आपल्याला माहित आहेच कि पिकांवर विविध प्रकारचे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी बोर्डो मिश्रण हे एक अतिशय चांगले बुरशीनाशक आहे.
बोर्डो मिश्रणाचा शोध हा प्रा. पी.ए.मिलार्डेट यांनी 1882 मध्ये प्रथम मोरचूद आणि चुना यांच्या मिश्रणाचा वापर फ्रान्समध्ये द्राक्षावरील केवडा रोगाच्या नियंत्रणासाठी केला. त्यानंतर महाराष्ट्रात देखील अनेक भाजीपाला पिकांवर आणि फळबागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रभावी नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रणाचा वापर केला जातो. या लेखामध्ये आपण बोर्डो मिश्रण तयार करताना घ्यायची काळजी आणि विविध भाजीपाला पिके आणि फळे पिकांमध्ये वापरायची पद्धत जाणून घेऊ.
विविध फळ पिकांवरील रोग नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रणाचा वापर
1- आंबा करपा-0.8 टक्के द्रावण पावसाळा सुरू होण्यापूर्वी दोन फवारे आणि जून ते ऑगस्टपर्यंत या चार फवारण्या कराव्यात.
2- केळीच्या पानांवरील ठिपके-0.8 टक्के द्रावण जून ते ऑगस्ट पर्यंत दोन ते तीन वेळा फवारणी करावी.
3- डाळिंब पानावरील काळे डाग-0.8-1 टक्के द्रावण बहार धरल्यानंतर नवीन फुटीवर एक ते दोन फवारे आणि फळांची काढणी करेपर्यंत तीन ते चार फवारे करावेत.
4- पपईच्या पानावरील ठिपके- एक टक्के द्रावण ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात 1-1 वेळा फवारणी करावी.
5- संत्रा, मोसंबी व लिंबू- पानांवरील काळे डाग- एक टक्के द्रावण बहारानंतर दोन-तीन फवारे, जिवाणूंमुळे होणारा करपा असेल तर एक टक्के द्रावण मे ते डिसेंबर महिन्यात दरम्यान एक महिन्याच्या अंतराने सहा फवारे द्यावे. शेंडामर- एक टक्के द्रावण वर्षातून दोन ते चार वेळा फवारणी करावी. तसेच 0.8-1 टक्के द्रावण फळे जेव्हा सुपारीच्या आकाराची होतात त्यानंतर तीन ते चार वेळा फवारणी करावी.
6- सिताफळाच्या पानावरील काळे डाग-0.8 टक्के द्रावण पावसाळ्यापूर्वी एक ते दोन वेळा फवारणी करावी. 1% द्रावण जून ते सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान महिन्याच्या अंतराने चार फवारण्या कराव्यात.
भाजीपाल्यावरील विविध पिकांसाठी वापर
मिरची, बटाटा, टोमॅटो, भोपळा वर्गीय भाज्या, कोबी, वांगी आणि वाटाणा इत्यादी पिकांवरील करपा, काळा करपा, पानावरील ठिपके, केवडा, भुरी, जिवाणूजन्य करपा अशा विविध रोगांच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रणाचा वापर करता येतो. त्यासोबत पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार द्रावणाची तीव्रता ठरवावी लागते.
साधारण भाजीपाला पिकासाठी 0.5 ते 0.6टक्के तीव्रतेचे द्रावण फवारणी साठी चांगले मानले जाते.यापेक्षा जास्त प्रमाण वापरले तर पिकांमध्ये दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.
यामध्ये महत्त्वाचे
1- जमिनीतील बुरशीमुळे होणारे मर, मुळकुज, खोडकुज इत्यादी रोगांच्या नियंत्रणासाठी सुद्धा बोर्डो मिश्रण एक टक्का हे एक उत्तम बुरशीनाशक आहे.
2- एक टक्का तीव्रतेचे बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी एक किलो मोरचूद, एक किलो चुना आणि शंभर लिटर पाणी लागते.
3- बोर्डो पेस्ट तयार करण्याकरता एक किलो चुना, एक किलो मोरचूद आणि दहा लिटर पाणी असे प्रमाण ठेवावे.
बोर्डो मिश्रण तयार करताना घ्यायची काळजी
1- कळीचा चुना वापरतांना तो दगड विरहित असावा.
2- बोर्डो मिश्रण करताना कोणत्याही धातूच्या भांड्याचा वापर करू नये.
3- फवारणी होईपर्यंत प्लॅस्टिक ड्रममध्ये मिश्रण साठवावे.
4- दोन अलग केलेली द्रावणे एकमेकांमध्ये मिसळताना थंड असावीत.
5- फवारणीसाठी मिश्रण वस्त्रगाळ करून वापरावे.
6- पावसाळ्यात मिश्रण वापरताना चिकट द्रव्य म्हणजे स्टीकर चा वापर करावा.
7- मिश्रण बनवण्यासाठी चांगले स्वच्छ पाणी वापरावे क्षारयुक्त पाणी वापरू नये.
8- विरी गेलेला चुना किंवा भुकटी वापरू नये.
9- मिश्रण ढवळताना लाकडी किंवा प्लास्टिक काठीचा वापर करावा.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:शेतात गाळ माती वापरताना ही काळजी घ्यायलाच हवी, खूप फायदा होतो
नक्की वाचा:डोंगर आणि झाडाशिवाय जमीनीत पुरेसे पाणी साठवणे अशक्य आहे
Published on: 29 April 2022, 01:12 IST