शेतकरी प्रश्नांसाठी किसान सभा पुन्हा आक्रमक, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयावर धडकणार 'लाल वादळ'
1. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन पुन्हा एकदा किसान सभेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. राजकीय अस्थिरतेमुळं सामान्य जनतेचे विकासाचे प्रश्न संपूर्णपणे बाजूला फेकले गेलेत. यात अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं किसान सभेच्या पुढाकारानं शेतकरी उद्यापासून ते 28 एप्रिल 2023 या काळात अकोले ते लोणी असा राज्यव्यापी पायी मोर्चा काढणार आहेत.
तीन दिवस पायी चालून, महसूल आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे. मोर्चातील मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मोर्चाचे रुपांतर लोणी येथे बेमुदत महामुक्काम आंदोलनात करू असा इशाराही किसान सभेनं दिला आहे.
'सावदा' इथे पहिली राज्यस्तरीय केळी पिक परिषद पार पडली, केळीला प्रतिकिलो 18 रुपये 90 पैशांचा हमीभाव देण्याची केली मागणी
2. जळगाव जिल्ह्यातील बनाना सिटी असणाऱ्या 'सावदा' इथे पहिली राज्यस्तरीय केळी पिक परिषद पार पडली. महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघाच्या वतीनं या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत केळी उत्पादकांच्या संदर्भात विविध ठराव मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये केळीला प्रतिकिलो 18 रुपये 90 पैसे हमीभाव देण्यात यावा ही मागणी करण्यात आली आहे.
शिवाय केळीचा शालेय पोषण आहारात समावेश करावा अशी मागणीदेखील या परिषदेत करण्यात आली असल्याचं महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघाचे अध्यक्ष किरण चव्हाण यांनी सांगितले. विशेष म्हणजे या पहिल्या राज्यस्तरीय केळी पिक परिषदेत 19 शेतकऱ्यांना 2023 चा केळीरत्न पुरस्कार देण्यात आला. ज्या शेतकऱ्यांनी एकरी केळीचे 30 टनापेक्षा अधिक उत्पादन घेतलं आहे, त्या शेतकऱ्यांना केळीरत्न पुरस्कार देण्यात आला.
पुदिना पिकातून शेतकऱ्याने कमावला लाखोंचा नफा
3. आता एक यशोगाथा
परभणी मधील गोविंदपूर येथील वत्ते कुटुंबीयांनी आपल्या शेतात पुदिना पीकाची लागवड करुन लाखोंचा नफा कमावला आहे. शेतकरी गंगाधर श्यामराव वत्ते, बालाजी गंगाधर वत्ते,आनंदा गंगाधर वत्ते यांनी तीस गुंठे क्षेत्रात पुदिना पीकाची लागवड केली. त्यांना या तीन वर्षात तीस गुंठ्यातील पुदिना चे भरघोस असं उत्पादन मिळालं. त्यांच्या विक्रीतून खर्च वगळता आजतागायत त्यांना जवळपास दहा लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे.
पुदिना हे पीक एकदा लागवड केले की चार पाच वर्षे चालते.आलेले पीक कापणी केले की, तेथून पुढे एका महिन्याला परत काढणीला येते तर त्यासाठी १५:१५: १५ या खताचा डोस द्यावा लागतो आणि अळी, बुरशी तसेच पाने पिवळी पडल्यास योग्य त्या औषधाची फवारणी करणं गरजेचंच असल्याचं शेतकरी बालाजी यांनी सांगितलं. पुढं ते असंही म्हणाले की, या पीकाला वाफसा पद्धतीनुसार एक दिवसा आड पाणी द्यावे लागते. पुदिना साठी लागणार पूर्वनिययोजन आणि अपार कष्ट यातून वत्ते कुटुंबीयांनी आर्थिक समृद्धी साधली आहे.
खाद्य तेलाचे दर वाढणार की कमी होणार, जाणून घ्या..
पुढील चार दिवसांत मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, मुंबई हवामान विभागाचा अंदाज
4. येत्या चार दिवसांत मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तसेच वादळी वारेही वाहू शकेल, असा अंदाज ' प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्या माहितीनुसार वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील 24 ते 27 एप्रिल या चार दिवसांत मराठवाड्यात काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
अवकाळीमुळं आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका; केशर आंब्याच्या उत्पादनात झाली घट
5. ग्राहकांचा लाडका केशर आंब्याच्या उत्पादनात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. मराठवाड्यासह अनेक भागांतील शेतकऱ्यांना केशर आंबा लवकर बाजारात आणण्यात काही अंशी यश मिळालं आहे. मात्र उत्पादनात घटच झाल्याचं पाहायला मिळतंय. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आलेल्या उत्पादनालाही मोठा फटका बसल्याने उत्पादकांच्या नुकसानीत अजूनच भर पडलीये. त्यामुळेच आता असलेले दरही स्थिर राहतील, असा अंदाज तज्ज्ञांनी
व्यक्त केला आहे.
आम्ही लढणारी माणसं, रडणारी नाही, राजू शेट्टी यांचं वक्तव्य
6. शेतकरी व व्यापाऱ्यांना मोकळीक देण्यासाठी सातारा बाजार समितीत पॅनेल उभे करण्यात आले आहे. ही निवडणूक लढवत असताना कार्यकर्त्यांना अनेक अडचणी आल्या. त्रासही दिला गेला. पण, आम्ही लढणारी माणसे असून रडणारी नाही. कार्यकर्त्यांनी कोणाच्याही धमकीला भीक घातली नाही, असं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केलं आहे. ते सातारा बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. आणि त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
शेवटच्या हंगामात लाल मिरचीला चढला भाव, मिरची उत्पादक शेतकरी समाधानी
7. नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी मिरचीने विक्रमी आवक बाजार समितीत दाखल झाली आहे. तर हंगामाच्या शेवटी ओली लाल मिरचीला भाव देखील चांगला मिळत आहे. यावर्षी मिरचीला मागील वर्षापेक्षा दुप्पट भाव मिळत असल्याने मिरची शेतकरी उत्पादक समाधानी झाला आहे.सध्या ओली लाल मिरचीला पाच हजार १०० चा भाव मिळत आहे. तर सुकी लाल मिरचीला दहा हजारपासून ते सोळा हजारपर्यंतच्या दर मिळत आहे.
अधिक बातम्या:
Unseasonal Rain : राज्यात अवकाळी पावसाचा कहर; शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत पाण्यात, बळीराजा संकटात
नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं! लाकडी घाण्यावरील तेल निर्मिती उद्योगातून शेतकरी दाम्पत्याची भरारी
आता उपचारासाठी मोदी सरकार देणार 5 लाख रुपये, असा घ्या लाभ..
Published on: 26 April 2023, 12:36 IST