यशस्वी तोच होतो ज्याच्यात कष्ट करण्याची धमक असते मग ते क्षेत्र कितीही खडतर असो. याचीच प्रचिती समोर आली आहे मध्यप्रदेश राज्यात. राज्यातील सतना येथील एका तरुणाने आपल्या अपार कष्टाच्या जोरावर न्यायाधीशाची परीक्षा पास केली आहे. आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष. तर आम्ही आपणांस सांगू इच्छितो की, या तरुणाने या परीक्षेसाठी अथक परिश्रम घेतले, भाजीचा गाडा चालवला आणि शेवटी तरुणाने दिवाणी न्यायाधीशाच्या परीक्षेत यश मिळविले.
यामुळे या तरुणाचे यश हे इतरांप्रमाणे सामान्य नसून निश्चितचं अद्वितीय आहे. विशेष म्हणजे सतना जिल्ह्यातील अमरपाटण येथील शिवकांत कुशवाह यांनी या परीक्षेसाठी एकूण दहा वेळा प्रयत्न केले, म्हणजे त्यांना जवळपास 9 वेळा अपयश सहन करावे लागले आणि मग दहाव्यांदा यश मिळाले आहे.
निकालानंतर कुशवाह कुटुंबात आता जणूकाही आनंदाची लाट उसळली आहे. यानंतर त्यांचे अभिनंदन करणाऱ्यांची एकच झुंबड उडाली आहे. शिवकांत कुशवाह यांनी ओबीसी प्रवर्गातून राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. शिवकांत कुशवाह यांनी मेहनत आणि मेहनतीच्या जोरावर हे स्थान मिळवले आहे. निश्चितचं त्यांनी आपल्या नेत्रदीपक यशाने जिल्ह्याचे नाव संपूर्ण राज्यात रोशन केले आहे. आजही शिवकांत कुशवाह यांचे कुटुंब कच्च्या घरात राहत आहे.
सतना जिल्ह्यातील अमरपाटन येथे एका गरीब कुटुंबात जन्मलेले शिवकांत कुशवाह यांचे वडील कुंजीलाल कुशवाह हे संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मजूर म्हणून काम करायचे. आईही आपल्या मुलांना वाढवण्यासाठी मजुरीचे काम करायची.
आईचे निधन झाले आणि सर्व संसाराचा गाडा त्यांच्या वडिलांनीच चालवला. शिवकांत यांना तीन भाऊ आणि एका बहिण आहे. त्यांच्यात शिवकांत कुशवाह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. शिवकांत यांना लहानपणापासून अभ्यासाची आवड होती, पण घरची दयनीय परिस्थिती पाहता त्यांना भाजीचा गाडा चालवावा लागला. मात्र अभ्यासाची आवड आणि काहीतरी आयुष्यात मोठं करण्याचे स्वप्न शिवकांत यांना काही शांत बसु देत नव्हते. यामुळे शिवकांत कुशवाह यांनी भाजी विकतानाही अभ्यास सोडला नाही.
शिवकांत कुशवाह यांनी अमरपाटण येथील सरकारी शाळेतून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर एलएलबी केल्यानंतर रेवाच्या टीआयएस कॉलेजमध्ये म्हणजेच ठाकूर रणमत सिंग महाविद्यालयात कोर्टात प्रॅक्टिस केली. त्याचबरोबर दिवाणी न्यायाधीशपदाचीही तयारी करत होता. शिवकांत कुशवाह नऊ वेळा अपयशी ठरला तरी त्यांनी हार मानली नाही.शिवकांत कुशवाह यांना दहाव्या प्रयत्नात यश मिळाले आहे. यश थोडे लेट मिळाले पण थेट मिळाले त्यांनी मध्यप्रदेश राज्यात ओबीसी प्रवर्गात दुसरे स्थान मिळवले आहे.
शिवकांत कुशवाह यांनी सांगितले की, त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक होती. त्यांचे आई-वडील मजुरीचे काम करायचे आणि भाजी विकायचे. तो स्वतः भाजी विकत असे आणि मिळालेल्या पैशातून तो संध्याकाळी घरी रेशन आणत असे. वडील रेशन आणायचे, मग घरचा स्टोव्ह जळायचा. शिवकांत कुशवाह म्हणाले की, मी रोज रेशन घेण्यासाठी जात असे. यामुळे शिवकांत यांनी अभ्यास करून काहीतरी मोठं यश मिळवावे असं ठरवलं आणि घरची गरिबी दूर करावी, असे त्याला वाटले.
शिवकांतची आई शकुनबाई कुशवाह, ज्यांनी मजूर आणि भाजीपाला हातगाडीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. मात्र कॅन्सरमुळे 2013 मध्ये त्यांच्या आईचे निधन झाले. शिवकांतने सांगितले की, त्याच्या आईचे स्वप्न होतं की त्याने न्यायाधीश व्हावे. मात्र ती हयात असताना तो हे स्वप्न पूर्ण करू शकला नाही.
आता मात्र तो न्यायाधीश झाला असून त्याने हे यश त्याच्या आईला समर्पित केले आहे. या यशात मोठा भाऊ शिवलाल कुशवाह, बहीण लक्ष्मी कुशवाह आणि धाकटा भाऊ मनीष कुशवाह यांनीही साथ दिल्याचे त्याने सांगितलं. त्यांच्याशिवाय हे यश मिळवता आलेच नसते असे त्याने नमूद केले.
शिवकांत कुशवाह यांच्या पत्नी मधू कुशवाह या पेशाने एका खासगी शाळेत शिक्षिका आहेत. त्या सांगतात की, त्यांचे पती 24 तासांत 20 तास अभ्यास करायचे. शिवकांत अभ्यासासाठी दुसऱ्याच्या घरी जात असे. निश्चितचं शिवकांत यांनी प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेले यश कौतुकास्पद आहे.
महत्वाच्या बातम्या:
Cucumber Farming; काकडी लागवड करा आणि हमखास नफा मिळवा वाचा याविषयी सविस्तर
Published on: 01 May 2022, 03:16 IST