महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन झाले असले तरी राजकीय हालचाली अजून तीव्र होत आहेत. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर पुढील आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, असे सांगितले आहे. या मंत्रिमंडळात शिंदे गटाला महत्त्वाची भूमिका मिळू शकते, असे मानले जात आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार शिंदे कॅम्पच्या डझनहून अधिक आमदारांना मंत्री केले जाऊ शकते. शिंदे यांच्यासह उद्धव सरकारमधील आठ मंत्री बंडात उतरले होते. या सर्वांना पुन्हा मंत्री केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधानांच्या भेटीनंतर महाराष्ट्र सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाला मान्यता देण्यात आल्याचे समजते.
महाराष्ट्रात अच्छे दिन आणणारचं
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ते मुख्यमंत्रिपदाचा वापर फक्त राज्यातील जनतेला न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यात "अच्छे दिन" आणण्यासाठी प्रयत्न करण्यात घालवतील.
बाळासाहेबांची हिंदुत्व आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण आम्ही पुढे नेऊ, असे शिंदे म्हणाले. पुण्यातील जाहीर सभेत बोलताना शिंदे यांनी या गोष्टी सांगितल्या. शनिवारी महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. यादरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदींचीही भेट घेतली.
शिंदे म्हणाले - पुढची निवडणूकही आम्ही जिंकू
वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्यानंतर शिंदे म्हणाले, "महाराष्ट्रात मजबूत सरकार आहे. आमचे 164 आमदार आहेत, तर विरोधी पक्षाकडे 99 आमदार आहेत. माझे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. पुढची निवडणूकही आम्ही जिंकू."
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या काळात शिवसेनेच्या आमदारांचे अस्तित्व धोक्यात आले होते आणि त्यामुळे त्यांनी युतीविरोधात बंड केले. तेव्हा आम्हाला बोलता येत नव्हते म्हणून आम्ही काढता पाय घेतला असे शिंदे म्हणाले. भाजप आणि शिवसेनेची नैसर्गिक युतीच महाराष्ट्राला पुढे नेऊ शकते.
शिवसेनेकडून नुकताच झालेला बंड
शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. तदनंतर शिंदे यांनी 30 जून रोजी बंडखोर आमदारांना सोबत घेऊन भाजपच्या पाठिंब्याने नवीन सरकार स्थापन केले आणि मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सरकारमध्ये भाजपचे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. शिंदे यांनीच शिवसेनेतून बंडखोरी केली आणि काही अपक्ष आमदारही त्यात सामील झाले. शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी पक्ष सोडला आहे.
Published on: 10 July 2022, 08:59 IST