महाराष्ट्रामध्ये उसाची लागवड प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा मध्ये खूप जास्त प्रमाणात केली जाते. तसे पाहायला गेले तर सगळ्याच महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात उसाची लागवड होतेच. ऊस पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. जास्त खर्चिक असणारे हे पीक असून व्यवस्थित व्यवस्थापन आणि सगळ्याच गोष्टींचे नियोजन जर चांगले राहिले तर या पासून मिळणारे उत्पादन हे जास्त प्रमाणात मिळते.
ऊस पिक हे ग्रामीण भागाचा एक आर्थिक तसेच औद्योगिक कणा आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. चला तर मग या लेखात आपण ऊस शेतीतील यशाचे काही ठळक मुद्दे समजून घेऊ.
नक्की वाचा:Management: हिवाळ्यात भरघोस उत्पादन हवे असेल तर वापरा 'या' टिप्स,मिळेल आर्थिक नफा
ऊस शेती व्यवस्थापन
इतर पिकांप्रमाणेच ऊस पिकाचे देखील वाढीचे वेगवेगळे टप्पे असतात जसे की, लागवड केल्यानंतर त्याची उगवण, तसेच त्याची फुटवे, कांडी सुटणे आणि जोमदार वाढ या प्रमुख अवस्था आहेत.
आता बरेच शेतकरी व्यापारी तत्त्वावर उसाची लागवड करत असून ऊस शेतीत सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन खर्च कमीत कमी करून चांगली उत्पादकता वाढवत आहेत व ते सहज शक्य झाले आहे.
सगळ्यात महत्वाचे आहे पाणी व्यवस्थापन
उसाला तीन प्रकारे पाणी देण्याची पद्धत आहे. पाट पाणी किंवा प्रवाही सिंचन, ठिबक सिंचनाद्वारे किंवा तुषार सिंचनाचा वापर करून पाणी व्यवस्थापन केले जाते.
आता बरेच शेतकरी जेव्हा पाटपाणी अर्थात प्रवाही सिंचनाच्या माध्यमातून ऊसाला पाणी देतात तेव्हा नागमोडी पद्धत अवलंबतात. परंतु यामुळे पिकाला गरजेपेक्षा जास्त पाणी जाते व जमीन क्षारपड होण्याचा मोठा धोका संभवतो. त्यामुळे प्रवाही सिंचन करायचे असेल तर ते सरीच्या माध्यमातून केलेले कधीही चांगली ठरते.
ठिबक सिंचन तंत्र उसासाठी खूप वरदान समजले जाते. कमीत कमी उपलब्ध पाण्यामध्ये दुपटीपेक्षा जास्त क्षेत्र ओलिताखाली आणता येते हे आपल्याला माहिती आहे. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी पुरवठा केल्याने उसाच्या मुळांच्या क्षेत्रात चांगल्या प्रकारे ओलावा राहतो तसेच इतर भाग कोरडा राहतो.
इतर भाग कोरडा राहिल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव वाढत नाही. तसेच अगदी उंच-सखल किंवा अगदी पडीक जमिनीत देखील लागवड करता येणे शक्य होते.
तसेच उसाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे जे काही कीटकनाशक किंवा खते त्यासोबतच संजीवके यांचा संतुलित पुरवठा ऊसाला करता येतो. त्यामुळे उसाची लांबी, एकूण कांड्याची संख्या तसेच वजनामध्ये व जाडीत वाढ होते.
ऊसाला खत व्यवस्थापन खूप महत्वाचे
रासायनिक खतांच्या किमती मधील वाढ आणि बऱ्याचदा वेळेवर उपलब्धता न झाल्यामुळे यांना पर्याय म्हणून उसासाठी अझटोबॅक्टर व स्फुरद विघटक जिवाणूंची प्रक्रिया केल्यास रासायनिक खतामध्ये बचत करता येणे शक्य आहे.
त्यासोबतच ऊस उत्पादन आणि एकूण उत्पादकतेमध्ये ज्या काही रोग किंवा कीटक यांच्यामुळे घट येते त्यांच्या नियंत्रणासाठी ऊसावर बेणे प्रक्रिया करणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे चांगल्या बेण्याचा वापर व त्यावर बेणेप्रक्रिया केल्यास उसाच्या उत्पादनात 10 ते 15 टक्के वाढ होते.
पिकाच्या संरक्षणासाठी तीन आळवणी व फवारण्या कराव्यात. संजीवकांची फवारणी करायचे असतील तर त्या पाच केले तरी चालतात. या सर्व गोष्टी आणि अजून काही महत्वपूर्ण गोष्टी जर व्यवस्थित केल्या तर उत्पादन नक्की चांगले मिळते.
Published on: 06 August 2022, 01:46 IST