शेती क्षेत्रात जर काळाच्या ओघात बदल केला तर शेती मधून लाखो रुपयांचे उत्पन्न सहजरीत्या कमवले जाऊ शकते. कृषी तज्ञांनी देखील शेतकरी बांधवांना शेतीमध्ये बदल करण्याचा सल्ला दिला आहे. यात प्रामुख्याने पीक पद्धतीत बदल करणे अनिवार्य आहे याबरोबरच शेतकरी बांधवांना आधुनिकतेची कास धरणे देखील अनिवार्य झाले आहे.
यामध्ये ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करणे, माती परीक्षण करणे, खतांचा योग्य वापर करणे, पीकपद्धतीत बदल करणे, मागणीनुसार पिकांची निवड करून लागवड करणे यांसारख्या बाबी प्रमुख आहेत. रायगड जिल्ह्यात देखील एका प्रयोगशील शेतकऱ्याने पीक पद्धतीत बदल करून शेतीमधून लाखों रुपयांची कमाई केली आहे.
विशेष म्हणजे हा अवलिया शेतकरी रायगड जिल्ह्यातील अतिशय दुर्मिळ भागात वास्तव्यास असून तेथेच शेती करतो. दुर्मिळ भागात असून देखील या अवलिया शेतकऱ्याने शेतीचा व्यवस्थित अभ्यास करून स्ट्रॉबेरी लागवडीचा नावीन्यपूर्ण प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. फक्त स्ट्रॉबेरी लागवड यशस्वी केली असे नाही तर या पिकातून त्याला लाखो रुपयांचे उत्पन्न प्राप्त होण्याची आशा देखील आता बळकट होऊ लागली आहे.
जिल्ह्यातील अतिदुर्गम तालुका म्हणून ओळखला जाणारा पोलादपूर तालुक्याच्या टोकाला वास्तव्यास असलेले प्रगतशील शेतकरी रामचंद्र कदम यांनी डोंगराळ भागात स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड करून दाखवली आहे. या प्रयोगशील शेतकऱ्याने स्ट्रॉबेरी व्यतिरिक्त इतर पिकांची देखील यशस्वी लागवड केली आहे. कदम यांच्या मते, जिल्ह्यात स्ट्रॉबेरीची लागवड करणारे ते पहिलेच शेतकरी आहेत. त्यामुळे कदम यांनी फुलवलेली स्ट्रॉबेरी ची बाग इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहे.
पोलादपूर तालुक्यासारख्या अतिदुर्गम भागात वास्तव्यास असून देखील रामचंद्र यांनी शेतीमध्ये प्राप्त केलेले दैदिप्यमान यश इतर शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रेरीत करणार आहे. रामचंद्र यांनी आपल्या उदाहरणातून शेती विकायची नसते तर शेती राखायची असते हे दाखवून दिले आहे.
रामचंद्र कदम यांनी आपल्या शेतात ड्रॅगन फ्रुट, आले, थाई ब्रिंजल या पिकाची लागवड केली आहे. पोलादपूर तालुका रायगड जिल्ह्यातील अतिशय टोकाचा तालुका असून डोंगराळ भाग म्हणून ओळखला जातो. डोंगराळ भाग असल्याने येथील शेतकरी बांधव शेतीपासून दुरावत चालला आहे. मात्र आज या अतिदुर्गम भागात रामचंद्र यांनी तब्बल 24 एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरी, आले समवेतच विविध पिकांची यशस्वी लागवड करून लाखो रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे.
रामचंद्र यांच्या शेतातील थाई ब्रिन्जल आगामी काही दिवसात काढणीसाठी तयार होणार असून या पासून त्यांना चांगले उत्पन्न मिळणार असल्याची आशा आहे. रामचंद्र यांनी लावलेल्या ड्रॅगन फ्रुटचे देखील आता जोमाने वाढ झाली असून येत्या पाच ते सहा महिन्यात ड्रॅगन फ्रुट ला फळे येण्यास सुरुवात होणार असून यापासून त्यांना चांगले उत्पन्न प्राप्त होणार आहे. रामचंद्र कदम यांनी पोलादपूरसारख्या डोंगराळ भागात विविध पिकांची यशस्वी लागवड करून दाखवली आहे.
येत्या काही दिवसात काढणीसाठी तयार होणाऱ्या स्ट्रॉबेरी पिकातून त्यांना लाखों रुपये उत्पन्नाची आशा आहे. रामचंद्र कदम यांनी पाण्याची टंचाई भासू नये म्हणून एक मोठा शेततलाव देखील बांधला आहे यासाठी त्यांना शासनाच्या अनुदानाची मदत लाभली आहे. शेतीमध्ये मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार देण्यात आले आहेत. रामचंद्र कदम यांचे यश भविष्यात इतर शेतकऱ्यांना शेतीकडे आकृष्ट करायला लावणार आहे.
संबंधित बातम्या:-
शेतकरी पुत्राची कमाल! कसा एका शेतकऱ्याचा पोरगा अरबपती होतो? वाचा शेतकरी पुत्राची यशोगाथा
जिओ बदलणार भारतीय शेतीचे चित्र! ड्रोन ऑपरेशन प्लॅटफॉर्म स्कायडेक लाँच; वाचा याचे फायदे
Published on: 24 March 2022, 08:52 IST