Others News

राज्यात वीजेचे देयक न भरल्याने पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा बंद आहे.

Updated on 15 July, 2022 12:29 PM IST

राज्यात वीजेचे देयक न भरल्याने पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा बंद आहे. हा वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करण्यात यावा, यासाठी जुनी थकबाकी टप्प्याटप्प्याने शासनामार्फत भरण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणेनुसार राज्यात 2018 मध्ये प्रारंभ करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.या बैठकीला आमदार चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज कुमार सौनिक, अपर मुख्य सचिव नियोजन नितिन गद्रे, नगर विकास-2 विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती सोनिया सेठी, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले. ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव तथा महापारेषणचे अध्यक्ष दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, महानिर्मितीचे अध्यक्ष तथा

व्यवस्थापकिय संचालक संजय खंदारे, मेडाचे महासंचालक रवींद्र जगताप, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.शेतकऱ्यांचा थकित कृषिपंपाचा मार्च 2022 पर्यंतचा अनुशेष दूर करण्यात यावा आणि कृषिपंपाचा अनुशेष दूर करताना सौरऊर्जेला प्राधान्य देत, मार्च 2022 पर्यंतचे संपूर्ण उद्दिष्ट पुढच्या सहा महिन्यात पूर्ण करावेत, यासाठी केंद्र सरकारची ‘कुसुम’ योजना आणि शासनाची योजना अशा दोन्ही योजनांचा वापर करीत अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत विकेंद्रित सौर निर्मितीतून 4500 मेगावॅट ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट या योजनेत आहे. अशा प्रकल्पांसाठी तातडीने जागा उपलब्ध करून देण्यात याव्यात आणि गतीने ही योजना कार्यान्वित करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.याशिवाय उपसा सिंचन योजनासुद्धा सौर उर्जेवर आणण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, तसेच किमान 30 टक्के फिडर यावर्षी सौर उर्जेवर जातील, या दृष्टीने तात्काळ नियोजन करण्यात यावे आणि त्यादृष्टीने पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. खासगीसोबतच महावितरणनेसुद्धा स्वनिर्मितीचे जिल्हानिहाय उद्दिष्ट निश्चित करावे, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

English Summary: Review of Chief Minister's Solar Agriculture Channel Scheme
Published on: 15 July 2022, 12:29 IST