मालाला भाव मिळाल्याने शेतकऱ्याने डीजे लावून आनंद व्यक्त केला,व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल
१. सध्या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या मालाचं बराच नुकसान झालं आहे. शेतकरी आपला माल बाजारात कवडीमोल दराने विकत आहेत. अशातच आता
छत्रपती संभाजीनगर मधून शेतकऱ्यांचा डीजेवर नाच करतानाचा व्हिडीओ वायरल झालाय. शेत मालाला चांगला भाव मिळाल्याने या शेतकऱ्याने चक्क डीजे लावून डान्स केला. हा व्हिडिओ गंगापूर तालुक्यातील असल्याचे बोलले जात आहे. शेतकऱ्याच्या आल्याला पंधरा हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाल्याने शेतकरी झिंगाट झाल्याचे पहायला मिळत. त्यामुळे आलं धुतानाच चक्क डीजेवर ताल धरल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे.
राज्यात अवकाळीचं संकट कायम, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी
२. सध्या राज्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी धास्तावले आहेत. पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. अशातच आता 'ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर' कडून अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यामध्ये आज तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे बाहेर जाताना काळजी घ्यावी असं आवाहन ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्याकडून देण्यात आलं आहे.
महाराष्ट्र सरकारची ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना 'मे' च्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
३. आता एक महत्वाची बातमी
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारची ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना यावर्षीपासून सुरु होणार आहे. शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून वर्षात तीन हप्त्यांत सहा हजार रुपये मिळणार आहेत. पहिला हप्ता हा 'मे' च्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणेच राज्याच्या योजनेचे निकष असणार आहेत. यात काही बाबी बंधनकारक आहेत. १ फेब्रुवारी २०१९ पूर्वीचा जमीनधारक शेतकरीच या योजनेला पात्र असेल. तसेच मो शेतकरी महासन्मान निधी मिळवण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी करावी लागेल. शेतकऱ्याने त्याच्या नावावरील मालमत्ता नोंदीची माहिती द्यावी आणि बॅंक खात्याला आधार लिंक करून घेणे बंधनकारक आहे.
भारतीय महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभुषण सिंह यांच्याविरोधात जंतर मंतरवर तीव्र आंदोलन, शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला
४. भारतीय महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभुषण सिंह यांच्याविरोधात जंतर मंतरवर तीव्र आंदोलन छेडण्यात आलं आहे. आता या आंदोलनाला शेतकरी संघटना आणि खाप पंचायतीचे बळ मिळालंय. शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यासह हरियाणा आणि पंजाबमधील अनेक नेत्यांनी खेळाडूंची भेट घेत केंद्र सरकारला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. ब्रिजभुषण सिंह यांना १५ दिवसांत अटक झाली नाही तर मोठा निर्णय घेतला जाईल असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. रविवारी सायंकाळी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी २१ मेपर्यंत ब्रिजभुषणला अटक न केल्यास मोठा निर्णय घेतला जाईल”,असा इशारा केंद्र सरकारला दिला आहे.
जालना जिल्ह्यातील मोसंबी, द्राक्ष, आंबा, डाळिंब, कांद्यासह भाजीपाला जाणार विदेशात, कृषी विभागाचा पुढाकार
५. आता एक महत्वाची बातमी
जालना जिल्ह्यातील मोसंबी, द्राक्ष, आंबा, डाळिंब, कांद्यासह भाजीपाला इतर देशात निर्यात केली जाणार आहे. आणि यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला असून, जूनपासून सुरक्षित अन्न पिकवाची अंमलबाजणी या जिल्ह्यात केली जाणार आहे. जालना जिल्हा मोसंबी साठी प्रसिद्ध आहे. शिवाय जालना तालुक्यातील कवंडची गाव हे द्राक्षांचे गाव म्हणून ओळखले जाते. मोसंबीमध्ये असणाऱ्या खास गुणवैशिष्ट्यांमुळे याला बाजारात मोठी मागणी असते.
मात्र आता केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील फळांसह भाजीपाला निर्यात धोरण आत्मसात केले जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी फळबाग आणि भाजीपाला लागवडीची कृषी अधीक्षक कार्यालयाकडे ट्रेसिबीलीटीद्वारे नोंदणी करणं आवश्यक आहे. या नोंदणी केलेल्या फळबागांना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून फळ फुलोऱ्यापासून ते काढणीपर्यंत कोणती औषधी फवारणी, कीड प्रतिबंध कसा करावा, फळपिकांची कशी काळजी घ्यावी, अशी एकंदरीत सर्वच बाबींचे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी विभागाकडून मार्गदर्शन केले जाणार आहेत.
अधिक बातम्या:
तंबाखू लागवड आणि त्याचे व्यवस्थापन
बारामतीच्या अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचा आर्टिफिशियल इंटेलिजेंस मधील संशोधनाबाबत सामंजस्य करार
आता धेनू अॅपमधील डिजिमार्ट देणार व्यावसायिकांना लाखों रुपये कमावण्याची संधी...
Published on: 08 May 2023, 12:29 IST