काल सकाळी संपूर्ण जगाला हादरवणारी घटना घडली, ती घटना म्हणजे रशियाने युक्रेनवर हल्ला केला. रशियाने युक्रेनवर हल्ला चढविला आणि युक्रेनने भारताकडे मध्यस्थी घडवून आणत युद्धाला विराम लावावा अशी आर्त हाक घातली. युक्रेनच्या राजदूताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशिया आणि युक्रेनमध्ये होत असलेल्या युद्धात हस्तक्षेप करण्याची आणि युद्धाला पूर्णविराम लावण्याची विनंती केली आहे. युक्रेनचे राजदूत इगोर पोलिखा यांनी भारताकडे यासंदर्भात विनवणी केली. इगोर पोलिखा म्हणाले की, भारत आणि रशियामध्ये चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत, त्यामुळे ग्लोबल लीडर पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा करून या महाभयंकर युद्धाचा शेवट करावा.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, भारताचे रशियाशी अनेक दशकांपासून खुप घनिष्ठ संबंध आहेत. त्याचबरोबर युक्रेनशीही चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. म्हणूनच हे दोन्ही देश भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि जवळचे आहेत. पण आर्थिक दृष्टीकोनातून बघितलं तर हे दोन्ही देश भारतासाठी विशेष महत्त्व ठेवत नाहीत कारण की, सध्या भारताचा या दोन्ही देशांशी फारसा व्यापार नाही.
रशिया आणि युक्रेनशी भारताचा व्यापार
मित्रांनो रशिया आणि युक्रेनसोबत भारताचा जास्त व्यापार होत नाही. रशिया हा आपला सुखदुःखाचा सोबती आहे मात्र या सवंगडी देशासोबत भारताचा व्यापार खुपच नगण्य आहे. भारताच्या एकूण निर्यातीत रशियाचा वाटा केवळ 0.8 टक्के आहे. याशिवाय आयातीत देखील रशियाचा वाटा केवळ 1.5 टक्के आहे. याचाच अर्थ सध्या भारत रशियाकडून विशेष असे आयात-निर्यात करत नाही, त्यामुळे या युद्धात भारताचे फारसे नुकसान होणार नाही, म्हणुनच आपल्याला फारशी काळजी करण्याची गरज नाही. आता आपण हे गणित पैशात समजून घेऊया, 2020-21 या आर्थिक वर्षात भारताने रशियाला 2.6 अब्ज डॉलरची निर्यात केली होती, तर 5.5 अब्ज डॉलरची आयात केली होती. भारत जास्त करून औषधे आणि इलेक्ट्रिकल मशिनरी रशियाला निर्यात करत असतो, रशिया भारताकडून चहा आणि कपडे देखील खरेदी करतो. याव्यतिरिक्त रशियाला भारत कुठल्याच वस्तू निर्यात करीत नाही.
भारताच्या एकूण आयातीत रशियाचा वाटा खूपच नगण्य आहे हाती आलेल्या आकडेवारीनुसार, भारताच्या एकूण आयातपैकी केवळ 1.5 टक्के आयात रशियाकडून केली जाते. यामध्ये सर्वाधिक पेट्रोलियम उत्पादने भारत खरेदी करतो. रशियासोबत असलेल्या एकूण आयातीपैकी 50 टक्क्यांहून अधिक पेट्रोलियम उत्पादनांची आयात बघायला मिळते. 2020-21 या आर्थिक वर्षात भारताने 5.5 अब्ज डॉलरची रशियाकडून आयात केली होती, यापैकी 3.7 अब्ज डॉलर फक्त पेट्रोलियम संबंधित उत्पादने होती. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की आपला देश, भारत 150 अब्ज डॉलरची पेट्रोलियम उत्पादने आयात करतो अर्थात खरेदी करतो. यावरून रशियाकडून खुपच नगण्य आयात केली जाते हे समजते. म्हणजेच भारत कच्च्या तेलाची आयात रशियाकडून अधिक करत असतो. कच्च्या तेलाचा अपवाद वगळता फारसा व्यवसाय रशियासोबत सातत्याने होत नाही. मात्र असे असले तरी भारत बहुतेक शस्त्रास्त्रे रशियाकडून खरेदी करत असतो आपल्याकडे या घडीला असलेल्या अनेक शस्त्रास्त्रांपैकी बहुतेक शस्त्रास्त्रे रशियाकडून मागवली आहेत.
रशियासारखेचं भारताचा युक्रेनसोबत देखील फारसा व्यापार चालत नाही. भारत हा जास्त करून युक्रेनमधून सूर्यफूल तेल आयात करत आला आहे. गेल्या वर्षी, भारताच्या एकूण सूर्यफूल तेलाच्या आयातीपैकी 74 टक्के युक्रेनचा वाटा होता. 2019-20 मध्ये भारत-युक्रेनमध्ये 2.52 बिलियन डॉलरचा व्यापार झाला. तसेच भारत युक्रेनला लोह, पोलाद, प्लास्टिक आणि सेंद्रिय रसायनांची निर्यात करत असतो. असे असले तरी, रशिया आणि युक्रेन हे दोन्ही तांबे आणि निकेलचे प्रमुख पुरवठादार आहेत आणि त्यामुळे सध्याची परिस्थिती बघता या दोन्ही धातूच्या जागतिक पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. एकंदरीत व्यापाराच्या बाबतीत भारताला फार विशेष अशी काळजी करण्यासारखे काही कारण नाही. मात्र यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढतील एवढे अपवाद वगळता या युद्धाचा भारतावर फारसा काही परिणाम होणार नाही.
Published on: 25 February 2022, 01:13 IST