ग्रामीण भागात शेळीपालन हा फायदेशीर व्यवसाय म्हणून उदयास आला आहे.आज शेतकरी अल्प व अत्यल्प शेतीसोबत शेळी पालन व्यवसाय करून स्वतःचे उत्पन्न वाढवत आहेत. या व्यवसायाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कमी गुंतवणुकीत जास्त नफा याद्वारे मिळतो.
तसेच शेळीच्या दुधाला आणि मांसाला बाजारात देखील मागणी चांगली आहे. तसेच बकरीचे दूध हे आरोग्यदायी असून अनेक प्रकारचे आजार दूर करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. परंतु शेळीपालनामध्ये चांगला नफा हवा असेल तर त्यांचे व्यवस्थापन करणे देखील तितकेच गरजेचे असते.
या व्यवस्थापनामध्ये आरोग्य व्यवस्थापन हा एक कळीचा मुद्दा आहे. शेळ्यांना देखील विविध प्रकारचे आजार होत असतात. त्यांचे वेळीच बंदोबस्त केला नाही तर शेळी पालकाला आर्थिक फटका बसण्याची शक्यता असते. या लेखामध्ये आपण शाळांना होणाऱ्या अशाच एका आजाराबद्दल माहिती घेणार आहोत
शेळ्यांना होणारा 'न्यूमोनिया पाश्चरायसिस' रोग
हा रोग पाश्चरेला हेमोलाइटिक नावाच्या जिवाणूमुळे होतो. हा रोग एका प्राण्यापासून दुसरा प्राण्यात झपाट्याने पसरतो. या आजाराने ग्रस्त असलेले प्राणी इतर प्राण्यांमध्ये वेगाने या आजाराचा प्रसार करतात.
अचानक वातावरणातील बदल, जनावरांमध्ये पोषक तत्वांचा अभाव किंवा जनावरांना लांबचा प्रवास करावा लागणे इत्यादी कारणांमुळे हा रोग होतो.
हा आजार बहुतेक पावसाळ्यात होतो. प्राण्यांमध्ये आजाराने दूषित अन्न आणि पाण्याद्वारे पसरतो. एवढेच नाही तर या आजाराचा संसर्ग श्वासामुळे देखील होऊ शकतो.
या आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या जनावरांना तीव्र ताप येतो, शेळ्या नैराश्यात जगू लागतात तसेच त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो. तसेच श्वास घेताना जनावरांच्या तोंडातून घरघर असा आवाज येतो. या आजाराने ग्रस्त शेळ्या लवकर मरण पावतात.
नक्की वाचा:पशुजगत:गोठ्यातील जनावरांचा माज ओळखा आणि टाळा होणारे आर्थिक नुकसान, वाचा सविस्तर माहिती
शेळ्यांचे या आजारापासून संरक्षण करण्यासाठी उपाययोजना
1- दरवर्षी पावसाळ्यापूर्वी जनावरांना या रोगाविरुद्ध लसीकरण करावे.
2- या रोगाच्या उपचारात पशुवैद्यकांच्या मदतीने सेफ्टीओफर सोडियम, ऑक्सिटेट्रासायक्लीन नावाची प्रतिजैविक औषधे वापरली जाऊ शकतात. यासोबतच लक्षणांनुसार दाहक विरोधी,अँटीपायरेटिक औषधे नियमित दिली जाऊ शकतात.
3- याशिवाय काही खबरदारी देखील घेणे गरजेचे असते. जसे, रोगट जनावरांना इतर निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवणे गरजेचे असते. तसेच शेळ्या राहत असलेली जागा किंवा गोठा स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवावा.
4- रोगाचे सुरुवातीचे लक्षणे दिसताच पशुवैद्यकाशी तात्काळ संपर्क साधावा. जेणेकरून आजार वाढणार नाही आणि रोगावर वेळीच उपचार करता येणे शक्य होईल.
Published on: 16 July 2022, 04:23 IST