पिकांच्या निरोगी आणि जोमदार वाढीसाठी व जास्त उत्पादन मिळावे यासाठी शेतकरी बंधू विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा उपयोग करतात.यामध्ये मुख्य अन्नद्रव्य म्हणून नत्र,स्फुरद आणि पालाश यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. परंतु पिकांना मुख्य अन्नद्रव्य इतकेच सूक्ष्म अन्नद्रव्यांची देखील निकोप वाढीसाठी तेवढीच गरज असते.
यामध्ये विद्राव्य खतांच्या माध्यमातून मुख्य अन्नद्रव्य तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा केला जातो.परंतु विद्राव्य खतांमध्ये वेगळ्या प्रकारच्या ग्रेड येतात व त्यांच्या पिकांसाठी असणारा उपयोग देखिल वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. या लेखात आपण या बद्दलची माहिती घेऊ.
विद्राव्य खतांच्या विविध ग्रेड्स आणि त्यांचा पिकासाठी वापर
1- ग्रेड पहिली-19:19:19- या खताला स्टार्टर ग्रेड असेदेखील म्हटले जाते. या ग्रेडमध्ये नत्र हा अमाईड, अमोनियम,नायट्रेट या तीनही स्वरूपामध्ये आढळतो. शेतकरी बंधुंनी या ग्रेडचा वापर पीक वाढीच्या अगदी सुरुवातीच्या अवस्थेत शाखिय वाढीसाठी केला तर उत्तम फायदा मिळतो.
2- ग्रेड दुसरी-0:52:34- या खतास किंवा या ग्रेडला मोनोपोटॅसियम फॉस्पेट असे देखील म्हटले जाते. या खतांमध्ये स्फुरद व पालाश या महत्त्वाच्या अन्नद्रव्यांचे प्रमाण खूप प्रमाणात असते.
शेतकरी बंधुंनी या ग्रेडचा वापर फुलधारणा होण्यापूर्वी वा फुलधारणा झाल्यानंतरच्या कालावधीसाठी करावा. फळबागेत फळांच्या योग्य पक्वतेसाठी व आकर्षक रंग यावा यासाठी विशेष करून हे खत वापरले जाते.
3- ग्रेड तिसरी-12:61:0- या खतास मोनो अमोनियम फॉस्फेट असे देखील म्हणतात. यामध्ये असलेल्या अमोनिकल स्वरुपातील नत्र कमी असून पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे प्रमाण जास्त असते. पिकांच्या नवीन मुळाच्या आणि पिकाच्या जोमदार शासकीय वाढीसाठी फुलांच्या योग्य वाढीसाठी याचा उपयोग होतो.
4- ग्रेड चौथी-13:0:45- या खतास पोटॅशियम नायट्रेट असे म्हणतात. या खतांमध्ये नत्राचे प्रमाण कमी असून पाण्यात विद्राव्य असणाऱ्या पालाशचे प्रमाण खूप जास्त असते.
पिकांच्या फुलोऱ्यानंतरच्या अवस्थेत व पक्वता अवस्थेत या खताची आवश्यकता मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे या कालावधीत वापर करावा.दुसरे महत्त्वाचे या खताचे वैशिष्ट्य म्हणजे अवर्षण प्रवण स्थितीमध्ये पिके यामुळे तग धरायला सक्षम होतात.
Published on: 16 August 2022, 07:10 IST