टाटा ग्रुपचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी मुंबईतील पेडर रोड परिसरात जसलोक हॉस्पिटलजवळ एक आलिशान फ्लॅट विकत घेतला आहे. एका लग्झरी टॉवरमध्ये असलेल्या या फ्लॅटची किंमत तब्बल 98 कोटी रुपये आहे. माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईमधील जसलोक हॉस्पिटलजवळ ही 28 मजली इमारत आहे. गेल्या पाच वर्षांपासून चंद्रशेखरन आणि त्यांचे कुटुंब या इमारतीत भाड्याने राहत होते.
या डीलशी संबंधित एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, हा फ्लॅट एकूण सहा हजार स्क्वेअर फूट एवढा मोठा आहे. इमारतीच्या 11 व्या आणि 12 व्या मजल्यावर हा ड्युप्लेक्स फ्लॅट आहे. या जागेचं भाडं 20 लाख रुपये प्रतिमहिना होतं. 2017 साली चंद्रशेखरन टाटा समूहाचे चेअरमन झाले. त्यानंतर ते आपल्या कुटुंबासह या ठिकाणी भाड्याने राहत होते. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत दिलेल्या वृत्तानुसार, तीन दिवसांपूर्वी एन. चंद्रशेखर, त्यांच्या पत्नी ललिता आणि मुलगा प्रणव यांच्या नावे हा करार झाला.
1.6 लाख रुपये प्रतिस्क्वेअर फूट या दराने त्यांनी हा ड्युप्लेक्स विकत घेतला. देशातील सर्वाधिक वेतन मिळवणाऱ्या सीईओंपैकी चंद्रशेखरन हे एक आहेत. 2021 या आर्थिक वर्षात त्यांची एकूण कमाई 91 कोटी रुपये होती. नुकतंच त्यांना टाटा ग्रुपच्या चेअरमनपदी पुन्हा नियुक्त करण्यात आलं आहे. पुढील पाच वर्षे ते या पदावर कायम राहतील. टाटा कंपनीने मात्र त्यांच्या फ्लॅट खरेदीबाबत कोणतेही स्टेटमेंट दिलेलं नाही.
समीर भोजवानी यांच्या जीवेश डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने हा फ्लॅट विकला आहे. समीर भोजवानी आणि विनोद मित्तल या बिल्डर्सनी 2008 साली ही इमारत उभारली होती. मुंबईत अशा प्रकारचे मोठे करार अगदी कमी प्रमाणात पहायला मिळतात. त्यामुळे रिअल इस्टेट मार्केटमध्ये या डीलची चर्चा सुरू आहे.
लग्झरी रेसिडेन्शिअल मार्केटच्या एका तज्ज्ञाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील एकूण लग्झरी अपार्टमेंट विकले जाण्यास तब्बल 15 वर्षांचा कालावधी लागू शकतो. कारण दरवर्षी साधारणपणे अशा प्रकारचे 25 अपार्टमेंट विकले जातात. अशा प्रकारचे अपार्टमेंट विकत घेण्यासाठी खूप कमी लोक पुढे येतात. नाईट फ्रँक इंडियाने दिलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2022 पासून आतापर्यंत मुंबईमध्ये अशा प्रकारचे केवळ 13 हाय व्हॅल्यू करार झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
Health News : रात्री हे पदार्थ चुकूनही खाऊ नका; नाहीतर आरोग्य येणार धोक्यात
Published on: 07 May 2022, 01:37 IST