काय झाडी,काय डोंगर,काय हाटेल,ओक्के मदी हाय! मस्करी करावीशी वाटते ना ? एक आमदार असलेला माणूस ' असल्या भाषेत ' बोलतो याची खिल्ली उडवाविशी वाटते ना ? वाटणं साहाजिक आहे कारण,तुम्ही अजून कधी शेणाने सारवलेल्या जमिनीवर मांडी मारुन बुक्कीनी कांदा फोडून शेंगदाणाच्या चटणीबरोबर भाकर तुकडा मोडलेला नाही.चामड्याच्या कर्रकर्र करणाऱ्या जड चपला असूनही चिखलातून चालत जात,अनवाणी पायांनी शेतात केलेली पेरणी पाहिलेली नाही.. शेतीची अवजार वापरून वापरून गट्टे तुम्हाला कधी माहीतच
नाही. घरी आलेल्या पाहुण्याला " या की हो पाहुणेबुवा " म्हणत कधी बसायला घोंगड अंथरलेल नाही. आलेल्या पाहुण्याला बायकोने दोन किमीवरून भरून डोक्यावरून आणलेल्या पाण्याच्या हंड्यातलं तांब्याभर पाणी आणि साखरेचा गुळमाट चहा कधी दिलेला नाही.कधी शेतात बैल बसला तर जोत खांद्याला लावत दुसऱ्या बैलाला साथीला घेत कधी तुम्ही पाय भेगाळून जाई पर्यंत शेत नांगरलेलं नाही. घाटावरच्या ऐन थंडीत आईच्या सुखी लुगड्यात आणि आज्जीच्या वाकळीत लपेटून तुम्ही कधी घोंगडीवर निजलेले नाहीत.त्यामुळे तुम्हाला त्या रांगड्या,अशुद्ध पण अंत:करणातून आलेल्या शब्दांवर कोट्या कराव्याश्या वाटणं साहजिक आहे!
स्वाभाविक आहे हे कारण रस्त्याने चालायची वेळ कधी आलीच तर शेजारून जाणाऱ्या कारने उडवलेला चिखलाचा एखादा शिंतोडा कपड्यावर पडला तर " ओह शीट " असे उद्गार तुमच्या तोंडून सहज बाहेर पडतात..तुम्हाला नाहीच कळु शकत दुष्काळी भागातून आलेल्या एखाद्या माणसाला इतके निसर्ग सौंदर्य बघून वाटत असलेलं आश्चर्य! त्या क्लिप मध्ये आमदार शहाजी बापू पाटील पुढील ओळी म्हणाले आहेत.अकरा वेळा निवडून आलेल्या माणसाच्या मतदारसंघात चाळीस वर्ष झटतुया! मेलु मी ! माझं घरबारं बरबाद झालं ! पाटलाची सून आसुन माझ्या बायकुला लुगडं नीट मिळंना! दीडशे
एकर जमीन विकलिया आज पातुर! आजून काय करायचं राहिलया !!पोचतायत भावना ? या खऱ्या कार्यकर्त्यांच्या ??जमिनीचा तुकडा विकायला लागणं हे शेतकऱ्याच्या लेखी काळजाचा लचका तोडण्यासारखं असतं हे स्क्वेअर फुटांवर संपत्ती मोजून दोन अडीच BHK ला जग मानणाऱ्या कोट्यधीश असलेल्यांना काय करणार?चाळीस वर्ष झटून काम करणं म्हणजे काय हे अशा लोकांना नाहीच समजणार आणि त्यामुळेच तुम्हाला खिल्लीच उडवावीशी वाटणार त्या डोंगराची.शहाजीबापूंसारखी अनेक उदाहरणं डोळ्यासमोरून तरळून गेली म्हणून आज शेवटी सत्य परिस्थिती मांडावीच वाटली! असो,शहाजीबापू..दिल जीत लिया आपने
भुमिका
सॅंडी मेढे,पत्रकार/मोताळा
Published on: 08 July 2022, 10:01 IST