कपाशी हे महाराष्ट्रातील प्रमुख खरीप पीक असून बहुतांश जिल्ह्यांमध्ये कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मागच्या वर्षी कपाशीला कधी नव्हे एवढा उच्चांकी दर मिळाला. त्या मागे बऱ्याच प्रकारची कारणे देखील होती.परंतु या वर्षी कापसाला भाव कसा मिळेल? याबाबत देखील एक उत्सुकता शेतकऱ्यांमध्ये आहे. यावर्षीचा जर आपण विचार केला तर पंजाब व हरियानामध्ये नवीन कापसाला बारा हजारांच्या आसपास भाव मिळाला तर गुजरातमध्ये देखील जवळपास तितकाच भाव मिळत आहे.
महाराष्ट्रातील बोदवड या ठिकाणीदेखील सोळा हजार रुपये प्रति क्विंटल नवीन कापसाला दर मिळाल्याची बातमी नुकतीच वाचनात आली होती. परंतु याचा जर आपण विचार केला तर सध्या हा कापूस फार कमी प्रमाणात असल्याने त्याला इतका भाव मिळू शकतो अशी देखील एक परिस्थिती आहे.
परंतु एकंदरीत भारतातील लागवड क्षेत्र म्हणजे देशांतर्गत बाजार आणि आंतरराष्ट्रीय लागवड क्षेत्राचा विचार केला तर यावर्षी देखील कापसाला मागच्या वर्षी इतकाच भाव राहणार असल्याचे एकंदर चित्र आहे. जर आपण भारताचा विचार केला तर निसर्गाच्या लहरीपणामुळे सरासरी क्षेत्रावर कापसाची लागवड झालेली नाही
व जगातील प्रमुख कापूस उत्पादक देशांमध्ये देखील दुष्काळजन्य परिस्थिती असल्यामुळे उत्पादनात घट ही निश्चित मानली जात आहे. या लेखात आपण अमेरिकेचे कापूस उत्पादन आणि आपल्याकडील शेतकऱ्यांना त्याचा काय फायदा होऊ शकतो याबद्दल माहिती घेऊ.
अमेरिकेतील कापूस उत्पादनाची स्थिती
आपल्याकडे विचार केला तर काही राज्यांमध्ये जास्त पाऊस झाल्यामुळे कापूस पिकाचे भरपूर नुकसान झाले आहे.परंतु अमेरिकेमध्ये याउलट परिस्थिती असून त्या ठिकाणी दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाल्यामुळे कापूस उत्पादनात घट येण्याची दाट शक्यता आहे.
जवळ जवळ अमेरिकेमध्ये 25 लाख गाठीनी उत्पादन घटीचा एका अंदाज वर्तवण्यात आला असून एक कापसाची एक गाठ 170 किलोची असते. एवढेच नाही तर इतर देशांमध्ये देखील कापूस उत्पादन घटल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भारतीय कापसाची मागणी वाढेल हे निश्चित.
सहाजिकच त्याचा फायदा भारतीय कापूस व्यापारी आणि शेतकऱ्यांना देखील होणार आहे. आत्ताच आपल्याकडे कापसाला दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलच्या पुढे दर मिळताना दिसत आहे. जर एकंदरीत जागतिक कापूस निर्यातीचा विचार केला तर अमेरिका हा सर्वात मोठा कापूस निर्यातदार देश असून अमेरिकेत प्रतिवर्षी 2कोटी 50 लाख गाठींचे सरासरी उत्पादन होत असते.
जर आपण अमेरिकेमधील कॅलिफोर्निया आणि टेक्सास या राज्यांचा विचार केला तर या ठिकाणी जास्तीचे कापूस उत्पादन होत असते परंतु यावर्षी या ठिकाणी दुष्काळ पडल्यामुळे या दोन्ही ठिकाणच्या कापूस उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. सहाजिकच कापूस निर्यातीत अव्वल असणारे अमेरिका या वर्षी पिछाडीवर जाणार हे नक्कीच.
त्यामुळे याचा फायदा थेट भारताला मिळण्याची शक्यता असून चीन व बांगलादेश या देशांना भारताकडून कापूस निर्यात होणार आहे त्यामुळे जागतिक बाजारपेठेत वजन आणि वाढीव दर असा दुहेरी फायदा भारताला व शेतकऱ्यांना मिळेल यात काही शंकाच नाही.
Published on: 04 September 2022, 01:41 IST