ड्रॅगन फळ हे २१ व्या शतकातील आश्चर्यकारक फळ म्हणून ओळखले जाऊ लागले असून त्याने भारतीय फलोत्पादनामध्ये सद्यस्थितीत एक क्रांती घडवून आणली आहे. शेतकरी आणि ग्राहकांना एक वरदान ठरले आहे. ड्रॅगन फ्रूट या फळाचे मध्य अमेरिका, मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका येथे व्यावसायिक उत्पादन केले जाते. अलीकडे भारतामध्येही या पिकाची लागवड सुरू झाली आहे. ड्रॅगन फ्रूट ही निवडुंग प्रकारातील वेल वनस्पती आहे. हायलोसेरेयस ही त्याची प्रजाती आहे. याच्या जातींमध्ये विविधता आढळते. वरून गुलाबी रंग व आतील गर पांढरा, वरून पिवळा व आतील गर पांढरा व वरून गुलाबी व आतून गर गुलाबी अशा तीन प्रकारांत हे फळ येते.
या फळाला आशियाई देशात पिताहाया किंवा पिताया म्हणतात. वेल छत्रीसारखी दिसते. साधारणतः या वेलीची आयुष्य मर्यादा १७ ते २० वर्षे एवढी असते. वाढीसाठी व आधारासाठी स्तंभ (पोल) व गोल कड्यांचा वापर होतो. कोणत्याही जमिनीत हे पीक येत असले तरी पोषक जमीन, नियंत्रित व नियमितपणे खते दिल्यास त्याच्यापासून चांगले उत्पादन मिळते. या वेलाची फुले रात्री उमलतात. त्यांचे पराग सिंचन निशाचर पतंग व वटवाघळांमार्फत केले जाते. वेलाच्या पानाला फळ लागते. कळी लागल्यापासून सुमारे एक महिन्यांत हे फळ पक्व होते. या फळाच्या सालीवरच पाकळ्या असतात. साल व पाकळ्या गुलाबी रंगाच्या असतात. अंडाकृती फळाच्या गराचा रंग वेगवेगळा असला तरी त्यात बारीक मोहरीच्या आकाराच्या काळ्या बिया असतात. या फळाची चव ही गोड व आंबूस असते.
पिकण्याच्या अवस्थेत फळाची साल गुलाबी, चकाकणारी, घट्ट असावी लागते. साल मऊसर असलेली फळे त्वरित खाण्यासारखी असतात. मात्र, ती लवकर खराब होऊ शकतात. फळाला सालीचे पापुद्रे तपकिरी व ढिले असल्यास फळ अधिक पिकल्याचे समजावे. ड्रॅगन फ्रुट शरीरासाठीही खुप लाभदायक आहे. यामुळेच याची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत आहे. ड्रॅगन फ्रुटपासून जॅम, स्क्वॅश, आईसक्रीम, बार, जेली, वाईन, पावडर आणि टॉफी असे प्रक्रियायुक्त पदार्थ बनवता येते. एका वनस्पती संशोधकाला ड्रॅगन फळाची पाने, फळे, साल, फुले यामध्ये जखम भरण्याची क्षमता असते असे त्यांच्या संशोधनातून आढळले.
ड्रॅगन फळाचे आरोग्यदायी फायदे
- संशोधकांना ड्रॅगन फळाचा रसामध्ये प्रकृती चांगली ठेवणे, त्वचा (कातडी) तेजस्वी दिसणे व त्वचेच्या विकृत्ती कमी करण्याचे गुणधर्म आढळले.
- ड्रॅगन फळामध्ये युनिव्हर्सिटी जेटच्या संशोधकांनी असे शोधून काढले की यामध्ये अत्यावश्यक फॅटी अॅसीड (जीवनसत्व ई) ने समृद्ध असते. यामुळे शरीराची झीज भरून निघते. जीवनसत्व ई हे शरीराला आत्यावश्यक असते.
- ड्रॅगन फळामध्ये कॅन्सर विरोधक व रक्तदाब कमी करणारे गुणधर्म आहेत.
- ड्रॅगन फळात जीवनसत्त्व बी १ अधिक असल्याने प्रतिकार शक्ती वाढते. पचनक्रिया सुधारते
- मेंदू तरतरीत राहतो. ड्रॅगन फळाच्या सेवणाने ताणतणावावर मात होते.
- डोळ्याचा मोतीबिंदू कमी होतो. पेशींची सुसुत्रता सांभाळते. एल्झामायर नावाच्या रोगावर आराम पडतो.
- ड्रॅगन फळ मधुमेह नियंत्रित करते.
- कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.
- संधिवात रोखण्यास मदत करते. दमा रोखण्यास मदत होते.यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे व प्रथिने भरपूर उपलब्ध असतात.
- ड्रॅगन फळात भरपूर प्रमाणात विटामीन सी असते. बरोबर कॅल्शीयम, पोटॅशियम, लोह, आणि विटामीन बी तसेच ९०% पाणी असते.
अन्नघटकांचे प्रमाण (प्रति १०० ग्रॅमनुसार)
प्रथिने ०.१९४, कॅल्शिअम ७.५५ मिलिग्रॅम, फॉस्फरस ३३.१५ मिलिग्रॅम, लोह ०.६ मिलिग्रॅम, जीवनसत्वे बी १- ०.१६१५ मिलिग्रॅम, बी २- ०.०४४ मिलिग्रॅम, बी ३- ०.३६३५ मिलिग्रॅम, ‘क’ ८.५ मिलिग्रॅम, स्निग्ध पदार्थ ०.४१ ग्रॅम, ऊर्जा २३६ किलो कॅलरी, कर्बोदके २० ग्रॅम, फॉलिक अॅसिड १८.३ मिलिग्रॅम.
ड्रॅगन फळाचे प्रक्रियायुक्त पदार्थ
१) गर (रस)
- पिकलेले ड्रॅगन फळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत. फळावरील साल काढून आतील गर वेगळा करावा.
- गरामधील बिया वेगळ्या करून घ्याव्यात. यंत्राच्या साह्याने गर व्यवस्थित मिसळून घ्यावा. तयार झालेला १० मिली गरामध्ये १०० मिली दूध व १० ग्रॅम साखर मिसळून त्याचा रस बनवू शकतो.
- हा गर (रस) हा वजा १८ अंश सेल्सिअसला गोठवून ठेवल्यास ६ ते ८ महिने पर्यंत वापरता येतो.
२) स्क्वॅश
- ड्रॅगन फळाचा २५०मि.ली. गर घ्यावा. पाणी ३२० मिली घेऊन त्यात ४२० ग्रॅम साखर मिसळावी. हा पाक मंद आचेवर गरम करावा. त्यात ६ ग्रॅम सायट्रिक अॅसिड मिसळावे. उष्णता देत असताना ही त्यामध्ये २५० मिली गर मिसळावा.
- मिश्रणाला ४३ अंश ब्रिक्स येईपर्यंत मंद आचेवर ढवळावे. त्यानंतर स्क्वॅश हा गरम असतानाच निर्जंतूक केलेल्या बाटलीत भरावा. बाटली थंड करावी. बाटलीमध्ये स्क्वॅश भरल्यानंतर पुन्हा निर्जंतुकीकरण करावे.
३) जॅम
- पिकलेली ड्रॅगन फळ फळे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत. व्यवस्थित कापून, त्यातील गर काढून घ्यावा. गराच्या वजनाएवढी साखर मिसळून घ्यावी. त्यात प्रतिकिलो जॅमसाठी १ ते २ ग्रॅम सायट्रिक अॅसिड मिसळावे. मिश्रण एकजीव करावे.
- हे मिश्रण पातेल्यात घेऊन मंद आचेवर सतत ढवळत शिजवावे. या मिश्रणाचा ब्रिक्स ६८.५ अंश इतका आल्यानंतर उष्णता देणे बंद करावे. तयार झालेला जॅम हा निर्जंतूक काचेच्या भरणीत भरावा. बाटल्याची साठवणूक थंड व कोरड्या जागी करावी.
४) जेली
- जेली बनविण्यासाठी ड्रॅगन फळ गराच्या वजनाएवढी साखर मिसळून त्यात प्रतिकिलो ५ ग्रॅम सायट्रिक अॅसिड मिसळावी.या मिश्रणाला मंद आचेवर तापवावे. तापवत असताना त्यात ४ ग्रॅम पेक्टीन टाकावे.
- पेक्टीन हे जेलीला घट्टपणा येण्यासाठी वापरले जाते. त्या मिश्रणाला उष्णता देणे सुरू ठेवावे.मिश्रण तापवत असताना त्यामध्ये २ ग्रॅम केएमएस मिसळावे. ब्रिक्स तपासून पाहावा. ६७.५ ब्रिक्सचे प्रमाण झाल्यावर जेली तयार झाल्याचे समजून उष्णता देणे बंद करावे.
- तयार झालेली जेली निर्जंतुक बाटल्यात भरून त्याला झाकण लावून हवाबंद करावी. या बाटल्या थंड व कोरड्या ठिकाणी साठवाव्यात.व्यवस्थित साठवणुकीमध्ये जेली २ ते ३ महिने टिकते.
५) बार
- पिकलेली ड्रॅगन फळ निवडावी, गर काढावा, त्यात साखर (१० टक्के), पेक्टिन (०.५५ टक्के) तसेच ०.५ टक्के सायट्रिक आम्ल व ३०० पीपीएम पोटॅशियम मेटाबाय सल्फाईट टाकावे.
- योग्य शिफारशीचा ०.२ टक्के खाद्यरंग टाकून हे मिश्रण तूप लावलेल्या ट्रेमध्ये टाकून पापडी उलथवावी व पुन्हा ७ ते ८ तास सुकवावे. नंतर योग्य आकाराचे तुकडे करून आकर्षक पॅकिंग करावे.
६) टॉफी
- टॉफी तयार करण्यासाठी ड्रॅगन फळचा गर १ किलो, द्रवरूप ग्लुकोज ७० ग्रॅम, साखर ६५० ग्रॅम, सायट्रिक आम्ल २ ते ३ ग्रॅम, दूध पावडर ७० ते ८० ग्रॅम, वनस्पती तूप १०० ते १२० ग्रॅम इ. साहित्य आवश्यक आहे.
- ड्रॅगन फळचा गर कढईत टाकून त्यात वितळलेले वनस्पती तूप टाकून मिसळून घ्यावे. चांगले शिजवून घ्यावे. हे मिश्रण मंद आचेवर शिजवत असताना त्यात दूध पावडर, साखर व सायट्रिक आम्ल टाकून मिश्रण एकजीव करून घ्यावे.
- तयार मिश्रण एका तूप लावलेल्या थाळीमध्ये पसरून ठेवावे. मिश्रण थंड झाल्यावर त्याचे ०.५ ते १ सेमी जाडीचे काप (तुकडे) करून घ्यावेत. तयार झालेली टॉफी ही बटर पेपर किंवा रॅपरमध्ये पॅक करावी. टॉफीची साठवणूक थंड व कोरड्या ठिकाणी करावी.
७) ड्रॅगन फळाचे सुके काप
- पूर्ण पिकलेली ड्रॅगन फळ घ्या. पोटॅशियम मेटाबायसल्फाईडच्या २ टक्के द्रावणात बुडवून घ्या. नंतर त्याचे २ ते ३ मि. मी. काप बनवून उन्हात २ दिवस वाळवा. किंवा ५५ ते ६० डि.से. तापमानाला १५ ते १८ तास ओव्हनमध्ये किंवा ड्रायरमध्ये ठेवून वाळवा.
- पॉलीथीनच्या पिशव्यांमध्ये हवाबंद करून ठेवल्यास ४ महिने सहज टिकतात. सुक्या अंजीरप्रमाणे ही ड्रॅगन फळाचे सुके काप अत्यंत चविष्ट लागतात.
८) बियांची पावडर
- ड्रॅगन फळचा गर काढतेवेळी त्याच्या बिया वेगळ्या करून घ्याव्यात. त्या बिया स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्यात. बिया उन्हामध्ये ५० ते ६० अंश सेल्सिअस तापमानास १५ ते २० तास वाळवाव्यात.
- वाळलेल्या बिया पल्व्हरायझरमध्ये दळून त्याची पावडर तयार करून घ्यावी. ही पावडर विविध बेकरी उत्पादनामध्ये, चॉकलेट व आइस्क्रीममध्ये मूल्यवर्धनासाठी वापरू शकतो. यातील औषधी गुणधर्मामुळे विविध औषधांमध्येही वापर केला जातो.
९) खाण्यास तयार मिश्रण (रेडी टू इट)
- साधारण १०० ग्रॅम वजनाची साखर ७५० मि.ली. पाण्यामध्ये विरघळवून त्यात ४ ग्रॅम सायट्रिक अॅसिड मिसळावे. या मिश्रणामध्ये १०० मि.ली. ड्रॅगन फळाचा गर मिसळून घ्यावा.
- १० अंश ब्रिक्स येईपर्यंत मिश्रण ढवळत मंद आचेवर उष्णता द्यावी. त्यानंतर तयार झालेले मिश्रण गरम असतानाच निर्जंतूक केलेल्या काचेच्या बाटल्यामध्ये भरावे. नंतर थंड करावे.
लेखक:
सचिन अर्जुन शेळके
आचार्य पदवी विद्यार्थी, अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग,
सॅम हिगिनबॉटम कृषि, प्रौद्योगिकी आणि विज्ञान विश्वविद्यालय प्रयागराज, उत्तरप्रदेश.
8888992522
Share your comments