संपर्क आणि संवाद हि अगदी प्राचीन काळापासून मानवास मिळालेली निसर्गदत्त देणगी आहे. लिपी आणि भाषेच्या शोधाने मानवी संपर्क आणि संवाद यात क्रांती केली असली तरी सोशल मीडियाने संपर्क आणि संवाद यातील भौगोलिक सीमा आणि अंतर शून्य करून टाकले आणि वेळेचे अंतर तर सेंकदाच्या काही भागाच्या आत आणले आहे . एकंदरच या सोशल मीडिया ने मानवाच्या संपूर्ण जीवनाला व्यापून टाकले आहे. ज्या प्रमाणे गुरुत्वाकर्षण शक्ती कार्य करते अगदी तसेच दोन माणसांमध्ये संपर्क आणि संवादाचे बंधतरंग जोडण्याचे काम सोशल मीडियाने केले आहे. सोशल मीडिया हि मानवाच्या हातातील संपर्क आणि संवाद बाबत एक नवी शक्ती म्हणून उदयास येत असली तरी हि शक्ती पेलण्यास मानव तेवढा सामर्थ्यवान आहे का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ह्या शक्तीचा उदय आणि तिचा वापर आणि तिचे भवितव्य याबाबत प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आपण या प्रस्तुत लेखात करणार आहोत.
तीन लाख वर्षापूर्वी खऱ्या अर्थाने शहाण्या मानवाचा पृथ्वीतलावर वावर सुरु झाला. एका समान भूप्रदेशात राहणे, अन्न मिळवण्यासाठी भटकंती करणे आणि पुनरात्पादन करून आपला वंश वाढवणे ह्या प्रमाणे कित्येक वर्ष सर्व काही सुरळीत चालू होते. हळू हळू हा मानव मिळणाऱ्या माहितीचे आकलन, विश्लेषण आणि विचारमंथन करू लागला तसा तो उत्क्रांतीच्या प्रक्रियेत समाविष्ट झाला. अशी उत्क्रांती हि फक्त शारीरिक नाही तर मानसिक स्तरावर सुद्धा सुरु झाली होती. त्यामुळे राहत असलेल्या भूप्रदेशातील तेथील वातावरणा सोबत त्याला जुळवून घ्यावे लागत होते, तसे त्याचे शरीर अनुरूप आणि अनुषंगिक बदल घडून आणत होते.
मात्र हे बदल अत्यंत सूक्ष्म सुरूपाचे आणि अत्यंत मंद गतीने होत होते. याउलट मानसिक बदल मात्र जरा गतीने पुढे जात होते आणि त्यामुळे इतर प्राण्यांपेक्षा जास्त गतीने मानव उत्क्रांतीच्या प्रक्रियेत पुढे जात होता. हि उत्क्रांतीची गती आगीच्या शोधाने सुरु झाली, चाकाच्या शोधाने वाढली,शेतीचे शोधाने अधिक वाढली, लिपी आणि भाषेच्या शोधाने तर खरी गती पकडली आणि छपाई ,संदेशवहन, रेडीओ , इंटरनेट आणि मोबाईलने तर जग अगदी जवळ आले आहे. सोशल मीडियाने माणस जवळ आणली आणि माणसा- माणसातील संपर्क आणि संवादाचे भौगोलिक अंतर शून्य झाले.
सोप्या भाषेत उत्क्रांती म्हणजे बदल होणे आणि तो बदल अंगवळणी पडणे होय तर क्रांती म्हणजे अचानक होणारे बदल होय. उत्क्रांतीचे बदल हे खूप हळुवार आणि संथ स्वरूपाचे असतात तर क्रांती हे काही वर्षात आणि अचानक होत असते. उत्क्रांती असो किंवा क्रांती, जेंव्हा बदल होतात आणि ते बदल जर अंगवळणी पडले नाहीत तर त्याचे शारीरिक आणि मानसिक आघात होतात. जसे माणूस बैठे काम करायला लागला आणि त्याला पाठीचे आणि मानेचे आजार सुरु झाले.
माणसाचे वजन वाढले तसे त्याला मधुमेह आणि उच्य रक्तदाब सुरू झाले. साहजिकच सोशल मीडिया हि मानवी उत्क्रांतीचा भाग आहे कि, क्रांती आहे हा संशोधनाचा विषय असला तरी, सोशल मीडिया मुळे झालेले अमुलाग्र बदल हे शारीरिक आणि मानसिक अंगवळणी पडायला कित्येक वर्षाचा कालावधी जाणे आवश्यक असतानी तसे झाले नाही आणि आपण अचानक या सोशल मीडिया वर स्वार झालो आहोत, सहाजिकच त्याचे अनेक चांगले आणि वाईट परिणाम समोर येण्यास सुरुवात झाली आहे.
उपरोक्त नमूद बदल, कि जे शारीरिक आणि मानसिक अंगवळणी पडत नाहीत , निश्चितच ते शारीरिक आणि मानसिक व्याधी निर्माण करतात. सोशल मीडिया ने माणसाच्या शारीरिक तक्रारी वाढवल्या आहेत याबाबत कोणाचेही दुमत नसावे. डोळ्यावर येणारा ताण, मानेच्या मणक्यावर येणारा ताण, चेहऱ्याच्या त्वचेवर मोबाईल च्या प्रकाशामुळे होणारा परिणाम या तक्रारी जानिवपुर्वक नमूद कराव्या लागतील. मानसिक तक्रारी मध्ये विचार प्रक्रिया कमी होणे, येणारे संदेश मुळे कायम विचलित होणे , विचारप्रक्रिया कायम क्लिष्ट राहने , दु:ख आणि निराशा निर्माण होणे, भीती वाटणे आणि चिडचिड होणे या समस्या मोबाईलने आणि एकंदर सोशल मीडिया ने वाढीस घातलेल्या आहेत याबद्दल कोणाचेही दुमत नसावे. एकंदर कळतंय पण वळत नाही अशी सर्वांची परिस्थिती आहे.
सोशल मीडिया तसा शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अंगवळणी पडलेला नसला तरी उपलब्ध होत असलेली माहिती आणि साधला जाणारा संपर्क आणि संवाद याचे आकर्षण जास्त असल्याने माणूस त्याकडे गुरुत्वाकर्षण शक्ती सारखा ओढला जात आहे. हि शक्ती त्याला स्वस्थ बसू देत नाही आणि विचारही करू देत नाही. त्या मुळे माहिती ,डेटा,भाषा,लिपी, व्हिडीओ, ऑडीया आणि फोटो याच्या माध्यमातून नुसता माहितीचा भडीमार सर्वांवर होत आहे. एवढी माहिती कशी साठवायची हे मेंदू समोर आव्हान असल्याने त्याने माहिती लगेच कचऱ्याची पेटी म्हणजे डष्टबिन मध्ये टाकण्यास सुरुवात केली आहे. माहिती एवढी आहे कि तिचे आकलन आणि विश्लेषण करणे यातच मेंदूचा बराच वेळ आणि उर्जा खर्च होत असल्याने मेंदने आकलन आणि विश्लेषण करणे काही प्रमाणात थांबवले आहे. जे आहे तसे स्वीकारण्याच्या दृष्टीने मेंदूची वाटचाल सुरु आहे हे निश्चितच शहाण्या माणसासाठी हितावह नाही. साहजिकच मानवाची आकलन शक्ती आणि विश्लेषण शक्ती वर सोशल मीडिया चे दूरगामी परिणाम होणार आहेत. साहजिकच मेंदू आणि मनाची जोडणी या मुळे विस्कळीत झाली आहे. मन काय मेंदूला काय सांगतय आणि मेंदू मनाला काय सांगतय याचा गोंधळ तयार झाल्याने मनातून निर्माण पडणाऱ्या भावना मध्येही विस्कळीतपणा आणि रुक्षपणा आला आहे. त्यामुळे आनंद , दुख, राग ,भीती, तिरस्कार, आश्चर्य, प्रेम, माया यामध्ये कमालीची उलाथापालात झाली आहे. पूर्वी आपण या भावना प्रसंगनुरूप व्यक्त करायचो आता त्या पूर्ण विस्कळीत झाल्या आहेत. त्यामुळे भावना आणि विचार याचा ताळमेळ जुळेनाशी झाले आहे. .
प्रत्येक व्यक्ती या सोशल मीडिया वर अवलंबित झाला आहे. जग कायम बदलत असते आणि विज्ञान तंत्रज्ञान या बदलला गती देत असते. आपल्याला तसा पहिला तर तीन लाख वर्षाचा इतिहास आहे. जसे बदल होत गेले तसे आपण त्या बदलला समरस होत गेलो. परंतु आताच्या बदलला आपले मानसिक आणि शारीरिक समरसता आलेली आहे कि नाही या बाबत मोठे प्रश्नचिन्ह संशोधक यांच्यापुढे आहे. त्यापैकी सोशल मीडियाचा मोठा वापर आणि त्याला आवश्यक असलेले मानसिक आणि शारीरिक बदल होत आहेत का हे सुद्धा पाहणे आवश्यक ठरणार आहे.
मोबाईल आणि त्याच्या विद्युत चुंबकीय लहरी यांनी संपूर्ण जग व्यापले आहे. मोबाईल क्रांती तर झालीच परंतु त्या सोबत सोशल मीडिया क्रांती झाली. सोशल मीडिया ने जागतिक पातळीवर अनेक महासत्ताना धक्के दिले आणि सोशल मीडिया ने कौटुंबिक पातळीवर तर कहरच केला आहे. वैयक्तिक आणि अंतर वैयक्तिक नातेसंबंध पेक्षाही आभासी नातेसंबंध आणि जग याच्याशी आपण सर्व जोडले गेलो आहोत. आभासी नातेसंबंध मध्ये संपर्क आणि संवादाची जोडणी जलद गतीने होत असली तरी ते संबंध जिव्हाळा निर्माण करू शकत नाहीत. जिव्हाळा निर्माण करण्यासाठी डोळे आणि स्पर्श आणि प्रत्यक्ष भावनिक आणि मानसिक आधार महत्वाची भूमिका बजावत असतात. आभासी नातेसंबंध मध्ये याचा अभाव दिसून येतात. सोशल मीडियाने संपर्क आणि संवाद यात जरी गती आणली असली तरी त्यातून निर्माण होणारे फायदे पेक्षाही तोटे गंभीर स्वरूपाचे आहेत. व्यावसायिक पातळीवर आणि प्रशासकीय पातळीवर नक्कीच सोशल मेडिया चे फायदे दृष्टीक्षेपास पडत असले तरी एकंदर वैयक्तिक पातळीवर मात्र अभासी संवाद पलीकडे सोशल मीडिया काम करू शकलेला नाही. तसेच मानवाची कार्यप्रवणता आणि कार्यक्षमता कमी होण्यास सुद्धा हातभार सोशल मीडिया ने लावला आहे. सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्णता आपण हरवून बसू कि काय अशीही भीती निर्माण झाली आहे.
सोशल मीडिया जरी आकर्षक स्वरूपाचे असले तरी दीर्घ काळाच्या मानवी विकासासाठी ते उपयोगी ठरत नाही. आपल्याकडे असणारा वेळ कि जो बहुमूल्य आहे, तो आभासी जगात आणि फक्त माहिती ऐकण्यात , पाहण्यात आणि वाचण्यात घालवल्या मुळे इतर काही निर्मानधिन होण्यास कोणाकडेही वेळे शिल्लक राहत नाही . असेही काही सद्गृहस्थ आहेत कि चौवीस तासातील दहा तासापेक्षाही जास्त वेळ मोबाईल आणि सोशल मीडिया वर खर्ची करत आहेत. एकंदर मानवी भांडवलाची शक्ती क्षीण आणि कमी झालेली पहावयास मिळत आहे. त्यामुळे व्यावसायिक ,सामाजिक क्षेत्रात आणि कौटुंबिक पातळीवर याच्या समस्या जास्त प्रमाणात पहावयात मिळत आहे . यापुढेही जावून काही संघटीत सायबर गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्यांचे पेव फुटले असून त्यामुळे अनेकांची वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे.
माणूस असा प्राणी आहे कि तो नेहमी टाकावू कडून टिकावू शोधत असतो साहजिकच सोशल मिडीयाने जरी जग व्यापलेले असले तरी पुढील काळात याबाबत खूप बदल अपेक्षित आहेत. तसेच या सोशल मीडियाचा वापर आवश्यक तेवढाच, कार्यक्षमतेने आणि परिणामकारक होणे आवश्यक आहे आणि तीच काळाची गरज आहे. अन्यथा मानव प्राणी या सोशल मीडिया पासून दूर पळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणतीही गोष्ट अशी नाही की ती मानवाला हरवू शकते, त्याचे हरण करू शकते, कारण एकाच वेळी मानव प्रजात समोर अनेक पर्याय ठेवत असते आणि योग्य वेळी योग्य पर्यायची निवड करण्यात ती वाकबगार आहे. सोशल मीडिया किती काळ माणसाला काबूत ठेवेल याबाबत जरी आता काही सांगता येत नसले तरी सोशल मीडिया चे अजून बरेच चांगले वाईट परिणाम समोर यायचे आहेत. साहजिकच भूतलावर सध्या अस्तित्वात असलेल्या चार पिढ्यांनी सोशल मीडियाचा वापर समयसूचकतेणे ,मर्यादित स्वरूपात, आवश्यकते पुरताच, कार्यक्षमतेने, परिणामकारकपणे आणि मानवी जीवन अधिक साधे, सोपे , सरळक, सुटसुटीत आणि सुखकर करण्यासाठी करणे आवश्यक आणि अनिवार्य आहे. मानवी जीवन अनमोल आहे,ते अधिक सुंदर बनवूया!
राजीव नंदकर उपजिल्हाधिकारी
९९७०२४६४१७
Published on: 07 December 2021, 08:12 IST