सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला जवळपास एक महिना पूर्ण होत आला आहे. या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत मोठा बदल बघायला मिळत आहे. युद्धामुळे भारतीय स्वयंपाक घरापासून ते शेती क्षेत्रापर्यंत महागाईचा भडका उठला आहे.
यामुळे शेती करणे देखील महाग होणार आहे. येत्या काही दिवसात संपूर्ण देशात खरीप हंगामाची लगबग सुरू होणार आहे युद्धामुळे खरीप हंगामावर विपरीत परिणाम होणार असून खताची टंचाई जाणवू शकते तसेच खत दरवाढीचा देखील शेतकऱ्यांना सामना करावा लागू शकतो.
या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना एक अनमोल सल्ला देण्यात आला आहे. जालना जिल्ह्याच्या कृषी विभागाने आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आत्तापासूनच खतांचे नियोजन करण्याचा सल्ला दिला आहे. कृषी विभागाने शेतकरी बांधवांना माती परीक्षण करून पिकांसाठी आवश्यक खताचा साठा आत्ताच उपलब्ध करून घेण्याची शिफारस केली आहे.
रशिया आणि युक्रेन युद्धाच्या झळा आता भारतीय नागरिकांना बसू लागल्या आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या युद्धामुळे गोड तेल अर्थात खाण्याचा तेलाच्या किमती लक्षनीय वाढल्यात. एवढेच नाही तर यामुळे गव्हाच्या किमती देखील वाढल्या असून भारतीय गव्हाला कधी नव्हे ते सोन्याचे दिवस आता येताना दिसत आहेत.
देशात खाद्यतेलाच्या किमती प्रति लिटर वीस रुपयांनी महागल्या असून, गव्हाचा भाव देखील प्रतिक्विंटल दोनशे रुपयांनी वाढल्याचे दिसत आहे. यामुळे देशात कही खुशी तो कही गम सारखी परिस्थिती बघायला मिळत आहे. एवढेच नाही यामुळे स्टील साठी आवश्यक भंगार महागल्याने स्टील च्या किमती वाढल्या आहेत.
या युद्धामुळे रोजाना जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत आहेत. आता या युद्धाच्या झळा शेतीक्षेत्राला देखील बसू लागल्या आहेत. कारण की कृषी तज्ञांनी आगामी खरीप हंगामात खत टंचाईचा इशारा दिला आहे यामुळे शेतकरी बांधवांना मोठा धक्का बसणार असून उत्पादनखर्चात मोठी वाढ होणार आहे. एकंदरीत बाजारातील चित्र बघता आगामी खरीप हंगामासाठी शेतकरी बांधवांना खत खरेदी करण्यासाठी मोठी धावपळ करावी लागू शकते.
यामुळेच कृषी विभागाने शेतकरी बांधवांना आत्ताच खरीप हंगामासाठी आवश्यक खतांची खरेदी करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. असे असले तरी, जे सदन शेतकरी आहेत ते खतांची खरेदी करून ठेवतील मात्र जे अल्पभूधारक व गरीब शेतकरी आहेत त्यांना खत खरेदी करणं शक्य होणार नाही त्यामुळे आगामी खरीप हंगामात अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठ्या अग्नी परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. आता कृषी विभागाचा सल्ला शेतकरी बांधवांना प्राप्त झाल्यामुळे.
सदन शेतकरी अवघ्या काही दिवसात खतांचा स्टॉक संपवून टाकतील. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामात किती प्रमाणात खते शिल्लक राहतात हे विशेष बघण्यासारखे राहील. यामुळे आगामी खरीप हंगामात खतांची काळाबाजारी होणार हे उघड झाले असून शेतकरी बांधवांना दुहेरी आर्थिक भुर्दंड सहन करावे लागणार असल्याचे चिन्हे आता दिसू लागली आहेत.
संबंधित बातम्या:-
मोठी बातमी! इफको अजून 4 नॅनो युरिया प्लांट सुरु करणार; खत टंचाई दुर होणार का?
बियाण्यावर बिजप्रक्रिया का करावी? जाणुन घ्या याविषयी काही महत्वाची माहिती
Published on: 24 March 2022, 08:29 IST