खोडवा ऊस बरेच शेतकरी ठेवतात. या खोडवा उसाचे योग्य व्यवस्थापन केले तर लागवडी एवढेच उत्पादन मिळू शकते. परंतु त्यासाठी व्यवस्थापनामध्ये बऱ्याच गोष्टी काळजीपूर्वक करणे गरजेचे असते.
त्यामध्ये खोडवा उसामध्ये पाचट कुजवणे, व्यवस्थित अंतर मशागत, खुरपणी करून तण मुक्त ठेवणे, सेंद्रिय व रासायनिक अशा दोन्ही प्रकारच्या खतांचा अगदी संतुलित वापर, आणि गरजेनुसार योग्य पाण्याचे व्यवस्थापन केला तर नक्कीच खोडव्या पासून चांगले उत्पादन मिळू शकते. या लेखामध्ये आपण खोडवा उसापासून जास्त उत्पादन मिळवण्यासाठी काही आवश्यक पण महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ.
नक्की वाचा:मोठी बातमी! या पद्धतीने e-KYC केली नाही तर PM Kisan चा 11 वा हफ्ता बँकेत जमा होणार नाही
खोडवा उसापासून अधिक उत्पादनासाठी वापरा या टिप्स
1- जेव्हा ऊस तोडणी चालू असते त्यावेळी पाचट ओळीमध्ये न लावता जागच्याजागी ठेवावे. पाचटाचे ढीग पसरवून घ्यावी. तोडलेल्या उसाच्या बुडख्यावर पाचट असेल तर बाजूला सरीमध्ये लोटावे वरून उसाचे बुडखे मोकळे करावेत जेणेकरून त्यांना सूर्यप्रकाश मिळेल व नवीन कोंब जोमदार येतील.
2- बुडख्यांची छाटणी करावी कारण छाटणी केली नाही तर जमिनीच्या वरील कांडी पासून डोळे फुटतात व असे फुटवे खूपच कमजोर असतात.
3- बुडख्यांच्या छाटणी केल्यानंतर लगेच 0.1 टक्के बाविस्तीन या बुरशीनाशकाची फवारणी करावी त्यामुळे मातीतून होणारे बुरशीजन्य रोगांना अटकाव होतो.
4- सरीमध्ये जी पाचट ठेवलेली असते त्या पाचटावर प्रति हेक्टरी 80 किलो युरिया, 100 किलो दाणेदार सुपर आणि 100 किलो पाचट कुजविणारे जिवाणू संवर्धन सेंद्रिय खतामध्ये अथवा ओलसर मातीमध्ये मिसळून अगदी सारख्या प्रमाणात पाचट वर पसरून द्यावे. पाचट कुजविण्यासाठी नत्र,स्फुरद आणि पाचट कुजविणारे जिवाणू ची गरज असते.
5- खोडव्याला पाणी दिल्यानंतर तीन ते चार दिवसांनी वाफसा आला की रासायनिक खतांचा पहिला डोस द्यावा. हा डोस देताना पहारी सारख्या अवजाराच्या साह्याने जमिनीत वाफसा असताना दोन समान हप्त्यात विभागून द्यावे.
6- खतांचा पहिला डोस 15 दिवसांच्या आत पूर्ण करावा. यासाठी पहार किंवा कुदळ वापरून बुडख्यापासून 15 ते 20 सेंटिमीटर अंतरावर वरंब्याच्या बगलेत पंधरा ते वीस सेंटीमीटर खोल चर द्यावा. दोन चरातील अंतर 30 सेंटिमीटर ठेवून सरीच्या एका बाजूला पहिला रासायनिक खतांचा डोस द्यावा.
7- रासायनिक खतांचा दुसरा डोस हा सरीच्या विरुद्ध बाजूस त्याच पद्धतीने 120 दिवसांनी द्यावा. नंतर नेहमीप्रमाणे पाणी सुरू ठेवावे.
8- खोडवा उसापासून जास्त उत्पादन मिळवायचे असेल तर एकरी 60 किलो सल्फर द्यावे.
9- खोडवा ऊसापासून अधिक व खात्रीशीर उत्पादन हवे असेल तर खोडवा उसावर विद्राव्य खतांच्या दोन फवारण्या खोडवा घेतल्यानंतर 30 ते 45 दिवसांनी घ्याव्यात.
10- विद्राव्य खताच्या पहिल्या फवारणीसाठी चिलेटेड कॉम्बी एक ग्रॅम, कॅल्शियम नायट्रेट पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
11- जेव्हा विद्राव्य खतांची दुसरी फवारणी कराल तेव्हा 24:24:00,13:00:45 तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. त्यामुळे खोडव्याची शाखीय वाढ जोमदार होते.
12- प्रभावित खोडवा उसाचे व्यवस्थापन करायचे असेल तर साधारणपणे 15 फेब्रुवारीपर्यंत तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवावा. कारण 15 फेब्रुवारी नंतर घेतलेल्या खोडवा उसावर खोडकिडीचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो.
Share your comments