महाराष्ट्रातील स्थानिक शेळ्यांच्या जातींची रोगप्रतिकारक शक्ती तसेच उष्ण वातावरणात टिकून राहण्याची क्षमता चांगली आहे. शेळीपालनामध्ये व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे महत्त्वाचे आहे. व्यवस्थापनाची पद्धत एकूण शेळ्यांची संख्या व उत्पादनाचा प्रकार यावर अवलंबून आहे. शेळी व्यवस्थापनामध्ये मुक्त व्यवस्थापन, बंदिस्त व्यवस्थापन आणि मिश्र व्यवस्थापन हे मुख्य तीन प्रकार आहेत.
मुक्त व्यवस्थापन
या पद्धतीत चाऱ्यावरील खर्च शून्य असतो. या पद्धतीमध्ये शेळ्या नैसर्गिक पद्धतीच्या चाऱ्यावर किंवा झाडपाल्यावर जोपासल्या जातात. गोठा, चारा, औषधोपचार आणि मजुरांवर सर्वात कमी खर्च होतो. मुक्त व्यवस्थापन पद्धत मांस उत्पादनासाठी बरी आहे, परंतु शेळीपासून व्यापारी तत्त्वावर उत्पादन मिळू शकत नाही. या व्यवस्थापनात शेळ्यांना संतुलित आहार मिळेलच असे नाही. शेळ्यांचा कळपसारख्या वयाचा नसतो, त्यामुळे शेळ्यांना चरावयास सोडले असता चारा खाण्यामध्ये स्पर्धा असते. करडे लहान असल्यामुळे त्यांना चारा मुबलक प्रमाणात मिळत नाही. लहान करडे झाडपाला खाऊ शकत नाहीत. त्यामुळे मुक्त व्यवस्थापनात करडांची वाढ चांगली होईलच याची खात्री नसते.
हेही वाचा : कमी खर्चात करा शेळीपालन, अन् व्हा मालामाल
चांगल्या शेळ्या या रोगी शेळ्यांच्या संपर्कात आल्यामुळे रोगाचा प्रादुर्भावमुक्त व्यवस्थापनात जास्त पाहायला मिळतो. नैसर्गिक आपत्तीपासून जसे ऊन,वारा, पाऊस तसेच हिंस्र श्वापदे यापासून संरक्षण मिळत नाही. शेळ्यांच्या खाण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवता येत नाही. मुक्त व्यवस्थापनात शेळ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी माळरानावर चरावयास घेऊन गेल्यामुळे एका ठिकाणी चारा उपलब्ध होऊ शकत नाही.
बंदिस्त व्यवस्थापन
चराऊ व पडीत क्षेत्र कमी झाल्यामुळे शेळ्या मोकळ्या चरावयास सोडणे कठीण आहे. बंदिस्त पद्धतीने शेळीपालन जास्त फायद्याचे असते कारण या पद्धतीने शेळ्यांचे वजन लवकर वाढते. शेळ्यांची काळजी घेणे जास्त सोईस्कर होते. रोगनियंत्रण करणे सोपे जाते.
या पद्धतीत शेळ्यांना गोठ्यात बांधून ठेवले जाते. त्याठिकाणी चारा, पाणी व खुराकाची व्यवस्था केली जाते. गोठ्याचा आकार शेळ्यांच्या संख्येनुसार असतो. गोठ्याच्या आतील जागा प्रत्येक शेळीस १५ चौ. फूट किंवा १.५ चौ. मीटर लागते. तर गोठ्याच्या बाहेरील भागात २० चौ. फूट किंवा २ चौ. मीटर जागा लागते, बाहेरील जागेभोवती तारेचे कुंपण लावावे.
हेही वाचा : शेळीपालन एक फायदेशीर शेतीपूरक व्यवसाय
गोठ्याची लांबी पूर्व- पश्चिम ठेवावी. मध्यभागी गोठा उंच ठेवावा. दोन्ही बाजूंस छप्पर उतरते असावे. गोठ्याच्या आत चारा टाकण्यासाठी जमिनीपासून १ ते १.५ फूट उंचीवर गव्हाण असावी. पाण्याची व्यवस्था गोठ्याच्या बाहेर हौद किंवा सिमेंटचे अर्धे पाइप ठेवून करावी. बोकडांचा गोठा वेगळा करावा. आहार हा शरीराच्या गरजेनुसार दिला जातो. ऊन, वारा, पाऊस, थंडी, हिंस्र श्वापदे यापासून संरक्षण दिले जाते. त्यामुळे शेळ्यांना आराम मिळतो. शेळ्यांच्या खाण्याच्या सवयी वर नियंत्रण ठेवता येते. उपलब्ध साधनसामग्रीचा पुरेपूर वापर करून उत्पादनाची कार्यक्षमता वाढविता येते. व्यक्तिगत शेळी, बोकाडावर लक्ष देता येते.
मिश्र व्यवस्थापन
मिश्र व्यवस्थापनामध्ये शेळ्यांना अर्धा वेळ गोठ्यामध्ये आणि अर्धवेळ शेती, माळरानावर चरावयास नेले जाते. जेव्हा शेतकऱ्याला पूर्ण वेळ गोठ्यामध्ये खाद्य देणे परवडत नसेल किंवा मुबलक चारा किंवा खाद्य उपलब्ध नसेल अशा वेळेस शेळ्यांना दिवसातील एक वेळ ४ ते ६ तासांपर्यंत चरायला सोडून बाकीच्या वेळेत गोठ्यामध्ये पूरक चारा व खाद्याची सोय करतात. ज्या ठिकाणी चारा भरपूर उपलब्ध नाही, चरण्यास जंगल कुरण नाही, झाडेझुडपे कमी प्रमाणात आहे. अशा ठिकाणी ही पद्धत उपयोगी ठरते.
प्रतिनिधी गोपाल उगले
Published on: 23 July 2021, 06:54 IST