यंदा केरळ मध्ये लवकर मान्सून दाखल होणार आहे. पुढील पाच दिवस केरळ आणि लक्षद्वीप भागातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुसळधार आणि अतीमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिल्यानंतर केरळ प्रशासन सतर्क झाले आहे.
सात दिवसात मान्सून महाराष्ट्रात येऊन धडकणार
1 जून रोजी केरळमध्ये मान्सून साधारणपणे दाखल होतो. यंदा वेळे आधी म्हणजे 27 मे रोजी केरळात मान्सूनचं आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. असेच पोषक वातावरण राहिल्यास पुढच्या सात दिवसात मान्सून महाराष्ट्रात येऊन धडकणार आहे. मान्सूनची सुरूवात केरळपासून होते आणि नंतर तो हळूहळू देशभर पसरतो. त्यामुळे देशातील एकूण पावसापैकी 70 टक्के पाऊस नैऋत्य मान्सूनमधून पडतो.
केरळ किनारपट्टी भागातील मच्छिमारांना इशारा
मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिल्यानंतर केरळ प्रशासन सतर्क झाले आहे. राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याच्या मुख्य सचिवांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडूनही खबरदारीच्या उपाययोजना आखल्या जात आहेत. आपात्कालीन यंत्रणादेखील सुसज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. वाऱ्यांचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटरपर्यंत राहणार असल्याचा अंदाज आहे.
Published on: 15 May 2022, 06:01 IST