घरात सुरक्षित व अधिक काळापर्यंत धान्य साठविन्यासाठी नैसर्गिक उपाययोजना व खबरदारी आपण खेड्यात किंवा शहरात राहत असलो तरी वेळे अभावी, दरांच्या वाढत्या किमती व दळवळनाचा खर्च टाळण्यासाठी आपल्याला काही दिवस पुरेल इतके गहू, तांदूळ तसेच कडधान्य आपण घरात साठवून ठेवत असतो.
आणि गरजेप्रमाणे त्याचा वापर करतो.लवकरच पावसाळा सुरू होणार आहे. या काळात हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढते म्हणून कीटकांचे प्रजजन जलद होऊन धान्याला किडी लागतात आणि धान्य खराब होते.
किडींमध्ये सोंडे किडा, सुरसा, पांढरी अळी, पाकोळी, म्हैस किडा, इत्यादी अनेक प्रकारचे कीटक धान्याचे नुकसान करतात.
सध्या याचे नियंत्रण कशा प्रकारे केले जाते?
१) बाजारात सेल्फोस टॅबलेट मिळतात याचा उपयोग कोठीतील धान्यात केला जातो. हे कीटकनाशक कोठीत टाकून बंद केले म्हणजे कोठीच्या आतील तापमान वाढते आणि विषारी वायू तयार होतो. या वायूने आतील सर्व प्रकारचे कीटक मारले जातात.
२) बाजारात बोरीक पावडर मिळते. ही पावडर धान्यात मिसळली म्हणजे कीटकांच्या खाण्यात येऊन कीटक मरतात.वरील दोन्ही उपाय करायला सोपे आहेत आणि गृहिणी सर्रास याचाच वापर करतात.
वरील दोन्ही उपाय सोपे जरी असले तरी मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहेत, त्यामुळे याचा उपयोग करणे न करणे अधीक चांगले.पहिल्या उपयात सेल्फोस टॅबलेट सांगितले. त्यातून फॉस्फिन नावाचा विषारी वायू तयार होतो जो हवेपेक्षा जड आहे.
नक्की वाचा:रोपवाटिकेपासून कांदा पिकातील रोग, कीड नियंत्रण
म्हणून सतत घरात जमिनीच्या समांतर राहतो. रात्री झोपताना आपण खिडक्या दारे बंद करतो. त्यावेळी आपल्या श्र्वासातून हा विषारी वायू आपण आत घेत असतो. त्याचा परिणाम लगेच नाही पण काही दिवसांनी जाणवतो. आपली प्रतिकार शक्ती कमी कमी होत जाते आणि आजार वाढतात.
दुसऱ्या उपायात बोरीक पावडर सांगितली आहे. बोरीक पावडर म्हणजे बोरीक असिड असून ते धान्यासोबत आपल्या शरीरात जात असते. आणि त्यातून क्रॉनिक टॉक्सिसिटी म्हणजे स्लो पॉयजन च्या रूपात हळू हळू आपल्या शरीरावर वाईट परिणाम करून कालांतराने किडनी फेल व्हायला लागते .
म्हणून वरील दोन्ही उपाय न करता
काय केले पाहिजे?
पूर्वीच्या काळी धान्य साठवायला कणगी असायची, त्याला देशी गाईचे शेण गोमुत्र ने सारवले जाई. धान्य साठविण्याआधी कनगीला मिरची आणि लसूण ची धुरी दिली जात असे. त्यामुळे किडी चार हात लांब राहत होत्या. शिवाय धान्य साठविताना करंज पाला, कडुनिंब पाला टाकला जायचा.
नक्की वाचा:चक्रभुंगा व्यवस्थापनासाठी फक्त एव्हढ करा आणि चक्रीभुंग्या पासून सोयाबीन ला सुटका मिळवा
सध्या काय करायला हवे?
1) धान्य मे महिन्याच्या उन्हात चांगले वाळवून घ्यावे. यामुळे धान्यात आधीच असलेले कीटक आणि अंड्यांचा नाश होईल. धान्यतील आर्द्रता कमी झाली की कीटकांचा प्रादुर्भाव कमी होतो.
2) तांदूळ साठविताना त्याला हळद चोळून ठेवली तर कीड /अळी लागणार नाही.
3) शेवया, सरगुंडे,तिखट, धने पावडर , मसाल्यासारख्या पावडर मध्ये बिबे टाकून ठेवल्यास अधिक काळ सुरक्षित राहू शकेल.
4) धान्य साठवत असताना त्यात
कडुनिंब, करंज, घाणेरी या वनस्पतीचा पाला एक दिवस अगोदर सावलीत कडक वाळवून कापडी पिशवीत बांधून ठेवावा. ही पिशवी धान्य साठविताना धान्यात टाकावी.
यामुळे नुसता पाला टाकल्यानंतरचा होणारा कचरा टाळता येतो
5) डाळी (चना, हरबरा, मूग, उडीद इ) डब्यात ठेवताना त्याचे झाकण चांगले बसवा. म्हणजे कीटकांचे पतंग अंडी घालायला आत जाणार नाहीत.
6) वरील डाळींना हलके खाद्य तेल चोळले म्हणजे कीटकांच्या मादीला यावर अंडी घालता येत नाही.
7) कडधान्याला गवरीची राख चोळली तर कीड लागत नाही. हा प्रयोग बियाणे साठविताना अवश्य करावा.
8) धान्य साठविण्याच्या कोठ्या, तागाची पोती कडक उन्हात वाळूवून, झटकून आतून स्वच्छ करून त्याला निम तेल, एरंड तेल लावून मगच त्यात धान्य साठवावे, त्यांमध्ये कीड नियंत्रक सापळा, PSI पॉलीबॅग सारख्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास निश्चित धान्य सुरक्षित राहील.
9)धान्याच्या कोठ्या, पोते जमिनीपासून उंच तसेच भिंती पासून दूर ठेवावे.
10) पावसाळ्यापर्यन्त पुरेल इतके धान्य वेगळे काढून इतर धान्य पूर्णपणे हवाबंद राहील असे साठवल्यास वर्षभर धान्य सुरक्षित राहू शकेल.
वरीलप्रमाणे प्रयोग करून बघितल्यास नक्कीच धान्य वरच्यावर स्वच्छ करण्याचे श्रम वाचून नैसर्गिक उपाययोजने द्वारे अधिक काळ सुरक्षित राहू शकेल
एक पाऊल विषमुक्त अन्नाकडे....
प्रणिता कडु
गृहविज्ञान विशेषज्ञ
कृषी विज्ञान केंद्र, अमरावती 1, महाराष्ट्र
Published on: 07 June 2022, 09:15 IST