वांगी हे उष्णकटिबंधीय प्रदेशातील प्रमुख भाजीपाला पीक असून या पिकाची लागवड महाराष्ट्रासह पुर्ण देशात वर्षभर मोठ्या प्रमाणात केली जाते. बाजारपेठेत वांग्याला मागणी वर्षभर राहत असल्यामुळे व्यापारीदृष्ट्या हे एक महत्वाचे भाजीपाला पीक बनले आहे. वांगी हे भारतीय आहारातील अविभाज्य घटक बनले असून समाजातील सर्व स्तरातील लोकांमध्ये लोकप्रिय आहे.
वांग्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्व ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ तसेच लोह या खनिजाचे पुरेसे प्रमाण असते. परंतु आपल्या आहारासाठी योग्य ठरणाऱ्या वांग्यालाही पोषक गोष्टीची पुर्तता करावी लागते. ज्यापद्धतीने आपण आपले आरोग्य निरोगी राहावे यासाठी विविध अन्न पदार्थातून जीवनसत्त्व मिळवत असतो. त्याचप्रमाणे वांग्याच्या पिकाला योग्य खत दिले गेले पाहिजे. आज आपण या लेखातून वांग्याच्या शेतातील खत व्यवस्थापन कशाप्रकारे केले गेले पाहिजे याची माहिती घेऊ.
वांगी पिकाचे एकात्मिक खत व्यवस्थापन करतांना प्रामुख्याने जमिनीचा प्रकार उदा. हलकी ते मध्यम, मध्यम व भारी असे वर्गीकरण करावे. तसेच वांग्याच्या विविध जातींनुसार सुधारित जाती आणि संकरीत जाती इत्यादी बाबींचा विचार करून खत व्यवस्थापन करावे लागते.
वांगी पिकाचे खत व्यवस्थापन चार घटकांमध्ये केले जाते.
- जिवाणू खतांचा वापर
- सेंद्रिय खतांचा वापर
- रासायनिक खत व्यवस्थापन
- सुक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन
जिवाणू खतांचा वापर-
वांगी पिकाची रोपवाटिकेत लागवड करण्यापूर्वी जिवाणू खतांचा किंवा संवर्धकांचा वापर करून बीज प्रक्रिया करणे आवश्यक असते. त्यासाठी एक किलो बियाण्याला २०-२५ ग्रॅम अझोटोबॅक्टर व २०-२५ ग्रॅम पी.एस.बी. ज्याला आपण फॉस्फेट सोलुबलायजींग बॅक्टेरिया असे म्हणतो, हे जिवाणू खते चोळून बीज प्रक्रिया करावी. किंवा अलीकडे अझोटोबॅक्टर, पी.एस.बी. व ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीचे एकत्रित मिश्रण सुद्धा उपलब्ध झाले आहेत, त्याला बियोमिक्स असे म्हणतात. लागवडीपूर्वी २०-२५ ग्रॅम बायोमिक्स या जिवाणू खतांची बीज प्रक्रिया केल्यास रोपांना सुरुवातीपासूनच नत्र व स्फुरद या अन्नद्रव्यांची उपलब्धता होते व पिकाची वाढ एकसमान व चांगली होते. तसेच ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीमुळे प्राथमिक अवस्थेतच बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण होण्यास मदत होते. याशिवाय हेक्टरी ४ किलो बायोमिक्स १००-२०० किलो शेणखतात मिसळून शेतात टाकल्यास जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होऊ शकते.
सेंद्रिय खतांचा वापर-
रासायनिक खतांचा अतिरेकी वापर झाल्यामुळे अलीकडच्या काळात जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण फार कमी झाले आहे त्यामुळे जमिनीमध्ये उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाणसुद्धा कमी झाले आहे. त्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढविणे आवश्यक झाले आहे. त्या अनुषंगाने जमिनीमध्ये सेंद्रिय खते उदा. शेणखत, गांढुळखत, कंपोस्ट खत, लेंडीखत, कोंबडीखत, लिंबोळी पेंड, करंज पेंड, भुईमूग पेंड तसेच हिरवळीची खते यापैकी आपल्याकडे जे सेंद्रिय खत उपलब्ध असेल ते जमिनीमध्ये मिसळून द्यावा.
त्यासाठी जमिनीची खोलवर नांगरणी व वखरणी झाल्यानंतर हेक्टरी १५-२० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा गांढुळखत किंवा कंपोस्ट खत किंवा उपलब्ध सेंद्रिय खते जमिनीमध्ये चांगले मिसळून घ्यावे. याशिवाय खरीप हंगामासाठी मे महिन्याच्या सुरुवातीला तर उन्हाळी हंगामात डिसेंबर महिन्यात हिरवळीच्या खतांची लागवड करावी. लागवडीच्या १५-३० दिवसापूर्वी शेतात गाडून टाकावीत त्यामुळे शेतात अन्न द्रव्यांची उपलब्धता वाढण्यास मदत होईल.
रासायनिक खतांचे प्रमाणशीर व्यवस्थापन-
वांगी हे पीक इतर भाजीपाला पिकांच्या तुलनेत अधिक कालावधीचे असल्यामुळे तसेच या पिकाला मोठ्या प्रमाणात फलधारणा होत असल्यामुळे वांगी हे पीक अन्नद्रव्यांच्या बाबतीत खादाड समजले जाते. त्यामुळे वांगी पिकाचे सुयोग्य रासायनिक खत व्यवस्थापन केले तर पिकाच्या क्षमतेपेक्षा अधिक उत्पन्न घेणे शक्य होऊ शकते.
वांग्याच्या सुधारीत जातींकरिता रोपे लागवडीच्या वेळी ५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालश द्यावे, तर ५० किलो नत्र लगावडीनंतर ३० दिवसांनी द्यावे. संकरीत जातींकरिता २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद व १०० किलो पालश द्या. त्यापैकि ५० किलो नत्र व संपूर्ण १०० किलो स्फुरद व १०० किलो पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. तर उर्वरित १५० किलो नत्र तीन समान हफ्त्यात विभागून द्यावे. त्यापैकि ५० किलो लागवडीच्या २०-३० दिवसांनी द्या. त्यानंतर ५० किलो फुलधारणा होण्यापूर्वी तर उर्वरित ५० किलो नत्र पहिल्या फळ काढणी नंतर द्यावा.
रासायनिक खते नेहमी बांगडी पद्धतीने झाडांच्या सभोवताल १०-१५ से.मी. अंतरावर आणि ९-१० से.मी. खोलवर द्यावे. खते दिल्यानंतर मातीने झाकून घेऊन लगेच हलके पाणी द्यावे.
सुक्ष्म अन्नद्रव्यांचे सुयोग्य व्यवस्थापन-
वांगी पिकामध्ये खतांचे योग्यरीत्या व्यवस्थापन केल्यास शक्यतो सुक्ष्म द्रव्यांची कमतरता भासत नाही. पण हलक्या व मध्यम जमिनींमध्ये कधीकधी सुक्ष्म अन्न द्रव्यांची कमतरता भासते. त्यासाठी सर्वप्रथम लागवडीखालील जमिनीच्या मातीचे नमुने तपासून घ्यावेत व झिंक, लोह, बोरॉन इत्यादी शुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भासल्यास बोरॅक्स (०.२%), झिंक सल्फेट (०.५%) व फेरस सल्फेट (०.५%) या शुक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी केल्यास पिकाची वाढ चांगली होते तसेच फुलधारणा, फळधारणा अधिक प्रमाणात होऊन उत्पादनात सुद्धा वाढ होते. याशिवाय लागवडीखालील जमिनीमध्ये सुक्ष्म अन्न द्रव्यांची कमतरता आधीपासूनच असल्यास आवश्यकतेनुसार हेक्टरी १०-२५ किलो बोरॅक्स, झिंक सल्फेट व फेरस सल्फेट जमिनीच्या मशागतीच्या वेळी जमिनीमध्ये मिसळून द्यावा.
अशा पद्धतीने जैविक खते, सेंद्रिय खते, रासायनिक खते व शुक्ष्म अन्नद्रव्यांचे समन्वय साधून योग्य रीतीने व योग्य प्रमाणात खत व्यवस्थापन केल्यास वांगी पिकामध्ये क्षमतेपेक्षा जास्त उत्पादन घेता येणे सहज शक्य होऊ शकते.
श्री सूचित का. लाकडे
विषय विशेषज्ञ,( उद्यानविद्या)
कृषि विज्ञान केंद्र, साकोली
8329737978
Share your comments