कोथिंबीर हे कमी वेळात येणारे चांगल्या आर्थिक नफा देऊन जाणारे उत्तम पीक आहे. साधारणतः कोथिंबिरीला वर्षभर बाजारात चांगल्या प्रकारचे मागणी असते. व्यवस्थित तंत्रज्ञानाचा वापर करून आणि व्यवस्थित नियोजन केले तर कोथिंबीरीचे पीक हमखास भरघोस नफा मिळवून जाते. या लेखांमधून आपण कोथिंबीर लागवड विषयी माहिती घेऊ.
तसे पाहायला गेले तर कोथिंबिरीचा वापर हा अगदी घरापासून ते हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे कोथिंबिरीला वर्षभर चांगली मागणी असते. कोथिंबिरीची लागवड ही प्रमुख्याने पावसाळी व हिवाळी हंगामात केली जाते. उन्हाळ्यामध्ये उष्णतेमुळे कोथिंबिरीचे उत्पादन कमी निघत असलेले तरी प्रचंड मागणीच्या तुलनेत पुरवठा हा फारच कमी असतो. त्यामुळे चांगला बाजार भाव मिळून उत्तम आर्थिक नफा मिळतो.
कोथिंबीर पिकासाठी लागणारी जमीन
मध्यम कसदार आणि मध्यम खोलीची जमिन कोथिंबीर पिकासाठी योग्य असते. परंतु माती जर पोषणमूल्य भारित असेल तर हलक्या जमिनीतही कोथिंबीर शेती चांगल्या पद्धतीने होऊ शकते. माती परीक्षण करून जर योग्य खतांचा पुरवठा केला तर जमिनीचा पोत सुधारून हलक्या जमिनीत सुद्धा कोथिंबिरीचे उत्पादन घेता येते.
कोथिंबिरीसाठी लागणारे हवामान
कोथिंबिरीची लागवड कोणत्याही हवामानात करता येते. परंतु अति पाऊस असेल किंवा उन्हाळ्यात अति ऊन असेल तर कोथिंबीरीची वाढ हव्या त्या प्रमाणात होत नाही. पाण्याच्या स्त्रोत चांगला असेल तर उन्हाळ्यात देखील कोथिंबीर लागवड करून जास्त नफा मिळवता येऊ शकतो. महाराष्ट्राचा एकंदरीत विचार केला तर अति पावसाचा प्रदेश वगळून महाराष्ट्रातील हवामान वर्षभर कोथिंबीरीची लागवडसाठी पोषक आहे. उन्हाळ्यात तापमान ३६ अंश सेल्सिअसच्यावर गेल्यास कोथिंबिरीची वाढ कमी होते.
लागवडीचा हंगाम
कोथिंबिरीची लागवड रब्बी, खरीप आणि उन्हाळी अशा तीनही हंगामात करता येते. उन्हाळी हंगामात एप्रिल ते मे महिन्यात कोथिंबीरीचे उत्पादन घ्यावे.
कोथिंबीरीची लागवड पद्धत
सुरुवातीला ज्या जमिनीत कोथिंबिरीचे उत्पन्न घ्यायचे आहे, त्या जमिनीची चांगल्या पद्धतीने नांगरट करून घ्यावी. रोटावेटरने जमीन उत्तम प्रकारे भुसभुशीत करून घ्यावी. तीन बाय दोन मीटर आकाराचे सपाट वाफे बनवून प्रत्येक वाफ्यात ८ ते १० किलो चांगले कुजलेले शेणखत टाकून व्यवस्थित जमिनीत मिसळून घ्यावे. वाफे एकसमान पद्धतीने सपाट करावेत जेणेकरून बी सारख्या प्रमाणात पडेल. या पद्धतीने बी फोकून पेरावे. बी हलक्या मातीने झाकून हलकेसे पाणी द्यावे. तणांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसत असेल तर १० ते १५ सेंटिमीटर अंतरावर खुरप्याने उथळ ओळी पाडून बी पेरावे नंतर मातीने झाकून द्यावे. जर उन्हाळी हंगामात पेरणी करायची असेल तर, वाफे चांगल्या पद्धतीने ओलित करून घ्यावेत. वाफसा आल्यानंतर बियाणे पेरावे. कोथिंबीर लागवडीसाठी एकरी २५ ते ३५ किलो बियाणे लागते. लागवडीआधी धने हळुवार पद्धतीने रगडून फोडून घ्यावेत व त्यातील बी वेगळे करावे. पेरणीपूर्वी धन्याचे बी भिजवून गोणपाटात गुंडाळून ठेवावे.
कोथिंबिरीसाठी खत व पाणी व्यवस्थापन
कोथिंबीर लागवड ज्या जमिनीत करायची आहे त्या जमिनीत लागवड आधी ५ ते ६ टन चांगले कुजलेले शेणखत टाकून घ्यावे. कोथिंबीर उगवल्यानंतर साधारणतः ३५ ते ४० दिवसांनी ४० किलो नत्राची मात्रा द्यावी. तिच्यासोबत २५ दिवसांनी १०० लिटर पाण्यात ८०० ग्रॅम युरिया मिसळून दोन फवारण्या करून घ्याव्यात. त्यामुळे कोथिंबिरीची वाढ उत्तम होते. कोथिंबीर एक कोवळी पीक असल्यामुळे त्याला नियमित पाण्याची गरज असते त्यामुळे उन्हाळ्यात दर ४ ते ५ दिवसांनी हिवाळ्यात ७ ते ८ दिवसांनी पाणी द्यावे.
कोथिंबीरवरील कीड व रोग
कोथिंबीर पिकावर रोगांचा आणि किडीचा प्रादुर्भाव हा अल्पशा होतो. कधी-कधी मर, भुरी या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. अशावेळी शिफारस केल्याप्रमाणे औषधांचा वापर केला तर भुरी रोग नियंत्रणात येऊ शकतो, तसेच पाण्यात विरघळणारे गंधक वापरावे.
कोथिंबीरीचे काढणी व उत्पादन
लागवडीनंतर कमीत-कमी ३५ ते ४० दिवसांनी कोथिंबीर १५ ते २० सेंटीमीटर वाढते. त्यावेळी ती उपटून किंवा कापून काढणी करावी. दोन महिन्यानंतरच्या कालावधीमध्ये कोथिंबिरीला फुले येण्यास सुरुवात होते. फुले येण्याच्या आधीच कोथिंबिरीची काढणी करणे आवश्यक असते. पावसाळी आणि हिवाळी हंगामात ४ ते ५ टन एकरी उत्पादन मिळते. उन्हाळी हंगामात हेच उत्पादन २ ते ३ टनांपर्यंत मिळते. पण पुरवठा कमी असल्यामुळे चांगला भाव मिळाल्याने चांगला पैसा हाती येतो.
कोथींबीरीच्या काही सुधारित जाती
डी ९२, डी ९४, जे २१४, एन पीजे १६व्ही, को-१, कोईमतूर २, जळगाव धना, वाई धना या प्रकारच्या स्थानिक व सुधारित जाती लागवडीसाठी वापरले जातात.
लेखक-
रत्नाकर पाटील-देसले.
Share your comments