सोमेश्वर कारखाना क्षेत्रावरील एक हिरा. एकरी १००टन ऊस उत्पादनाचे सातत्य ठेवलेला शेतकरी. ह्यावेळी मंगेश दादा डोळ्यासमोर १४४ टनाचे उद्धिष्ट ठेऊन काम करत आहेत.
बोधावर टॉमेटो आणि सरीमध्ये उसाची लागण केली होती. टोमॅटोचा सावलीमुळे उसाची वाढ चांगली झाली नाही. उसाची वाढ एकशिवडी झाली होती. कालांतराने उसाचा जेठा कोंब कापण्यात आला. जेठा कोंब कापल्यानंतर फुटव्यांची संख्या वाढणार होती. त्याच फुटव्यांना जाडी येण्यासाठी स्फुरद विरघळवणार्या जिवाणूंचा वापर करण्यात आला.
जेठा कोंब कापल्यानंतर काही दिवस आपला ऊस,आपल्यालाच नजरेस पसंत पडत नाही. जेठा कापून आपल्याकडून चुक झाली असे काही दिवस वाटत राहते. काही दिवसानंतर उसाला फुटवे दिसू लागले. त्याच फुटव्यांची झपाट्याने वाढ करण्यासाठी नत्र स्थिर करण्याऱ्या जिवाणूंचा वापर करण्यात आला. त्यामुळे उसाची वाढ झपाट्याने होऊ लागली. जोपर्यंत ऊस जोमदार वाढीचा अवस्थेत पोहचत नाही तोपर्यंत त्याची पालाश ह्या अन्नद्रव्यांची गरज भरपूर असते. म्युरेट ऑफ पोटॅशचा वापर करण्यात आला. त्याचे विघटन करण्यासाठी पाटोपाट पालाश उपलब्ध करणाऱ्या जिवाणूंचा वापर करण्यात आला. उसाची वाढ होणे जसे गरजेचे असते तसेच झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हे तितकंच महत्त्वाचे असते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सिलिकॉन ह्या अन्नद्रव्यांचा वापर करणे खूप सोपे आणि किफायतशीर पर्याय आहे. बाजारात मिळणारे सिलिकॉनचे पोत हे खुप महाग असते. त्याऐवजी जमिनीत २८%सिलिकॉन असते त्याला फक्त विद्राव्य करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही सिलिकॉन उपलब्ध करणाऱ्या जिवाणूंचा वापर केला. सिलिकॉनची उपलब्धता वाढली आणि झाडं कणखर झाली आहेत. जमिनीमध्ये अनेक रोगकारक बुरशी व जिवाणूंचे साम्राज्य असते. ह्या साम्राज्याचा विस्तार होऊ नये ह्यासाठी ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, बॅसीलस सबटीलिस ह्या त्रिकुटाचा वापर करण्यात आला. रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यास उद्या येणाऱ्या अनंत समस्येवर मात करणे सोपे जाते.
जमिनीतून दिलेल्या सर्व जिवाणू व अन्नद्रव्यांनंतर फवारणी मधूनही अन्नद्रव्यांची उपलब्धता करणे ऊस पिकासाठी महत्त्वाचे असते. ह्या पिकावर आतापर्यंत तीन फवारणी झाले आहेत. पहिली फवारणी चिलेटेड मायक्रोन्यूट्रिइंट्स व सिलिकॉन. पहिल्या फवारणी पसच्यात १०दिवसानंतर फोटोसिंथेटिक बॅक्टेरियाची फवारणी करण्यात आली. त्यामुळे झाडांमध्ये इंडोल ऍसिटीक ऍसिड व जिब्रेलीक ऍसिडची नैसर्गिक निर्मिती झाली. दुसऱ्या फवारणी नंतर १०दिवसांनी युरिया,१२:६१:०० व म्युरेट ऑफ पोटॅशची फवारणी करण्यात आली आहे. ह्या तीन फवारणी मुळेही झाडाचा सर्वांगीण विकास झाला.
मंगेश दादांनी पिकाचा नियोजनात सातत्य ठेवल्याचे फळ आता दिसत आहे.उसाने जोमदार वाढीचा अवस्थेत प्रदार्पण केले आहे. इथून पुढे दोन पेर्यातील अंतर व जाडी राखण्यावर भर दिला जाईल.
Share your comments