सध्या वन्य प्राण्यांचे लोकवस्तीकडे येण्याचे प्रमाण वाढले आहे. अन्नाच्या शोधात असणारे वन्य प्राणी शेतातील पिकांचे न भरून निघणारे नुकसान करून जातात. आता वन्य ह्त्तीमुळे तुमच्या शेतातील मालमत्तेचे नुकसान झाले असेल तर सरकारकडून नुकसानभरपाई मिळणार आहे. राज्य शासनाने शुक्रवारी आदेश जारी केला असून आता शेतकर्यांना मोठा दिलासा मिळेल. राज्यात वन्य हत्ती नसेल तरी शेजारील राज्यातून या हत्तीचे स्थलांतर वाढले आहे.
कर्नाटक, गोवा, तेलंगणा तसेच आंध प्रदेश या राज्यांच्या सीमेवर असणाऱ्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यात वन्य हत्तींचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्रामुख्याने कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यात या हत्तींचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांनी कष्टाने जोपासलेली पिके या हत्तींकडून नष्ट केली जात आहेत. राज्य शासनाकडून हत्तींमुळे झालेल्या पिकांची नुकसानभरपाई देण्यात येते.
शिवाय जीवित हानी झाल्यास त्याचीही भरपाई देण्यात येते. मात्र गेले काही महिने हत्तींकडून शेती अवजारांसह मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. शेती अवजारांचे झालेल्या नुकसानीची भरपाई सरकारकडून मिळत नव्हती. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. मात्र शुक्रवारी राज्य सरकारने, शेती मालमत्तेची नुकसान भरपाई देण्याचा आदेश जारी केला आहे.
शेतकऱ्यांना फसवणे पडले महागात; पोलिसांनी जप्त केला लाखोंचा मुद्देमाल
राज्य शासनाच्या नव्या नियमावलीनुसार, शेती अवजारे आणि उपकरणे, बैलगाडी, संरक्षक भिंत, कुंपण व कौलारू किंवा पत्र्यांचे घर, जनावरांचा गोठा, स्लॅबची इमारत आदींच्या नुकसानीची भरपाई देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे याची अंमलबजावणी आजपासूनच लागू होणार असल्याचे या आदेशात म्हटले आहे.
जाणून घेऊया प्रक्रियेविषयी
हत्तीमुळे मालमत्तेचे नुकसान झाल्यास तीन दिवसात संबंधित वनरक्षक, वनपाल, वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी. ज्या साहित्याचे तसेच वस्तूंचे नुकसान झाले आहे त्यांचा पंचनामा होईपर्यंत त्यांना आहे त्या जागेवरच ठेवावे. वनपरिक्षेत्र अधिकारी, सार्वजनिक बांधकामचे कनिष्ठ अभिंयता तसेच तलाठी या सदस्यांकडून 14 दिवसांत पंचनामा करण्यात येईल. अहवाल सादर केला जाईल. अहवालानंतर चार दिवसांत किंवा 23 दिवसांत संबंधित शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळेल. मात्र यात अतिक्रमणधारकाला तसेच वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेल्यांना भरपाई मिळणार नाही.
साहित्य व नुकसान भरपाई
शेती अवजारे तसेच उपकरणांचे नुकसान झाल्यास त्या व्यक्तीला जास्तीत जास्त 5 हजार रुपये देण्यात येईल. बैलगाडीचे नुकसान झाल्यास संबंधित शेतकऱ्याला जास्तीत जास्त 5 हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळेल. संरक्षक भिंत, कुंपण यांचे नुकसान झाले तर जास्तीत जास्त 10 हजार रुपये देण्यात येईल. तर कौलारू घर, गोठा यांची नुकसानभरपाई म्हणून जास्तीत जास्त 50 हजार रुपयांचा आर्थिक लाभ मिळेल. विटा, स्लॅबची इमारत यांचे नुकसान झाल्यास
जास्तीत जास्त 1 लाख रुपये देण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
संकटांची मालिका सुरूच; भाव नसल्याने शेतकऱ्याने मेथीवर फिरवला रोटर
बापरे! रानडुकराचा जीवघेणा हल्ला; 62 वर्षीय शेतकऱ्याने दिली टक्करची लढाई
Published on: 18 June 2022, 11:09 IST