत्पादन तंत्रज्ञानाची जोड देवून सुधारित वाणांचा वापर केल्यास या पिकापासून कोरडवाहु क्षेत्रातसुद्धा चांगले उत्पादन मिळते.

जमीन:

मध्यम ते भारी, काळी कसदार, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकासाठी उत्तम असते पाणथळ, चोपण, क्षारयुक्त जमिनीत हरभरा पेरणी टाळावी.

पेरणीची वेळ: 

जिरायत पेरणी वेळ 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर बागायत हरभरा पेरणी 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर.

बीजप्रक्रिया:

पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडरची किंवा दोन ग्रॅम थायरम अधिक दोन ग्रॅम कार्बेन्डेंझीम (बावीस्टीन) प्रती किलो बियाण्यास बीजप्रव्रित्र्या करावी व यानंतर 250 ग्रॅम रायझोबियम जीवाणू संवर्धनाची प्रती 10 किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणातून बीजप्रव्रित्र्या करावी.

पेरणी:

दोन ओळीत 30 से.मी व दोन रोपात 10 से.मी पेरणी अंतर ठेवावे बागायती हरभरा सरी वरंबा पध्दतीने सुध्दा चांगला येतो. तीन फुट रुंद सरीच्या वरंब्याच्या दोन्ही बाजूस 10 से.मी  अंतरावर टोकण पध्दतीने पेरणी करावी.

खत मात्रा:

पुर्व मशागतीच्या वेळी हेक्टरी 5 टन शेणखत टाकावे.
रासायनिक खते: नत्र, स्फुरद, पालाश 25:50:30 किलो प्रति हेक्टर म्हणजेच हेक्टरी 55 किलो युरिया व 300 किलो सुपर फॉस्फेट (किंवा या दोन खताऐवजी 125 किलो डीएपी) आणि 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश पेरणीच्या वेळी दयावे.  

हेही वाचा:तूर पिकात या रोगांचा प्रादुर्भाव होतोय का, मग असं करा व्यवस्थापन

बियाणे प्रमाण:  

हरभर्‍याच्या विविध दाण्यांच्या आकारमानानुसार बियाण्याचे प्रमाण वापरावे लागते. म्हणजे हेक्टरी रोपाची संख्या अपेक्षित मिळते. विजय या मध्यम दाण्यांच्या वाणाकरीता 65 ते 70 किलो, तर विशाल, दिग्विजय आणि विराट या टपोर्‍या दाण्यांच्या वाणाकरिता 100 किलो प्रती हेक्टर या प्रमाणात बियाणे पेरणीसाठी वापरावे. तसेच कृपा आणि पीकेव्ही 4 या जास्त टपोऱ्या काबुली वाणांकरीता 125-130 किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे. हरभरा सरी वरब्यांवरही चांगला येतो 90 सेमी रुंदीच्या सर्‍या सोडाव्यात आणि वरब्यांच्या दोन्ही बाजूला 10 सेमी अंतरावर बियाणे टोकण करावे. काबुली वाणसाठी जमीन ओली करून वापशावर पेरणी केली अंसता रुजवा चांगला होतो.

आंतरमशागत:

पीक 20-25 दिवसाचे असताना पहिली कोळपणी आणि 30-35 दिवसाचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणीनंतर दोन रोपातील तण काढण्यासाठी आवश्यकतेनुसार खुरपणी करावी.

पीक संरक्षण:

घाटे अंळी ही  हरभऱ्यावरील मुख्य किड आहे़ घाटे अळी ही कीड हरभऱ्याव्यतिरिक्त तूर, मका, सूर्यफुल, टोमॅटो, भेंडी, करडई, कापूस, ज्वारी, वाटाणा इ. पिकांवर उपजीविका करत असल्यामुळे या किडीचे वास्तव्य शेतात वर्षभर राहते म्हणून जमिनीची निवड करताना खरीप हंगामात यापैकी पिके घेतली असल्यास अशा जमिनीत हरभऱ्याचे पीक घेऊ नये पिकांच्या फेरपालटीकरिता तृणधान्य अथवा गळीतधान्याची पिके घ्यावीत, जमिनीची खोल नांगरट करावी  हेक्टरी 10-12 कामगंध सापळे लावावेत. यामध्ये मोठया प्रमाणावर पतंग अडकले जाऊन पुढील प्रजननास आळा बसतो. पक्ष्यांना बसण्यासाठी दर 15-20 मीटर अंतरावर काठया रोवाव्यात किंवा मचान बांधावीत म्हणजे कोळसा पक्षी, चिमण्या, साळुंकी, बगळे इ. पक्षी पिकावरील अळया पकडून खातात.

हरभरा पिकास फुलकळी येऊ लागताच 5 टक्के निंबोळी अर्काची (25 किलो/हे) पहिली फवारणी करावी. यासाठी 5 किलो निंबोळी पावडर 10 लिटर पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवावी. दुसऱ्या दिवशी सकाळी कापडाच्या सहाय्याने त्याचा अर्क काढावा आणि त्यामध्ये आणखी 90 लिटर पाणी टाकावे  असे एकूण 100 लिटर द्रावण 20 गुंठे क्षेत्रावर फवारावे पहिल्या फवारणीनंतर 10 ते 15 दिवसांनी हेलिओकील (विषाणू ग्रासीत अळयांचे द्रावण) 500 मिली 500 लिटर पाण्यातून प्रती हेक्टरला फवारावे तरीही किडीचा प्रादुर्भाव कमी न झालयास खालील दर्शविल्याप्रमाणे कोणत्याही एका किटकनााकाची फवारणी करावी.

हेही वाचा:वाचा ! पिकांमध्ये झिंकचे काय असतं कार्य

 

किटकनाशक प्रति 1 लिटर पाण्यामध्ये किटकनाशकाचे प्रमाण प्रति 10 लिटर पाण्यामध्ये किटकनाशकाचे प्रमाण किटकनाशकाचे प्रति एकर प्रमाण किटकनाशकाचे प्रति हेक्टर प्रमाण
प्रवाही 18.5 टक्के क्लोरअॅन्ट्रीनिलीप्रोल (कोराजन अथवा Vesticor BASF) 0.20 मिली 2.0 मिली 40 मिली

100 मिली

प्रवाही 48 टक्के फ्ल्युबेन्डॅमाईड (फेम)

0.25 मिली

2.5 मिली 50 मिली

125 मिली


पाणी व्यवस्थापन:

जिरायत हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्य असेल तर हरभरा पिकाला फुले येऊ लागताच पाणी द्यावे. बागायत हरभरा शेताची रानबाधंणी करताना दोन साऱ्यातील अंतर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच लांबी सुध्दा जमिनीच्या उतारानुसार कमी ठेवावी म्हणजे पिकाला प्रमाणशीर पाणी देण्यास सोयीचे होते. मध्यम जमिनीत 20 ते 25 दिवसांनी पहिले, 45 ते 50 दिवसांनी दुसरे आणि 65 ते 70 दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. भारी जमिनीकरिता पाण्याच्या दोनच पाळया पुरेशा होतात त्याकरिता 30-35 दिवसांनी पहिले व 60-65 दिवसांनी दुसरे पाणी दयावे. हरभरा पिकाला सर्वसाधारणपणे 25 सेंमी पाणी लागते. प्रत्येक वेळी पाणी प्रमाणशीर (7 ते 8 से.मी) देणे महत्वाचे असते. जास्त पाणी दिले तर पीक उभळण्याचा धोका असतो. स्थानिक परिस्थितीनुसार व जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळयांमध्ये अंतर ठेवावे. जमिनीस फार मोठ्या भेगा पडू देऊ नयेत. हरभरा पिकास एक पाणी दिल्यास 30 टक्के, दोन पाणी दिल्यास 60 टक्के आणि  तीन पाणी दिल्यास उत्पादनात दुप्पट  वाढ होते.

तुषार सिंचन: हरभरा पिकास वरदान

हरभरा पिकास तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास आणि सुधारित वाणांची लागवड केल्यास उत्पादनात मोठी वाढ होते. हे पिक पाण्यास अतिशय संवदेनशील असल्याने गरजेपेक्षा अधिक पाणी दिल्यास पीक उभळते आणि त्यामुळे उत्पादनात मोठी घट येते. यासाठी या पिकास तुषार सिंचन अतिशय उत्कृष्ट पध्दत आहे. तुषार सिंचन पध्दतीमुळे पिकास पाहिजे तेवढे आणि आवश्यक त्या वेळेला पाणी देता येते. पिकात तणांचा प्रादुर्भाव नेहमीपेक्षा तुषार सिंचन पध्दतीत कमी होतो आणि असलेले तण काढणे अतिशय सुलभ जाते. नेहमीच्या पध्दतीत पिकास अनेकदा प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिल्यामुळे मुळकुजसारखे रोग पिकावर येतात आणि पीक उत्पादन घटते. परंतु तुषार सिंचनाने पाणी अतिशय प्रमाणात देता येत असल्याने मुळकुज रोगामुळे होणारे नुकसान टाळता येते. 



हरभऱ्याचे सुधारीत वाण:

सुधारीत वाण

कालावधी

 उत्पादन (क्विं/हे)

वैशिष्टये

विजय

जिरायत: 85 ते 90 दिवस
बागायत: 105 ते 110 दिवस

जिरायत प्रायोगिक उत्पन्न: 14-15         
सरासरी: 14.00
बागायत प्रायोगिक उत्पन्न: 35-40
सरासरी: 23.00 
उशिरा पेर प्रायोगिक उत्पन्न: 16-18
सरासरी: 16.00   

अधिक उत्पादन क्षमता, मररोग प्रतिकारक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य, अवर्षण प्रतिकारक्षम, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात राज्यांंकरिता प्रसारित.

विशाल

100 ते 115 दिवस

जिरायत प्रायोगिक उत्पन्न: 14-15
सरासरी: 13.00                 
बागायत प्रायोगिक उत्पन्न: 30-35
सरासरी : 20.00  

आकर्षक पिवळे टपोरे दाणे, अधिक उत्पादनक्षमता, मररोग प्रतिकारक, अधिक बाजारभाव, महाराष्ट्राकरिता प्रसारित.

दिग्विजय

जिरायत: 90 ते 95 दिवस बागायत: 105 ते 110 दिवस

जिरायत प्रायोगिक उत्पन्न: 14-15
सरासरी: 14.00               
बागायत प्रायोगिक उत्पन्न: 35-40              
सरासरी: 23.00                 
उशीरा पेर प्रायोगिक उत्पन्न: 20-22
सरासरी: 21.00

पिवळसर तांबूस, टपोरे दाणे, मर रोग प्रतिकारक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य, महाराष्ट्राकरिता प्रसारित.

विराट

110 ते 115 दिवस

जिरायत प्रायोगिक उत्पन्न: 10-12
सरासरी: 11.00               
बागायत प्रायोगिक उत्पन्न: 30-32
सरासरी: 19.00  

काबुली वाण, अधिक टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक, अधिक बाजारभाव, महाराष्ट्राकरिता प्रसारित.

कृपा

105 ते 110 दिवस

बागायत प्रायोगिक उत्पन्न: 30-32
सरासरी : 18.00  

जास्त टपोरे दाणे असणारा काबुली वाण, दाणे सफेद पांढऱ्या रंगाचे, सर्वाधिक बाजारभाव, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि कर्नाटक राज्यांकरिता प्रसारित.

 

फुले विक्रम

जिरायत: 95 ते 100 दिवस 
बागायत: 105 ते 110 दिवस

जिरायत प्रायोगिक उत्पन्न: 16-18  सरासरी: 16.00 
बागायत प्रायोगिक उत्पन्न: 35-42 सरासरी: 22.00  
उशीरा पेर प्रायोगिक उत्पन्न:  20-22
सरासरी: 21.00

वाढीचा कल उंच असल्यामुळे यांत्रिक पदधतीने (कंबाईन हार्वेस्टरने) काढणी करण्यास उपयुक्त वाण, अधिक उत्पादन क्षमता, मररोग प्रतिकारक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य, महाराष्ट्राकरिता प्रसारित.

पीकेव्हीके 2

110 ते 115 दिवस

बागायत सरासरी: 16-18  

अधिक टपोरे दाणे असणारा काबुली वाण, महाराष्ट्राकरिता प्रसारित.

पीकेव्हीके 4

105 ते 110 दिवस

बागायत सरासरी: 12-15 

जास्त टपोरे दाणे असणारा काबुली वाण, महाराष्ट्राकरिता प्रसारित.

बीडीएनजी 797

105 ते 110 दिवस

जिरायत: 14-15 
बागायत: 30-32

मध्यम आकाराचे दाणे मराठवाडा विभागासाठी प्रसारित.

साकी 9516

105 ते 110 दिवस

बागायत प्रायोगिक उत्पन्न: 30-32
सरासरी: 18-20 

मध्यम आकाराचे दाणे, मर रोग प्रतिकारक, जिरायत तसेच बागायत  पेरणीस योग्य महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात राज्यांकरिता प्रसारित.

जाकी 9218

105 ते 110 दिवस

बागायत प्रायोगिक उत्पन्न: 30-32
सरासरी: 18-20 

पिवळसर तांबूस, टपोरे दाणे, मर रोग प्रतिकारक, जिरायत तसेच बागायत पेरणीस योग्य, महाराष्ट्राकरिता प्रसारित.

 

डॉ. नंदकुमार कुटे, प्रा. लक्ष्मण म्हसे, प्रा. अशोक चव्हाण, आणि डॉ. सुदर्शन लटके
(कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

English Summary: Gram Chick pea Cultivation Published on: 08 October 2018, 02:29 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters