Others News

सर्व मोठ्या गावांचे शहरीकरण झाले, शहरांचे काँक्रिटीकरण झाले.

Updated on 11 July, 2022 7:19 PM IST

सर्व मोठ्या गावांचे शहरीकरण झाले, शहरांचे काँक्रिटीकरण झाले. काँक्रिटच्या जंगलाला डांबराच्या रस्त्यांची जोड मिळाली मग या साऱ्या शहरावर पडणारे पाणी जमिनीत मुरणार कसे?ते झपाट्याने वाहून जाणार. गटारांतून नालीमध्ये,नालीतून नदीकडे वाहणार. पुन्हा या शहरी वस्तीला पाणी पुरवायचे कुठून? नळाद्वारे पुरवायला पाणी आणायचे कुठून? यासारख्या गंभीर प्रश्नांची उत्तरे शोधताना जगातील अनेक ठिकाणी रेनवॉटर हार्वेस्टिंगची कल्पना प्राधान्याने मांडली गेली जेथे पाऊस जास्त पडतो, तो कालावधी अल्प असतो. पडलेला पाऊस स्वतःबरोबर बहुमोल मातीचा थर घेऊन जातो. ती माती गाळा रूपाने नदीतून वाहत धरणांच्या भिंतीजवळ साचते व धरणे हळूहळू निकामी होतात. तसेच डोंगरावरची माती वाहून गेल्याने डोंगर बोडके,

खडकाळ होतात व पावसाचे प्रमाण कमी होऊ लागते. हा झाला उघड्या जमिनीसंदर्भातला प्रश्न. दुसरा प्रश्न काँक्रिटच्या जंगलातला वर उल्लेखलेला. दोन्ही प्रश्नांना उत्तर एकच. ते म्हणजे जमेल तसे जमेल तितके पाणी आडवा, जमवा व जिरवा. पाणी अडवायचे उपाय शहरात सोपे. छपरावरचे, गच्चीवरचे, पावसाचे पाणी पन्हाळीद्वारे एकत्रित करून इमारतीच्या शेजारी वा पोटात बांधलेल्या टाकीत साठवायचे. पावसाळा संपल्यावर त्याचाच वापर पिण्याखेरीज लागणाऱ्या अन्य वापरासाठी करायचा, आसाम, मेघालय, नागालँड या उतारावरच्या टेकड्यांच्या प्रदेशात ही पद्धत गेली अनेक वर्षे घराघरांतून वापरली गेली आहे. टाकी पाण्याने भरली, तर जास्तीचे पाणी जवळच खणलेल्या एका खड्डावजा कुपनलिकेत सोडायचे. ८ ते १० सेंटीमीटर व्यासाचा २-३ मीटर खोलीचा खड्डाही या कामी उपयोगी पडतो, भूजलपातळी वाढण्यासाठी त्याचा जरूर उपयोग होतो.

पाणी अडवा, पाणी जिरवा या एका वाक्यात अन्य ठिकाणच्या रेनवॉटर हार्वेस्टिंगचा सारा अर्थ सामावतो. उतारावर, डोंगरावर समतल बांधांची रचना यासाठी केली जाते, कंटूरबंडिंग या नावाने ती ओळखली जाते.पावसाचे पाणी या विविध बांधांना अडते, जिरते,माती वाहून नेणे थांबते, याशिवाय मोठ्या पावसात वाहणारे पाणी पाझर तलाव बांधून अडवले जाते.पावसाळा ऑक्टोबरमध्ये संपला की, त्यानंतर शेती, जनावरे, पक्षी यांना या पाण्याचा अगदी मार्चपर्यंतही उपयोग होतो. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाझर तलावाचे पाणी जमिनीत मुरल्याने त्या परिसरातल्या व खालच्या भागातल्या विहिरींची भूजलपातळी उंचावते. महाराष्ट्रातील भूजलपातळी १९५० साली होती, त्याच्या दुपटीने खोलवर गेली आहे. याचाच अर्थ ६ मीटरवर विहिरीला बारा महिने पाणी असायचे, तिथे आता २० मीटरपर्यंत खोल जावे लागते. कुपनलिकांची अवस्था याहूनही वाईट आहे. 

छोट्या नदीमध्ये, ओढ्यांमध्ये ठराविक अंतरावर बंधारे घालण्याच्या सरकारी पातळीवरच्या प्रयत्नांनासुद्धा यश येत आहे. ओढ्याच्या पात्रातली दगड, वाळू सिमेंटच्या रिकाम्या पोत्यात भरून व्यवस्थित बंधारा बांधता येतो. असे बंधारे ८ ते १० वर्षे चांगले टिकतात.इस्रायल सारख्या देशात जेमतेम ६ ते १० इंच वार्षिक पाऊस पडतो. याउलट भारताच्या अनेक भागांत सरासरी चाळीस ते पन्नास इंच पाऊस पडतो. महाराष्ट्रातील अगदी दुष्काळी भागातसुद्धा पावसाचे वार्षिक प्रमाण वीस इंच एवढे आहे. इस्रायलने पाण्याचा प्रत्येक थेंब उपयोगात आणण्याचा गेली पन्नास वर्षे प्रयत्न केला आहे. याउलट भारतातील पावसाचे पाणी आजही बहुतांश वाहून जाते. पावसाळ्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अक्षरश: भेडसावू लागतो.यावरचा एकमेव उपाय म्हणजे रेनवॉटर हार्वेस्टिंग म्हणजेच पाण्याचे पुनर्भरण, पुनर्वापर करण्याचा आहे.

 

प्रसारक : दिपक तरवडे

संकलक : प्रविण सरवदे, कराड

English Summary: Rainwater harvesting, water storage and recharge
Published on: 11 July 2022, 07:19 IST