देशातील ११ कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता मिळणार आहे. आतापर्यंत देशातील ११. १७ कोटी शेतकरी दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांच्या हप्त्याचा लाभ घेत आहेत. मोदी सरकारने आतापर्यंत दोन हजार रुपायांचे सहा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले आहेत. आता पुढचा हप्ता म्हणजे ७ वा हप्ता हा डिसेंबर महिन्यात येणार आहे. तुम्हालाही या योजनेचा (पीएम शेतकरी योजना) लाभ घ्यायचा असेल तर प्रथम पंतप्रधान किसान योजनेशी संबंधित अटी व शर्ती जाणून घ्या.
या शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार नाही:
ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेती जमीन नाही
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे. जर एखादा शेतकरी शेती करीत असेल आणि शेती त्याच्या नावावर नसेल तर तो लाभार्थी होणार नाही. शेत जमीन त्याच्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या नावावर असेल तरी पीएम किसान योजनाचा लाभ घेऊ शकणार नाही.
हेही वाचा: पीएम किसान योजनेच्या अर्जातील चुका करा दुरुस्त; नाहीतर होईल तोटा
सरकारी बाबूलाही नाही मिळणार पीएम किसान योजनेचा लाभ
जर कोणी शेतकरी, सरकारी कर्मचारी किंवा सेवानिवृत्त, विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार, मंत्री असेल तर त्याला प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच व्यावसायिक नोंदणीकृत डॉक्टर, अभियंता, वकील, सनदी लेखापाल किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
दहा हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन घेणारे असतील अपात्र
एखाद्या व्यक्तीकडे शेत आहे पण तो शेतकरी महिन्याला दहा हजार रुपयांपेक्षा अधिक पेन्शन घेत असेल तर तो या योजनेचा (पीएम किसान योजना) लाभार्थी होऊ शकत नाही. आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यालाही या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार नाही.
हेही वाचा : ऐकलं का! पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षाला मिळणार ४२ हजार रुपये
शेत जमिनीचा वापर शेतीसाठी न केल्यास
जे शेतीच्या कामाऐवजी इतर कामांसाठी शेतीची जमीन वापरत असतील. अशा व्यक्तीही या योजनेसाठी अपात्र असतील. खेड्यांमधील बरेच शेतकरी इतरांच्या शेतात शेतीची कामे करतात, पण त्यांच्याकडे शेत नाही. शेतीचा मालक पीक किंवा पैशाचा काही भाग त्यांना देतो, असे शेतकरीही या योजनेचा (पीएम किसान योजना) लाभ घेऊ शकत नाहीत. दरम्यान या योजनेचा पुढील सातवा हप्ता १ डिसेंबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येईल. वरील गोष्टींमध्ये आपला समावेश होत नसेल तर आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
Published on: 20 October 2020, 10:36 IST