फाल्गुन पंचमीपासून जिल्ह्यात शिमगोत्सवाला सुरुवात झाली. अगदी गुढीपाडव्यापर्यंत हा शिमगोत्सव साजरा होणार असून, गावोगावी शिमगोत्सवाची धूमधाम पहायला मिळत आहे. कोरोनामुळे शासनाने निर्बंध घातल्यामुळे मागील दोन वर्षे हा उत्सव जल्लोषात साजरा करता आला नव्हता. यंदा मात्र हा उत्सव जोशात साजरा करण्यात येत आहे. शिमगोत्सवाला प्रत्येक मैलामैलावर वेगवेगळी परंपरा आहे. कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिमगोत्सवाची परंपरा मोठी आहे. काही गावांमध्ये सहाणेवर पालखी उत्सव साजरा केला जातो. याठिकाणी प्रत्येक वाडीत किंवा गावातील पूजा करतात.
अनेक गावांमध्ये ग्रामदेवता प्रत्येक घराघरात जाऊन ग्रामस्थांचे गाऱ्हाणे ऐकून घेते व त्यांना आशीर्वाद देते. काही भागांमध्ये ग्रामदेवता पालखीमधून संपूर्ण गाव किंवा शहराची ग्रामप्रदशिक्षणा करते. ग्रामदेवतेच्या या आगमनामुळे ग्रामीण भागात मोठा उत्साह पसरला आहे. घरोघरी जाऊन देवतांच्या पालख्या नाचवल्या जात असून गावकरी मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत करत आहेत. इच्छापूर्तीसाठी शेरणही काढण्याची परंपरा पाहायला मिळते आहे. गावातील मुले मनोरंजनासाठी आट्यापाट्यासारखे खेळ खेळत असून, काही ठिकाणी सोंग काढत गावकऱ्यांचे मनोरंजन केले जाते आहे. शिमग्याच्या निमित्ताने खुले सूर घुमत असून शिमग्याचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
गुहागर तालुक्यातील अडूर येथे शिमगोत्सवात अनोखी परंपरा जपली जाते. सहाव्या होळीच्या दिवशी संकासुर पेटत्या होमातून धावत पाठलाग करतो. फाल्गुन पंचमीच्या दुसऱ्या दिवशी अडूर गावाची ग्रामदेवता श्री सुंकाई देवीचे खेळे भोवनीकरीता बाहेर पडतात. या अंतर्गत कोंडकारूळ, बोऱ्या, बुधल, पालशेत व नागझरी या गावांचा समावेश होतो. भोवनी झाल्यावर अडूर भाटी मैदान येथे रात्रीचे खेळी खेळले यावेळी पेटत्या होमातून धावणाऱ्या संकासुराचा थरार पाहण्यासाठी येथे गर्दी झाली होती.
ठाणे आणि रायगड जिल्ह्यात 'आमचे दाराशी हाय शिमगा, सण शिमग्याचा आयलाय गो आमचे गावान...’ या लोकशाहीर रमेश नाखवा यांच्या गाण्यामुळे या सणाला चांगलीचा उत्साह चढला आहे. शिमग्याच्या सणाची आगरी कोळ्यांची होळी म्हणजेच 'हावलूबाय.' समुद्र किनारी वसलेल्या कोळी समाजाचा महत्त्वाचा सण म्हणजे होळी पौर्णिमा. या होळी पौर्णिमेच्या स्वागताला नवी मुंबई, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या कोकण किनारपट्टीवरील संपूर्ण कोळीवाडे आठवडाभर आधी सज्ज होतो.
नाखवा जाच्यावर आपले पोट भरतो त्या लक्ष्मीला म्हणजेच होडीला सागर किनारी आणून, तिला रंगरंगोटी केली जाते. तर होडीची मालकीण म्हणजेच नाखविणीच्या नव्या कोऱ्या साडीचा झेंडा करून होडीला बांधला जातो, अशा आगळ्या-वेगळ्या पद्धतीने वर्षानुवर्षे हा होळीचा सण साजरा करण्यात येतो. रंगीबेरंगी साडीचे झेंडे आणि पताका समुद्रकिनारी डौलात फडकत असतात. जणू काही नटून-थटून व-हाडी मंडळी सज्ज झाल्याचे वातावरण दर्याकिनारी दिसू लागतात. गावातील वृद्धांपासून बालगोपाळापर्यंत सगळेजण पारंपरिक वाद्याच्या गजरात गावाच्या वेशीवरून वाजत गाजत आनंदाने मिरवणूक काढली जाते.
येथील अनेक गावांमध्ये 'एक गाव एक होळी' प्रथा असून काही गावांना १५० वर्षांपासून ती जोपासली जात आहे. 'हावलुबाय'ला म्हणजेच होळीला पुरणपोळी, तांदळाच्या पिठाच्या पाच पापड्या, नारळासोबत एका माळेत गुंफून हावलूबायला अर्पण करून पूजन केले जाते. तर राज्यातील उर्वरित परिसरात मंदिरा अथवा मोठ्या मैदानात मधोमध मोठे लाकूड उभे करून सभोवताली लाकडे, शेणाच्या गोवऱ्या व गवत उभे करून होळी पेटवण्यात येते. तसेच रूढी परंपरेनूसार प्रथा पार पडल्या जातात.
Published on: 16 March 2022, 04:10 IST