थंड हवेच्या ठिकाणी उत्पादित केली जाणारी स्ट्रॉबेरीचं आता दुष्काळी भागामध्येही उत्पादन घेतलं जाऊ शकतं. हो, तुम्हाला विश्वास नाही होत, आहो खरचं सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागात एका पठ्ठ्याने लाखो रुपयांचं स्ट्रॉबेरीतून उत्पन्न घेतलं आहे. आत्तापर्यंत आपण ऐकून होतो की महाबळेश्वर सारख्या थंड हवेच्या ठिकाणी स्ट्रॉबेरी (Strawberry) या फळाची लागवड केली जाते.
परंतु खटाव येथील शेतकरी राजेश देशमुख यांनी तीन वर्षे या पिकावर अभ्यास करून अवघ्या 30 गुंठे क्षेत्रावर स्ट्रॉबेरीचे पीक घेतले. नुसती लागवडचं केली नाही तर त्यातून दररोज पंचवीस ते तीस हजार रुपया प्रमाणे महिन्याकाठी या शेतकऱ्याने (Farmer) तब्बल पाच लाखांची उलाढाल सुरू केली आहे. आजपर्यंत या केलेल्या अभिनव प्रयोगातून राजेश देशमुख यांनी वीस लाखांची उलाढाल केली असून या पिकाला लागणारा सर्व खर्च वगळता देशमुख यांनी या पिकातून निव्वळ बारा लाख रुपयांचा नफा मिळवला आहे.
हेही वाचा : सरकारी नोकरीला टाटा बाय बाय करत केली शेती; कमावले 16 लाख रुपये
असा केला अशक्य वाटणारा प्रयोग
सुरुवातीला महाबळेश्वर सारख्या थंड हवेच्या ठिकाणी पिकणारी स्ट्रॉबेरी उष्ण हवामानात कशी पिकवायची हे मोठे आव्हान होते. परंतु राजेश देशमुख यांनी या ओसाड जमिनीवर महाबळेश्वर येथील काही तज्ञ शेतकऱ्यांना आणलं. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं आणि त्यानंतर हा अभिनव प्रयोग करण्यास सुरुवात केली. सातारा जिल्ह्यातील पूर्व भाग हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. या भागामध्ये पाण्याची वन वन असल्यामुळे शेतकऱ्यांना शेती करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आत्तापर्यंत कमी पाण्यात येणारी पिके येथील शेतकरी घेत होते कोणीही स्वप्नात सुद्धा विचार करणार नाही असे प्रयोग राजेश देशमुख या शेतकऱ्यांनी केल्यामुळे आता इतर शेतकऱ्यांनाही या गोष्टीचा फायदा होणार आहे.
दरम्यान देशमुख यांनी आता स्ट्रॉबेरीमध्ये अंतर पीक घ्यायला सुद्धा सुरुवात केली आहे. सध्या स्ट्रॉबेरीच्या या शेतीमध्ये काही क्षेत्रांमध्ये स्ट्रॉबेरीला आंतरपीक म्हणून त्यांनी लसणाची सुद्धा लागवड केलेली आहे. तीन वर्ष अभ्यास करून लागवड केलेल्या स्ट्रॉबेरीच्या पिकाने देशमुख यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले आहे. या स्ट्रॉबेरीच्या लागवडीमुळे केवळ राजेश देशमुख यांना फायदा झाला नसून या भागात असलेल्या महिलांना सुद्धा हाताला रोजगार मिळालेला आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या संकटामुळे रोजगार थांबले होते. परंतु या भागातील महिलांना आलेल्या स्ट्रॉबेरीची देखभाल करणे तोडणी करणे असा रोजगार उपलब्ध झाला आहे.
Published on: 04 February 2022, 09:27 IST