Others News

फायदेशीर शेती व्यवसायासाठी पारंपरिक पीक पद्धतीत गरजेनुसार बदल आवश्यक :- कुलगुरू डॉ. विलास भाले

Updated on 15 June, 2022 5:13 PM IST

फायदेशीर शेती व्यवसायासाठी पारंपरिक पीक पद्धतीत गरजेनुसार बदल आवश्यक :- कुलगुरू डॉ. विलास भाले डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीची ७१ वी सभा संपन्न प्रचंड लोकसंख्याक आपल्या देशात आजही धान्याची कोठारे भरलेली असून देशांतर्गत कृषी विद्यापीठांनी शेती क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडविणारे तंत्रज्ञान विकसित केल्याचे हे द्योतक असल्याचे व त्याला शेतकरी बांधवानी आत्मसात केल्याचे प्रशंसनीय प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधान परिषद सदस्य तथा विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य मा. अमोल मिटकरी यांनी आज केले. डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे विभागीय कृषि संशोधन व विस्तार सल्लागार समितीची पश्चिम विदर्भाकरीता ७१ व्या सभेप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित शास्त्रज्ञ आणि कृषी अधिकारी वर्गाला ते संबोधन करतांना ते बोलत होते. निसर्गाने विदर्भाला जमीन आणि पाण्याच्या बाबतीत भरभरून दिले असून खारपानपट्टा अधिक उत्पादनशील बनविण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, राज्य शासनाचा कृषी विभाग, प्रयोगशील -प्रगतीशील शेतकरी आणि गरजेनुसार शासकीय यंत्रणांचा एकात्मिक पद्धतीने समन्वय साधत शाश्वत शेती विकास दृष्टिक्षेपात येईल असा आशावाद देखील आमदार मिटकरी यांनी आपल्या अभ्यासपूर्ण

संबोधनात व्यक्त केला व राज्य तथा केंद्र शासनाकडून अपेक्षित आर्थिक सहकार्य मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे उपस्थितांना अवगत केले. तर पारंपरिक शेती पद्धतीमध्ये आंतरपिकांचा समावेश आणि शेतीपूरक व्यवसायाची सक्षम जोड निश्चितच फायदेशीर ठरत असून व्यावसायिक शेतीची संकल्पना अवलंबतांना एकात्मिक शेती पद्धती कालसुसंगत असून शाश्वत शेतीसाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकांची निवड, पिकांची फेरपालट, उपलब्ध संसाधनावर आधारित शेती पूरक व्यवसायाची सक्षम जोड आणि परिवारातील सदस्यांचे योगदान काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले. आमदार मिटकरी यांनी उपस्थित केलेल्या खारपानपट्टा विकास आणि एकंदरीत ग्रामविकासाची संकल्पना अधिक विस्तारत डॉ. भाले यांनी उपस्थित कृषि अधिकारी आणि विद्यापीठ अधिकारी यांचे नियोजनबद्ध कृतीतून गाव खेडे आर्थिक सक्षम बनतील असा विश्वास व्यक्त केला व केंद्र तथा राज्य शासनाचे सहयोगाबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त करतांना मा. मुख्यमंत्री महोदयांना अपेक्षित विकेल ते पिकेल संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान विद्यापीठात उपलब्ध असून शेतकरी बांधवानी याचा फायदा घ्यावा असेही आवाहन डॉ. भाले यांनी या निमित्ताने शेतकरी बांधवाना केले. कपाशी व सोयाबीन पिकासोबत योग्य आंतरपीकाची लागवड करून पावसाच्या लहरीपण मुळे होणारे नुकसान टाळता येणे शक्य असल्याचे सांगत

सोयाबीन पिकाची लागवड पट्टा पद्धतीने करणे तसेच कापूस पिकामध्ये तूर सोयाबीन उडीद मूग यासारख्या आंतरपीकांची लागवड करणे कालसुसंगत ठरत असून गुलाबी बोंड आळी, तूर मूग आदी पिकांमधील विषाणूजन्य रोगांचे प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक प्रयत्नांची गरज देखील डॉ. भाले यांनी आपल्या मार्गदर्शनात व्यक्त केली.या अतिशय महत्त्वाकांक्षी सभेचे प्रसंगी अमरावती विभागीय कृषी सहसंचालक श्री किसन मुळे, विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे यांचेसह संचालक विस्तार शिक्षण डॉ. राजेंद्र गाडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती तर विद्यापीठाचे अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. प्रकाश नागरे, सहयोगी अधिष्‍ठाता पदव्युत्तर शिक्षण संस्था, डॉ.धनराज उंदीरवाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री कांताप्पा खोत (अकोला), श्री शंकर तोटावार (वाशिम), श्री.अनिल खर्चान (अमरावती), श्री. नरेंद्र नाईक (बुलडाणा) विद्यापीठांतर्गत सर्व वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, विभागप्रमुख, पश्‍चिम विदर्भातील सर्वच जिल्ह्यांचे तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी आदींची सभागृहात उपस्थिती होती.सदर सभेची प्रस्तावना विद्यापीठाचे संशोधन संचालक, डॉ. व्ही. के. खर्चे यांनी केली. त्यांनी येणाऱ्या खरीप हंगामासाठी विद्यापीठाचे वाण व सुधारीत तंत्रज्ञान वापरण्यासाठी सर्व जिल्हा कृषि अधिकारी यांना निवेदन केले आणि सभेच्या उद्देशाविषयी विस्तृत विवेचन केले. 

त्यानंतर कृ‍षि विभागाचे अमरावती विभागाचे कृषि सहसंचालक श्री. किशनराव मुळे यांनी कृषि विभागाचा खरिप २०२२ हंगामाच्या नियोजनाबद्दल माहिती दिली.या सभेमध्ये पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, वाशिम व बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तसेच विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे सादरीकरण झाले.या सभेप्रसंगी संयुक्त कृषि संशोधन व विकास समिती २०२१ मध्ये मान्यता प्राप्त पिक वाण व संशोधन शिफारशीच्या व घडीपत्रिकेचे विमोचन करण्यात आले.या सभेचे सुत्र संचालन डॉ. के. टी. लहरीया, सहाय्यक संशोधन संचालक यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. जे. पी. देशमुख, कृषि विद्यावेत्ता, डॉ. पंदेकृवि, अकोला यांनी केले. तर सभेचे संकलन डॉ. एम. वाय. लाडोळे व डॉ. जे. पी. देशमुख यांनी केले.सभेच्या आयोजनासाठी संशोधन संचालक, डॉ. पंदेकृवि,अकोला येथील डॉ. डी.टी. देशमुख, डॉ. अजय सदावर्ते, डॉ. पंकज भोपळे, डॉ. कैलास लहरिया,डॉ.दिनेश फड, श्री. प्रशांत पौळकर, श्री. माधुरी सदाफळे आणि श्री. रवि रावळे तसेच संशोधन संचालनालयातील सर्व कर्मचारी वृंद यांनी डॉ. व्ही. के. खर्चे, संशोधन संचालक, डॉ. पंदेकृवि, अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली अथक परिश्रम घेतले.

English Summary: Sustainable agricultural development is possible only through the joint efforts of Agriculture University, Department of Agriculture, Farmers and Government - MLA Amol Mitkari
Published on: 15 June 2022, 05:13 IST