अश्वगंधा बहुगुणी वनस्पती असून तिचे विविध गुण व उपयोग दिवसेंदिवस माहित होत आहे. अनेक रोगांवर उपयुक्त, किंबहुना सर्व रोग नाशक म्हणून जिनसेनच्या तोडीची वनस्पती म्हणून ती ओळखली जाते. ही वनस्पती अश्व शक्तीचे प्रतीक मानले जाते हिच्या सेवनाने अंगी अश्व प्रमाणे शक्ती येते तसेच मुळ्यांचा घोड्याच्या लिदे प्रमाणे गंध येतो म्हणून दिला अश्वगंधा असे म्हणतात.
भारतात अश्वगंधा लागवडीसाठी मध्य प्रदेश हे राज्य आघाडीवर आहे. महाराष्ट्रातील जळगाव, बुलढाणा, अकोला, पुणे, अहमदनगर,नाशिक या जिल्ह्यामध्ये अश्वगंधाचे लागवडीखालील क्षेत्र वाढत आहेत.
अश्वगंधा
रोपे काहीशी वांग्याच्या रोपासारखी दिसतात. झुडूप 50 ते 100 सेंटीमीटर वाढते .झाडांना वर्षभर पाणी मिळाले तर 3 ते 4 वर्ष वाढत राहते. झाडांची पाने हिरवी बारीक असतात अगदी वांग्याच्या छोट्या पानाप्रमाणे, फुले लहान, देठवीरहित, हिरवी असून पुष्पकोषने झाकलेली मोदकाच्या आकाराची व थोडी तांबडी असतात.
.रोगविरहित वनस्पती
अश्वगंधा वर कोणत्याच प्रकारची कीड अथवा रोग येत नाही. त्याचप्रमाणे झाडांना जनावरे खात नाही. या पिकावर फवारणीचा तसेच राखणीचा खर्च येत नाही. त्यामुळे या पिकाचा उत्पादन खर्च कमी होतो.
उपयोग
अश्वगंधा पुरुष प्रधान रोगावर गुणकारी असली तरी स्री रोगावरही तितकेच उपयुक्त आहे. अश्वगंधाच्या मुळाची भुकटी लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत सर्वांना उत्तम प्रकारचे टॉनिक आहे. मुळामध्ये असलेल्या अल्कोलाईडमुळे अशक्तपणा, नपुसकत्व नाहीसे होते. तसेच स्त्रियांमध्ये गर्भधारणा होण्यास व पुरुषांमध्ये शुक्र पेशीच्या वाढीस मदत होते. शूज, क्षय,कृमी, कुष्ठरोग त्वचारोग, आमवात, श्वेत प्रदर, कफ,वात, सांधेदुखी, रक्तविकार, या आजारावर मुळ्या उपयोगी आहेत. यांच्या पानांचे दररोज सेवन केल्यास शरीरातील चरबी कमी होते व प्रकृती सडसडीत आणि उत्साहवर्धक राहते.
रासायनिक घटक
मुळामध्ये 0.13 ते 0.30 अल्कोलाइड असून सोम नाईन, सोमनिफेईन,सुदोविथाईंन, निकोटीन हे रासायनिक घटक आहेत.
सुधारित वाण
विभागीय कृषी संशोधन केंद्र, मदसोर (जवाहरलाल नेहरु विद्यापीठ) यांची डब्ल्यू एस 20 तसेच केंद्रीय औषधी व सुगंधी वनस्पती संस्था, लखनऊ यांनी पोशिता व निमित्त या जाती विकसित केलेल्या आहेत.
जमीन व हवामान
चांगला निचरा, मध्यम, काळी, कसदार जमीन या पिकासाठी चांगले असते. नदीकाठच्या गाळावर जमिनीमध्ये अश्वगंधाची उत्पादन चांगले येते. लाल मातीच्या जमिनीत चांगली वाढ होते. अश्वगंधा चे पीक उष्ण व समशीतोष्ण हवामानात चांगले येते. पावसाळी हवामान या पिकाला पोषक ठरते कारण या हवामानात मुळांची वाढ होते व त्यांची गुणवत्ता वाढते.
रोपनिर्मिती
रूप वाटिका तयार करण्याची पद्धत वांग्याच्या पिकाप्रमाणे असते. रोपवाटिका तयार करण्यासाठी मे जून महिन्यात हमखास पाण्याची सोय असलेली जमीन निवडावी. शेतात जमिनीचे पूर्वमशागत करून जमीन सपाट करून घ्यावी. नंतर गादीवाफे तयार करून घ्यावे. प्रत्येक वाफ्यात एक पाटी कुजलेले शेणखत मिसळावे. एक हेक्टर लागवडीसाठी एक ते दीड किलो बियाणे पुरेसे आहेत. गादीवाफ्यावर दहा सेंटिमीटर अंतरावर दोन-तीन सेंटिमीटर खोलीच्या का कण्या घ्याव्यात. प्रत्येक वेळेला दोन तीन ग्रॅम युरियाची मात्रा दिल्यास रोपे जोमदार होतात. पुनर्लागवडीसाठी पाच सहा आठवड्याची रोपे तयार होतात.
पूर्वमशागत
जमीन आडवी उभी नांगरून कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या घालाव्या. हेक्टरी 20 ते 25 गाड्या कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत मातीत मिसळावे. शेणखत किंवा कंपोस्ट खत दिल्यामुळे मुळ्यामधील घटकाची गुणवत्ता वाढते व चांगला बाजारभाव मिळतो.
पुनर्लागवड
अश्वगंधा ची लागवड सरी वरंब्यावर करावी. 60 ते 70 सेंटिमीटर अंतरावर सरी वरंबे तयार करावेत. वरंब्याच्या दोन्ही बाजूंनी दोन रोपात पंधरा ते वीस सेंटिमीटर अंतर ठेवून लागवड करावी. लागवडीच्या वेळेस 25: 50:00 किलो नत्र स्फुरद हेक्टरी घ्यावे त्यानंतर 40ते 50 दिवसांनी 20 ते 30 किलो नत्राचा दुसरा हप्ता द्यावा.
अंतर मशागत व पाणी
सुरुवातीला दोन-तीन खुरपण्या करून पीक तणविरहित ठेवावे. हे पीक बहुवर्षीय आहे व डोंगरात तसेच कोरडवाहू भागातही घेता येते तरीसुद्धा लागवड केल्यास व शक्य त्यानुसार हंगामानुसार व जमिनीच्या प्रकारानुसार पाणी द्यावे. हलक्या जमिनीत दहा बारा दिवसांनी आणि मध्यम भारी जमिनीत पंधरा-वीस दिवसांनी पाणी द्यावे.
काढणी तंत्रज्ञान व मुळ्याची प्रतवारी
लागवडीनंतर सुमारे सहा महिन्यांनी मुळ्याची काढणी करावी. मुलांचे 7ते10 सेंटिमीटर लांबीचे तुकडे करून पाण्याने स्वच्छ धुऊन सावलीत वाळवावेत. मुळांची लांबी व जाडी नुसार प्रतवारी करावी
उत्पादन
साधारणपणे हेक्टरी 100 किलो बी व 12 ते 15 क्विंटन चुकलेली मुळे दिसतात. औषधी म्हणून मुळ्यांचा वापर होतो. बी लागवडीसाठी उपयोगी पडते.
बाजार भाव
सुकलेल्या मुळ्या रुपये 150 ते 200 प्रति किलो प्रमाणे बाजार भाव मिळतो. त्यासाठी औषधे तयार करणाऱ्या कंपनीशी करार करून किंवा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांशी चर्चा करून या पिकाची लागवड करावी.
लेखक -
विजय ढेपे
Msc. Horticulture
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी
88558 09488
सुशील दळवी
सहाय्यक प्राध्यापक विवेकानंद कृषी महाविद्यालय हिवरा आश्रम
महेश गडाख
Msc (Agri)
Share your comments