Others News

आजची शेतीची अवस्था पूर्वीसारखी संपन्नशील राहिली नाही, अगदी आजोबा पणजोबांच्या काळात 'उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी' असं म्हटल जायचं आता हे चित्र बदलतंय शेतीची जागा नोकरीने घेतली आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रातील शेतीला विविध समस्यांना तोंड द्यावे लागते आहे त्यात शेतजमिनीचे विभाजणीकरण, लहरी हवामान, वारंवार पडणारा दुष्काळ, सिंचन सुविधांचा अभाव, भारनियमन, हमीभाव, बाजार समितीतील पिळवणूक तसेच वाहतूक व साठवणूक यासाठीच्या पायाभूत सुविधा, उत्पादन-विपणन-वितरण पुरवठा साखळीतील दोष, अपुरा कर्जपुरवठा इत्यादींचा समावेश आहे. यासाठी शासकीय तसेच सामाजिक स्तरावर शेतकरी बांधवांना सर्वोतोपरी सहाय्य करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

Updated on 29 February, 2020 5:05 PM IST

महिला शेतकरी पुरुषांच्या तुलनेत दुर्लक्षित दिसतात, ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचे शेती क्षेत्रातील योगदान आणि शेती आणि कुटुंबाच्या व्यवस्थापनेतील नवदुर्गा हिचा सन्मान तथा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.

शहरीकरणाच्या दुनियेत ग्रामीण पुरुष नोकरीच्या शोधात व चकाचक जीवनशैलीकडे आकृष्ट होऊन सिमेंटच्या जंगलाकडे धावू लागला आहे. घरची शेती आणि कुटुंब याची मदार घरातील महिलेवर येताना दिसते आहे आणि त्या संघर्ष करताना दिसत आहेत. सामाजिक धारणा ही सदैव पुरुषसत्ताक दृष्टीने प्रवाहित होत असते. महिलांना शेतजमिनीचा मालकी हक्क देऊन त्यांना कृषी क्षेत्रात अग्रक्रमी आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत आणि त्यांनाही कृषी विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायला हवं. याच कारणाने जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर 'सशक्त महिला, सशक्त भारत' हे उद्दिष्ट समोर ठेवून कृषी क्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग मला अधोरेखित करावासा वाटतो. त्यांचे प्रश्न काहीसे भिन्न असून त्यांना हाताळणारी सक्षम शासकीय व सामाजिक संरचना ही काळाची गरज आहे.

ग्रामीण महिला आपले कुटुंब चालविताना फार सचोटीने, काटकसरीने चालवितात. समर्पण, त्याग आणि अखंड कष्ट करण्याची तयारी हे गुण त्यांना ऊर्जावाण बनवितात. ह्या ऊर्जेची दखल समाजाने घ्यायला हवी. पुरुषप्रधान संस्कृतीला फाटा देत कृषी क्षेत्रातील महिला मागे राहता कामा नयेत. त्यांना शेतीशी निगडीत पूरक व्यवसाय त्यात शेळीपालन, परसातील कुक्कुटपालन, परसबाग, रेशीमशेती, मधुमक्षिकापालन, कृषी प्रक्रिया लघु उद्योग इत्यादी व्यवसायांसाठी तंत्रशुद्ध मार्गदर्शन करणे जरुरीचे आहे. पारंपारिक शेतीला या शेतीपूरक उद्योगांची जोड दिली तर शेतकरी महिला नक्कीच पुढे जातील त्याच बरोबर त्यांच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष द्यायला हवे आहे.

आज जिजाऊ, अहिल्या, सावित्री, रमाईच्या लेकी विविध क्षेत्रात आपल्या अपार कष्टाच्या, कर्तबगारीच्या जोरावर यशाची शिखरे पार करताना दिसता आहेत. कला, साहित्य, क्रीडा, शासन-प्रशासन इत्यादी स्तरावर महिला सक्षमीकरणाची अनेक उदाहरणे समोर येताना दिसता आहेत, त्यात कृषी क्षेत्राचा टक्का कमी आहे. हा वाढवा व यातही यशोगाथा निर्माण व्हाव्यात यासाठी ग्रामीण महिला सक्षमीकरणाकडे विशेष लक्ष द्यायला हवे. मला ह्या सर्व क्षेत्रातील यशस्वी व नवनिर्माणासाठी मार्गक्रमण करणाऱ्या महिलांचा व एकूणच नारीशक्तीचा सार्थ अभिमान वाटतो.

महिला सक्षमीकरणाची ही पहाट स्त्री समतेच्या वाटेवरील विविध आव्हानांशी समर्थपणे लढा देण्यासाठी नजीकच्या काळात एक बलशाली समाज निर्माण व्हावा म्हणून आपण सर्वांनी सदैव तत्पर असणे आवश्यक आहे. 'Each for Equal' या संकल्पनेवर आधारित सन २०२० चा जागतिक महिला दिन स्त्री समतेसाठी प्रत्येकाच्या समर्थनाची अपेक्षा व्यक्त करतो. समताधिष्टीत समाजाच्या निर्मितीमध्ये समाजातील वंचित असणाऱ्या महिलांसाठी आपण प्रयत्नशील राहुयात.
जागतिक महिला दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा....

लेखक:
सुचिता बाळासाहेब जगताप

(सहायक कक्ष अधिकारी, नगर विकास विभाग, मंत्रालय, महाराष्ट्र शासन, State Tax Inspector)

English Summary: Strong women strong India
Published on: 29 February 2020, 05:01 IST